एजाज हुसेन मुजावर
सोलापूर : गेल्या अनेक दिवसांपासून भाजप प्रवेशाच्या चर्चेत असलेले मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार राजन पाटील-अनगरकर यांच्या निवासस्थानी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भेट देऊन त्यांना भाजप प्रवेशासाठी गळ घातली. राष्ट्रवादीच्या उपयुक्त ठरू शकणाऱ्या या नेत्याला आपल्या पक्षात आणण्यासाठी भाजपने शेजारच्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना थेट उतरविले होते.
राजन पाटील यांनीही भाजप प्रवेशाचे आमंत्रण थेट धुडकावून न लावता यासंदर्भात मोहोळ तालुक्यातील जनतेची संमती घेऊनच निर्णय घेण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे अनगरकरांचा लवकरच भाजप प्रवेश होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बुधवारी दुपारी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. उल्लेखनीय म्हणजे त्यांनी या दौऱ्यात राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष आमदार संजय शिंदे यांचीही भेट घेतली. दोघेही सोलापुरात एका कार्यक्रमात एकाचा व्यासपीठावर एकत्र आले होते.
हेही वाचा >>> रायगडात भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली, शेकापचा बडा नेताही वाटेवर
डॉ. सावंत यांनी मुद्दाम वेळ ठरवून मोहोळ तालुक्यात अनगर येथे राजन पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी पाटील कुटुंबीयांनी डॉ. सावंत यांचा पुणेरी पगडी घालून सत्कार केला. याच भेटीत त्यांनी सोलापूरच्या खास हुरड्याचाही आस्वाद घेतला. या भेटीत झालेल्या चर्चेत डॉ. सावंत यांनी राजन पाटील यांच्या राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील सेवेचा आवर्जून गौरवपूर्ण उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आणि नवे राष्ट्र निर्माणासाठी राजन पाटील यांच्या नेतृत्वाची भाजपला गरज आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, असे आमंत्रण आपण राजन पाटील यांना दिल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.
हेही वाचा >>> एकनाथ शिंदेंना कोल्हापुरात राजकीय पाठबळ; ठाकरे गट, राष्ट्रवादीला धक्का
यासंदर्भात राजन पाटील यांनीही एकनाथ शिंदेंना कोल्हापुरात राजकीय पाठबळ; ठाकरे गट, राष्ट्रवादीला धक्काभाजप प्रवेशाचे हे आमंत्रण लगेचच धुडकावून न लावता याबाबतचा अंतिम निर्णय मोहोळ तालुक्यातील जनतेवर सोपविला आहे. मागील ५०-६० वर्षांपासून मोहोळच्या जनतेने आम्हा पाटील घराण्यावर अविरत प्रेम आणि विश्वास दर्शविला आहे. आपल्या वडिलांपासूनचे हे प्रेमाची परंपरा तिसऱ्या पिढीही अनुभवत आहे. त्यामुळे जनतेला विश्वासात घेऊनच पुढील भूमिका घेण्याचा मानस राजन पाटील यांनी बोलून दाखविला.
हेही वाचा >>> पुणे : भाजपच्या बालेकिल्ल्यातील त्या फलकाची शहरभर चर्चा
मोहोळ तालुक्यातील राजकारणात अनेक वर्षे अनगरच्या बाबुराव पाटील यांची पकड होती. वादळी नेते म्हणून ओळख असलेले बाबुराव पाटील हे शेकापचे नेते होते. विधानसभेवरही त्यांनी दोन-तीनवेळा प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र राजन पाटील हे १९९५ ते २००९ पर्यंत सलग तीनवेळा आमदार होते. मोहोळ मतदारसंघ राखीव झाल्यानंतरही राजन पाटील यांच्या मदतीनेच प्रा. लक्ष्मण ढोबळे, रमेश कदम आणि यशवंत माने यांना राष्ट्रवादीकडून विधानसभेवर निवडून जाण्याची संधी मिळाली आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा राजन पाटील यांनी अनेक वर्षे सांभाळली आहे. त्यांचा स्वतःचा साखर कारखानाही आहे. तथापि, नक्षत्र डिस्टलरी प्रकल्पाच्या माध्यमातून झालेल्या घोटाळ्यात पाटील परिवार अडचणीत सापडला आहे.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील हे राजन पाटील यांच्या विरोधात उघडपणे भूमिका घेऊन आव्हान देत आहेत. त्यांच्यातील वाद संपुष्टात आणण्यासाठी राष्ट्रवादी पक्षश्रेष्ठींकडून गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. किंबहुना पक्षश्रेष्ठींच्या अप्रत्यक्ष प्रोत्साहनामुळेच उमेश पाटील यांची राजन पाटील यांच्या विरोधात आव्हान देण्याची मजल वरचेवर वाढत असल्याचे राजन पाटील यांच्या चाहत्यांना वाटते. या पार्श्वभूमीवर राजन पाटील व त्यांचे पुत्र विक्रांत पाटील हे राजकीय भूमिका घेण्याच्या मानसिकतेत असल्याचे सांगितले जाते. त्यातूनच त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा अधुनमधून होत असते. पण भाजपने आता पाटील यांच्यासाठी जोर लावल्याचे दिसते.