केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे नेहमीच चर्चेत असतात. तसेच त्यांनी सार्वजनिकरीत्या एखादं केलेलं विधानही राजकारणात फार गांभीर्यानं घेतलं जातं. विशेष म्हणजे सरकारमधील चुकीच्या गोष्टींबद्दल बोलायलाही ते कधी मागेपुढे पाहत नाहीत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी टीव्ही ९ मराठीला एक विशेष आणि बेधडक मुलाखत दिली आहे. त्या मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरेही दिलीत. मुलाखतीत पत्रकारांनी त्यांना प्रकाश आंबेडकरांच्या हवाल्यानं पुढील पंतप्रधान होणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे. या निवडणुकीत आम्हाला बहुमत मिळणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीच देशाचे पंतप्रधान होणार आहेत. त्यामुळे दुसरं कोणी पंतप्रधान होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि माझ्या डोक्यातही हा विषय नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मतभिन्नता आणि मतभेद असू द्यावेत, पण मनभेद होऊ देऊ नये- गडकरी

तुमच्याबद्दल कोणीही नकारात्मक बोलत नाही, तर सकारात्मक बोलतात, असं पत्रकारांनी विचारले असता नितीन गडकरी म्हणाले, ते माझं भाग्य आहे, मी नेहमी अटलबिहारी वाजपेयींनी सांगितलेली गोष्ट लक्षात ठेवतो. मतभिन्नता आणि मतभेद असू द्यावेत, पण मनभेद होऊ देऊ नये. युती-आघाड्या होतात आणि जातात, लोक इकडून तिकडे जातात, पण व्यक्तिगत संबंध वेगळे ठेवावेत आणि राजकारण वेगळं ठेवावं. माझ्या विचारांशी माझी बांधिलकी आहे. पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास त्याचप्रमाणे सगळ्यांशी संवादपूर्ण आणि चांगले संबंध ठेवणे हे लोकशाहीला मजबूत करणारी गोष्ट असते. मी तसा सामान्यपणे वागण्याचा प्रयत्न करतो, त्यात काही गणितं नाहीत, असंही नितीन गडकरींनी स्पष्ट केलंय.

मी कधी कोणाचंही काम करताना त्याला जात, पंत, भाषा आणि पक्ष विचारत नाही- नितीन गडकरी

राजकारणातले तुम्ही ग्रीन कार्ड होल्डर आहात, ग्रीन कार्ड होल्डरला जसा सगळीकडे प्रवेश असतो, तसा तुम्हालाही सगळ्यांच्या मंचावर म्हणजेच विरोधी पक्षांच्या मंचावर, नेत्यांमध्ये स्थान असते. त्याची बातमी होत नाही, असे पत्रकारांनी विचारले असता गडकरी म्हणाले, सामान्यपणे माझा पहिल्यापासून असाच स्वभाव राहिला आहे. दुसरं म्हणजे मी रस्ता बांधणार, एका मतदारसंघात बांधणार आणि दुसऱ्या मतदारसंघात बांधणार नाही, असं होऊ शकत नाही. मला पूर्ण रस्ता बांधावा लागतो. मी सगळ्यांचे प्रश्न आणि समस्या समजून घेऊन सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे माझे पक्षाच्या पलिकडेही इतरांशी चांगले संबंध आहेत. माझ्या मतदारसंघातही मी कोणताही भेदभाव करत नाही. मी कधी कोणाचंही काम करताना त्याला जात, पंत, भाषा आणि पक्ष विचारत नाही. जे नियमात असेल ते सगळ्यांचे करतो. जे नियमात बसत नाही ते जवळच्याला सांगतो की हे करण्यात अडचण आहे. मी फायदा आणि नुकसानीचा कधी विचार करीत नाही. मी, माझा पक्ष आणि माझी विचारधारा हे माझ्या आयुष्याचेच भाग आहेत. आमच्या पक्षाचं उद्दिष्ट आहे. गुड गव्हर्नन्स आणि डेव्हलपमेंट, अंत्योदय या तिन्ही गोष्टी माझ्याकरिता एक प्रकारचं कन्विक्शन आहे. पहिला देश, नंतर पक्ष आणि त्यानंतर मी अशा पद्धतीनेच मी काम करण्याचा प्रयत्न करतो, असंही नितीन गडकरींनी अधोरेखित केलंय.

२०० हून कमी जागा मिळाल्या तर पंतप्रधान होणार का?

भारतीय जनता पक्ष देशात २०० च्या खाली राहिला तर नितीन गडकरी पुढचे पंतप्रधान असतील, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत, त्यावर टीव्ही ९ च्या पत्रकारांनी पश्नि विचारला असता ते म्हणाले की, या निवडणुकीत आम्हाला बहुमत मिळणार आहे आणि नरेंद्र मोदीच देशाचे पंतप्रधान होणार आहेत. त्यामुळे दुसरं कोण पंतप्रधान होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि माझ्या डोक्यातही हा विषय नाही. यावेळीच्या निवडणुकीत आम्हाला ४०० पार जागा मिळतील, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि मोदीजी देशाचे पंतप्रधान होतील. एनडीए मिळून आम्ही ४०० पार जाऊ, असा मला विश्वास असल्याचं त्यांनी सांगितलं.

आम्ही संविधान बदलवणार नाही – गडकरी

जर भाजपाने ४०० पार केलं, तर संविधान बदलणार असं एका मंत्र्यानं सांगितल्याचं शरद पवार बोललेत, त्यावर गडकरी म्हणाले की, संविधान बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण संविधान बदलवण्याचा प्रयत्न ८० वेळा तर काँग्रेसनेच केला. आणीबाणीच्या काळात त्यावेळी त्यांनी बदलवला. आमच्या पक्षाच्या अजेंड्यामध्ये कुठेही संविधान बदलवण्याचा उल्लेख नाही आहे. आम्ही संविधान बदलवणार नाही हे मी तुम्हाला पूर्ण विश्वासाने सांगतो. जेव्हा तुम्हाला लोकांना विश्वासात घेऊन समजावून सांगता येत नाही, तेव्हा त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतो. काही लोकांना भडकावण्याचा प्रयत्न होतो, त्याच्यातला हा भाग असल्याचंही म्हणत गडकरींनी विरोधकांवरही निशाणा साधला.

पुढे ते म्हणाले, महाराष्ट्रात आम्हाला ४४ ते ४५ जागा मिळतील. देशात जे वातावरण आहे ते महाराष्ट्रातही पुढे राहील. महाराष्ट्राच्या राजकारणाचा राष्ट्रीय स्तरावर प्रभाव पडत नाही, परंतु राष्ट्रीय स्तरावर आमचं जे काम आहे, त्याच्या आधारवर आम्हाला महाराष्ट्रात मतदान मिळेल.हिंदुत्व, विचारधारा आणि राम मंदिर हे सगळे मुद्देच आहेतच. मी ज्या खात्याचा मंत्री आहे, त्यात रस्ते, टनेल, पर्वतमाला,सागरमाला या माझ्या विभागाबद्दल मी नेहमी बोलत असतो. आता पक्षाचे जे अन्य विषय असतात, त्यावर मी पक्षाचा अध्यक्ष, सेक्रेटरी किंवा प्रवक्ता नसल्याने बोलत नाही. माझ्या विभागाबद्दल मी बोलत असतो, बाकीच्या गोष्टी आमचे प्रवक्ते आणि पदाधिकारी बोलत असतात, असंही त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तेच भाजपाबरोबर आलेत असं विचारल्यावर गडकरी म्हणालेत, काळाच्या ओघात अनेक लोक पक्ष बदलतात, येतात आणि जातात. राजकारण हा मजबुरी, विरोधाभास अन् मर्यादा यांचा खेळ आहे आणि काही लोक येत-जात असतात. परंतु भाजपाचा कार्यकर्ता म्हणून मला मोदींच्या नेतृत्वात ५० लाख कोटी रुपयांची कामे करण्याची संधी मिळाली. एकाही कंत्राटदाराला काम मिळवण्यासाठी माझ्याकडे यावं लागलं नाही. तुम्ही कुठेही जाऊन चौकशी करू शकता, असंही त्यांनी सांगितलंय.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There is no question of anyone other than narendra modi becoming the prime minister nitin gadkari clarified the position vrd