पुणे : आगामी लोकसभा, विधानसभा आाणि महापालिका निवडणुकांच्या लढाईसाठी काँग्रेसने नव्या दमाने रणांगणात उतरण्याची तयारी म्हणून आढावा बैठकांना आरंभ केला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हानिहाय बैठका पुण्यात घेण्यात आल्या. मात्र, या बैठकांतून लढाईसाठी नवीन व्यूहरचना आखण्यावर चर्चा होण्यापेक्षा पक्षाअंतर्गत यादवीवर ऊहापोह करावा लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘कसब्या’चे आमदार रवींद्र धंगेकर यांचे छायाचित्र फलकांवर लावण्यास टाळल्याचे निमित्त घडले असून, त्यावरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तर ‘गटबाजी पुन्हा कानावर आली तर बघाच,’ असा दम द्यावा लागला आहे. त्यामुळे पक्षाअंतर्गत यादवी रोखणे आणि रुसवेफुगवे दूर करून मनोमीलन घडविण्याचे आव्हान काँग्रेसपुढे उभे राहिले आहे.

हेही वाचा – छत्तीसगड विधानसभा निवडणूक : भाजपाकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, केंद्रातील नेत्यांना तिकीट!

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत पुण्यात काँग्रेस भवन येथे पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला. या बैठकांना माजी आमदार मोहन जोशी, रमेश बागवे, तसेच विश्वजीत कदम, प्रणिती शिंदे, संग्राम थोपटे, संजय जगताप ही दुसऱ्या फळीची नेतेमंडळीही उपस्थित होती. या बैठकांमध्ये आगामी निवडणुकांंना सामोरे कसे जायचे, यापेक्षा जास्त चर्चा ही पुणे शहरातील पक्षाअंतर्गत गटबाजीची रंगली. या बैठकांच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या फलकांमध्ये काँग्रेसचे शहरातील एकमेव आमदार रवींद्र धंगेकर यांचे छायाचित्र नसल्याने नाराजीचा सूर बैठकीत उमटला. या बैठकीला आमदार धंगेकर हे अनुपस्थित राहिले. त्यामुळे पुणे शहर काँग्रेसमधील गटबाजी ही पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. पटोले यांनी धंगेकर हे आजारी असल्याने बैठकीला आले नसल्याचे सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असला, तरी सध्या काँग्रेसमधील गटबाजी ही उफाळून आली आहे.

हेही वाचा – २०१८ च्या पराभवातून धडा घेत भाजपाने बदलली रणनीती; पंतप्रधान मोदी यांच्याऐवजी पक्ष संघटनेवर भर

शहराध्यक्ष बदलानंतर दोन गट

पुण्यातील काँग्रेसमध्ये गेल्या वर्षभरापासून गटबाजी वाढीस लागली आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात अरविंद शिंदे यांची प्रभारी शहराध्यपदी नियुक्ती करण्यात आली. माजी आमदार रमेश बागवे यांना या पदावरून मुक्त करून शिंदे यांची वर्णी लागल्यानंतर या गटबाजीला उधाण आले आहे. दोन्ही गटांकडून वेगवेगळे कार्यक्रम आणि आंदोलने केली जातात. त्यामुळे ही गटबाजी सतत उघड होत आली आहे. शिंदे यांचा एक गट आहे. त्यांच्याकडे तरुण पदाधिकारी आहेत. दुसऱ्या गटाचे नेतृत्त्व बागवे यांच्यासह आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी हे करतात. आढावा बैठकीच्या निमित्ताने लावलेल्या फलकांवर आमदार धंगेकर यांचे छायाचित्र हे शिंदे गटाकडून जाणीवपूर्वक लावले नसल्याच्या तक्रारीचा सूर बैठकीत काढण्यात आला. त्यावर पांघरुण टाकण्याचा प्रयत्न पटोले यांनी केला असला, तरी काँग्रेससमोर आगामी निवडणुका जिंकण्याऐवजी यादवी रोखण्याचे आव्हान उभे राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There was factionalism in the pune congress mla dhangekar leave out from banner print politics news ssb