बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांची एकजूट झाली पाहिजे असं म्हटलं आहे. तसंच काँग्रेससह सगळे विरोधी पक्ष भाजपाच्या विरोधात एकवटले तर भाजपाच्या जागा १०० पेक्षाही आत येतील किंवा जास्तीत जास्त १०० जागा येतील असंही नितीश कुमार यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर जर सगळे एकत्र आले नाही तर काय होईल हे तुम्हाला माहित आहेच असंही नितीश कुमार यांनी म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे नितीश कुमार यांनी?
भाकपाने एका विषयावर व्याख्यान आयोजित केलं होतं. त्या व्याख्यानात नितीश कुमार यांनी हे वक्तव्य केलं आहे. काँग्रेससहीत सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र आलं पाहिजे अशी भूमिका आज नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा मांडली. एवढंच नाही तर नितीश कुमार म्हणाले की मला एखादं पद मिळावं अशी माझी इच्छा नाही, अनेक लोक घोषणा देऊ लागतात, मी त्यावेळी त्यांना अडवतो. माझं जाऊद्या आपण सगळ्यांनी म्हणजेच काँग्रेससह सगळ्या विरोधी पक्षांनी आपली एकजूट केली पाहिजे आणि भाजपाला सामोरं गेलं पाहिजे. निवडणुकीत आपण सगळे एकत्र राहिलो तर भाजपाचा पराभव सहज शक्य आहे.
या कार्यक्रमात बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवही आले होते. त्यांनीही जमलेल्या सगळ्या पक्षांना हे आवाहन केलं की सगळ्यांनी एकत्र आलं तर आपण नक्कीच भाजपाला हरवू शकतो. या कार्यक्रमात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद, बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्यासह भाकपाचेही नेते सहभागी झाले होते.
२०२४ च्या लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. या निवडणुकांसाठी सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. अशात भाजपाला टक्कर देण्यासाठी विरोधकांची महाआघाडी या निवडणुकीत उभी राहिल याची चर्चा आहे. याचबाबत नितीश कुमार यांनी भाष्य केलं असून भाजपाला हरवायचं असेल तर सगळ्या पक्षांनी एकत्र यायला हवं असं म्हटलं आहे.