गणेश यादव, लोकसत्ता

पिंपरी : लोकसभा निवडणुकीला सात ते आठ महिन्यांचा कालावधी असला तरी सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. मागील तीन निवडणुकींपासून दूर राहणाऱ्या मनसेने यंदा मावळमधून शड्डू ठोकण्याचा निर्धार केल्याची चर्चा आहे. महायुती, महाविकास आघाडीबरोबरच मनसे रणांगणात उतरल्यास मावळची निवडणूक तिरंगी आणि चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.

Devendra Fadnavis, Sandeep Naik, Khairane MIDC office,
फडणवीस यांचे संदीप नाईकांना आव्हान, खैरणे एमआयडीसी कार्यालयात पत्रकार परिषद
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
nitin gadkari
Nitin Gadkari: ‘भाजपाचं पिक वाढलंय, त्यावरही फवारणी करण्याची गरज’, नितीन गडकरींचा इशारा कुणाकडे?
Ramdas Athawales message of unity to Advocate prakash ambedkar
रामदास आठवलेंकडून ॲड.आंबेडकरांना पुन्हा ऐक्याची साद; म्हणाले, ‘आपण दोघेही नरेंद्र मोदींच्या..’

लोकसभा मतदारसंघाची २००९ मध्ये पुनर्रचना झाली. या पुनर्रचनेत पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड, मावळ विधानसभा आणि रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, उरण या तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश करत मावळ लोकसभा मतदार संघाची निर्मिती झाली. २००९, २०१४ आणि २०१९ या तिन्ही निवडणुकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये सरळ लढत झाली. तिन्ही वेळेस शिवसेनेने बाजी मारली. आघाडीमुळे काँग्रेसचा उमेदवार रिंगणात नव्हता, तर मनसेने एकदाही मावळातून निवडणूक लढवलेली नाही. २०१४ मध्ये शेकापच्या पाठिंब्यावर अपक्ष लढलेले दिवंगत लक्ष्मण जगताप यांना जाहीर, तर २०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या पार्थ पवार यांना अप्रत्यक्ष पाठिंबा दिला होता.

आणखी वाचा-जंयत पाटील यांच्या विरोधकांना अजित पवारांचे बळ

आता राजकीय समीकरणे बदलली आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. शिवसेना (शिंदे गट)-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तीनही पक्ष सत्तेत आहेत. पिंपरी-चिंचवड, मावळच्या आमदारांसह पक्ष संघटना, रायगडचे खासदार सुनील तटकरे हे अजित पवारांसोबत आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या गटाची मावळातील ताकद कमी झाल्याचे दिसून येते. विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे शिवसेना शिंदे गटात आहेत. महायुतीत हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेकडे मावळातून प्रबळ उमेदवार नाही, तर पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसने मावळ लोकसभा मतदार संघावर दावा केला आहे. रायगड जिल्ह्यात राजकीय ताकद असलेला शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) पक्ष महाविकास आघाडीसोबत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून कोणत्या पक्षाकडे मतदारसंघ जाईल आणि कोण उमेदवार असेल, याकडे लक्ष असणार आहे.

आणखी वाचा-चंद्राबाबू यांच्या अटकेनंतर तेलगू देसम पक्षाच्या सर्व २१ आमदारांना गृहकैद, राज्यभर पोलिस तैनात

आतापर्यंत तीन निवडणुकांपासून दूर राहणाऱ्या मनसेनेही यंदा मावळच्या रिंगणात उतरण्याचा निर्धार केला आहे. मनसेने मावळ लोकसभेची पहिली बैठक रविवारी वसवलीगावात घेतली. मावळ लोकसभेच्या संघटकपदी रणजित शिरोळे, समन्वय संघटकपदी अमय खोपकर आणि निरीक्षक म्हणून सचिन चिखले यांची नियुक्ती केली आहे. या मतदार संघातून निवडणूक जिंकायचीच या निर्धाराने सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. हेवेदावे सोडून एकोप्याने काम करावे अशा सूचना नेत्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना दिल्या असून विधानसभानिहाय मेळावे घेण्याचा निर्धार मनसेने केला आहे. त्यामुळे मावळची आगामी निवडणूक चुरशीची आणि तिरंगी होण्याची चिन्हे आहे.

मावळ लोकसभा निवडणूक लढविण्याचे ठरले आहे. मतदारसंघ जिंकण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार पक्ष संघटनेचे काम सुरू आहे. -सचिन चिखले, निरीक्षक मनसे मावळ लोकसभा