छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात भाजपचे विधानसभा आणि विधान परिषदेतील एकत्रित १९ आमदार, त्यात राष्ट्रीय समाज पक्षाच्या एका आमदाराची भर. म्हणजे एकूण २० आमदार, पाच खासदार. त्यातील दोनजण केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री. असे असले तरी राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार यांच्याबरोबरच्या ‘राजकीय मैत्री’नंतर भाजप नेत्यांमध्ये आणि समर्थक मतदारांमध्ये आता अधिक अस्वस्थता दिसून येत आहे.
‘परिवारा’त उमटणाऱ्या पण जाहीर न होणाऱ्या प्रतिक्रियांना आता उत्तरे कशी द्यायची, याची कितीही रणनीती ठरविली तरी लंगडे समर्थन कसे टिकेल, असा प्रश्न कार्यकर्ते एकमेकांमध्ये विचारताना दिसत आहेत. ‘हजूर हुकमाची परिपूर्ण पूर्तता’ या रचनेमुळे अस्वस्थेतील मौन वाढत चालले आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी लातूर जिल्ह्यातून संभाजी पाटील निलंगेकर, अभिमन्यू पवार, धाराशिवमधून राणा जगजीतसिंह पाटील यांच्यासह या शर्यतीत बबनराव लोणीकर यांनी प्रयत्न केले होते. यातील काहींना राज्यमंत्रीपद मिळाले तरी चालेल, अशी आशा मनी बाळगली होती. त्यांचे कार्यकर्ते आता आपले नेते मंत्री होणार असा दावा करत होते. अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांनी शपथ घेतली आणि मराठवाड्यातील अस्वस्थता आता हळुहळू दिसू लागली आहे.
हेही वाचा – विरोधकांच्या बैठकीनंतर नितीश कुमार नाराज? स्वत:च चर्चेला दिला पूर्णविराम; म्हणाले, “मी…”
‘ज्यांच्या विरोधात आंदोलन करून भ्रष्टाचाराचे पुरावे बैलगाडीने नेऊन दिले, त्यांच्याशी राजकीय मैत्री नक्की कोणत्या कारणासाठी, असा प्रश्न दबक्या आवाजात विचारला जात आहे. लोकसभा बांधणीच्या टप्प्यातील कार्यक्रमाची जंत्री कागदोपत्री पूर्ण झाल्याचे दाखवून नेते मोकळे झाले असून आता कोणाकडे पाठवू नका, कारण विचारले जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आमच्याकडे नाहीत, असेही कार्यकर्ते नेत्यांना सांगू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी येणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांसमोरही आता नवे प्रश्न निर्माण होणार आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची तयारी करणारे कार्यकर्ते अधिक वैतागले असल्याचे दिसून येत आहे. भाजपला मतदान करणार अशी भूमिका समाजमाध्यमातून व्यक्त करणाऱ्या भाजप समर्थकांकडून विचारले जाणारे प्रश्नही टोकदार होत आहेत.
केद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, अजयकुमार मिश्रा हे मराठवाड्यातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आवर्जून हजेरी लावतात. त्यांच्यापर्यंत ही अस्वस्थता पोहोचविण्याची तयारी केली जात आहे. नव्या राजकीय मैत्रीचा मराठवाड्यात लाभ होण्याऐवजी नुकसानच अधिक असेल, अशीही चर्चा आता भाजप कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.