आगामी लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी असताना काँग्रेस नेत्यांची भाजपात जाण्याची मालिका आताही सुरूच आहे. पक्षातील दिग्गज नेत्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सर्वच जण भाजपाची वाट धरत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेश भाजपाने आपल्या नेत्यांना काँग्रेसमधील मंडळींना पक्षात सामील करून घेण्याची जबाबदारीच दिली आहे. भोपाळचे माजी नगरसेवक संजय वर्मा पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडताना दिसत आहेत. त्यांचा बराच वेळ काँग्रेस कार्यकर्त्यांबरोबर चर्चेत जातो. पक्ष आपल्यावर इतकी मोठी जबाबदारी सोपवेल, असे आयुष्यातही वाटले नव्हते, असे त्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय वर्मा यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “मी पाच वर्षे भोपाळ महापालिकेत काम केले आणि आज पक्षात कोणाला सामील करायचे ते मी ठरवतो. मी नवीन समितीचा सदस्य आहे. कोणता काँग्रेस नेता खरा ‘रामभक्त’ आहे आणि कोण संधिसाधू आमच्या पक्षात येण्याचा प्रयत्न करीत आहे, हे ठरविणे माझे काम आहे. दोन महिन्यांपासून राज्याचे माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील समिती काँग्रेस कार्यकर्त्यांना पक्षात सामावून घेण्यात व्यग्र आहे.

१६ हजाराहून अधिक काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते भाजपात

समितीच्या आकडेवारीनुसार २१ मार्चपासून १६,१११ काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते यांच्यासह समाजवादी पार्टी (सपा) आणि बहुजन समाज पक्ष (बसप)मधील काही नेतेमंडळी पक्षात सामील झाली आहेत. “लवकरच नेत्यांच्या पक्षप्रवेशाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होईल,” असेही ते म्हणाले. इतर पक्षांतील नेत्यांचा प्रवेश करून घेण्यासाठी भाजपाने नवीन समिती स्थापन केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक खासदार, आमदार आणि अन्य वरिष्ठ नेत्यासह तीन सदस्यांचा समावेश असलेली ही समिती आहे. नावांची तपासणी केल्यानंतर समिती मुख्यमंत्री मोहन यादव, राज्य भाजपा प्रमुख व्ही. डी. शर्मा व मिश्रा यांचा समावेश असलेल्या पॅनेलला यादी पाठवते. त्यानंतर राज्यातील नेतृत्वाकडून त्यासंबंधीचा निर्णय घेतला जातो. या यादीत मोठ्या नावांचा समावेश असल्यास त्याबाबतचा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेते.

भाजपाचे दावे काँग्रेसने फेटाळले

भाजपाने केलेले पक्षप्रवेशाचे दावे काँग्रेसने फेटाळून लावले. “आमच्याकडे पक्षाच्या अधिकृत यादीत ९० लाख कार्यकर्ते आहेत. भाजपा आकडेवारीबाबत खोटे बोलत आहे. आमच्या आकडेवारीनुसार पक्ष सोडलेल्या नेत्यांची वास्तविक संख्या केवळ ६०० आहे. भाजपा पूर्णपणे खोटे बोलत आहे,” असे काँग्रेसचे उपाध्यक्ष जे. पी. धनोपिया म्हणाले.

संघटनात्मकदृष्ट्या काँग्रेसला तोडणे हाच मुख्य उद्देश

पहिल्या चार टप्प्यांत होणार्‍या मतदानासाठी संघटनात्मकदृष्ट्या काँग्रेसला कमकुवत करणे, हाच मध्य प्रदेश भाजपाचा मुख्य उद्देश आहे. मध्य प्रदेशमध्ये १९ एप्रिलपासून पहिल्या चार टप्प्यांत निवडणूक होणार आहे. गेल्या वेळच्या निवडणुकीत एक जागा कमी पडल्याने भाजपाला लोकसभेच्या २९ जागा जिंकता आल्या नाहीत. परंतु, हेच लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून भाजपा यंदा निवडणुकीत उतरली आहे.

सत्ताधारी पक्ष चुकीची माहिती पसरवीत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. परंतु, भाजपाने असा दावा केला की, पक्षात सामील झालेल्यांमध्ये माजी केंद्रीय मंत्री, सात माजी आमदार आणि जिल्हा युनिट अध्यक्ष, सरचिटणीस, आयटी सेल, महिला मोर्चाच्या प्रमुख, प्रवक्ते, विद्यमान महापौर आणि अशा पदांवर विराजमान असलेले जवळपास दोन हजार नेते भाजपात सामील झाले आहेत; तर १२ हजार बूथ कार्यकर्ते पक्षात सामील झाले आहेत.

“आमचे मुख्य लक्ष बूथस्तरीय कार्यकर्त्यांवर आहे. काही आठवड्यांपूर्वी कमलनाथ पक्षात सामील होणार असल्याची अफवा पसरली होती. ही अफवा आमच्यासाठी फायद्याची ठरली कारण- अनेक नेत्यांनी कमलनाथ सामील होणार आहे, असा विचार करून पक्षप्रवेश केला. आज कमलनाथ यांचे सर्व प्रमुख नेते भाजपामध्ये आहेत. आम्ही या समितीला बूथ स्तरापर्यंत नेणार आहोत. राज्यात ६० हजार बूथ आहेत. दोन नेत्यांनी काँग्रेस सोडली तरी १.२ लाख कार्यकर्ते पक्ष सोडतील. मध्य प्रदेशात काँग्रेसचा अंत होईल,” असे वर्मा म्हणतात.

चौतीस जिल्ह्यांतील नेत्यांचा पक्षप्रवेश

भाजपाच्या पॅनेलच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत राज्याच्या ५५ पैकी ३४ जिल्ह्यांतील विरोधी पक्षांतील नेते आणि कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला आहे. उदाहरणार्थ- शाजापूर (२,५००), छिंदवाडा (२,१११), नर्मदापुरम (१६०६) व विदिशा (११०३) अशा संख्येत नेतेमंडळींनी काँग्रेस सोडल्याचा दावा भाजपा करीत आहे. छिंदवाडाव्यतिरिक्त इतर सर्व जिल्ह्यांत भाजपा मजबूत आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये पक्ष १५ वर्षांहून अधिक काळ सत्तेत आहे.

शाजापूरमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष योगेंद्रसिंह बंटी यांनी त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला. “माझे वडील माजी आमदार होते. मी अथकपणे पक्षासाठी काम केले. आता पक्षातील कार्यकर्ते आणि वरिष्ठ नेतृत्वात अंतर निर्माण झाले आहे. केंद्रीय नेत्यांचा एक वाईट निर्णय किंवा विधान पाच टक्के मते कमी करते. वर्षानुवर्षे वाईट निर्णय घेतले जात आहेत,” असे त्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा या महिन्याच्या सुरुवातीला शाजापूरमधून निघाली तेव्हा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आणि आरोप केला, “मुलांनी त्यांच्या मोबाईल फोनवर वेळ घालवावा आणि ‘जय श्रीराम’ चा उच्चार करावा असेच पंतप्रधानांना वाटते.”

छिंदवाडा हा राज्यातील काँग्रेसचा एकमेव संसदीय मतदारसंघ आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने जिल्ह्यासाठी निधी गोठविला असल्याचे सांगत, अनेकांनी पक्ष सोडला आहे. “अनेक नेत्यांना हे समजले आहे की, नकुल नाथ यांच्या नेतृत्वाखाली त्यांना भविष्य नाही,” असे काँग्रेस सोडण्याचा विचार करणार्‍या एका वरिष्ठ स्थानिक काँग्रेस नेत्याने सांगितले.

हेही वाचा : ‘प्रभू रामचंद्रां’चे निवडणुकीच्या रणधुमाळीत आगमन; भाजपाचा काय विचार?

दोष कोणाचा?

अनेक नेत्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’बरोबर संवाद साधला. या नेत्यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष जितू पटवारी यांच्या नेतृत्वावर आरोप केले. “नेतृत्व आणि दूरदृष्टीचा अभाव आहे. इथे राहून काय फायदा? जितू पटवारी यांना अध्यक्ष करणे चुकीचे होते. ते लोकांना सोबत घेत नाहीत,” असे माजी आमदार विशाल पटेल म्हणाले. एका युवा नेत्याने सांगितले की, भाजपामध्ये व्ही. डी. शर्मा बूथ कार्यकर्त्यांना भेटतात, त्यांच्यासोबत जेवण करतात. परंतु, अशा बैठका पटवारी यांच्याबरोबर होत नाहीत. काँग्रेसमध्ये कार्यसंस्कृती उरलेली नाही, असे ते म्हणाले.

प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते के. के. मिश्रा म्हणाले, ”पक्षाची मोहीम सुरू आहे. भाजपा हा कचराकुंडी झाला आहे; जिथे काँग्रेसमधील कचरा टाकला जात आहे.”

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thousand congress leader workers join bjp in madhya pradesh rac