ठाणे : तिरंगी लढतीमुळे सुरुवातीला सोपी वाटणारी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासाठी प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मात्र आव्हानात्मक ठरु लागल्याचे चित्र अगदी ठसठशीतपणे दिसू लागले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुस्लिम, आगरी आणि कुणबी या तीन समाजातील बहुसंख्य मतदार या मतदारसंघात आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर मतदारसंघातील ग्रामीण पट्टयात गेल्या काही वर्षापासून कार्यरत झालेले जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कपिल पाटील यांच्याविषयी मतदारसंघातील एका मोठया भागात असलेली नाराजी आणि कुणबी मतांच्या ध्रुवीकरणाच्या चर्चेमुळे या निवडणूकीत चुरस निर्माण झाली आहे.

हेही वाचा…महाराष्ट्रातील दलित समुदाय घेतोय संविधान रक्षणाचा संकल्प; राजकारणातील संविधानाच्या दाव्या-प्रतिदाव्यांवर त्यांचे मत काय?

आगरी समाजाला आपलेसे करण्यासाठी भाजपने कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले. पाटील यांच्या मंत्रिपदाचा पक्षाला ठाणे जिल्ह्यात फायदा होईल, अशी अपेक्षा होती. पण केंद्रात राज्यमंत्रिपद असतानाही जिल्ह्याच्या राजकारणात पाटील फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत. निवडून येण्यासाठी त्यांना अखेरपर्यंत धावपळ करावी लागत आहे. भाजपची वरिष्ठ मंडळीही पाटील यांच्या कार्यपद्धतीवर फारसे खुश नाहीत. पक्षाचे जिल्ह्यातील वजनदार आमदार किसन कथोरे यांच्याशी दोन हात करण्यातच पाटील यांचा बराचसा वेळ गेला. स्वपक्षीयांबरोबर घेतलेला पंगा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या पचनी पडलेले नाही.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चढाओढीत या मतदारसंघातील विरोधी उमेदवार शेवटपर्यंत ठरत नाही ही बाब कपील पाटील यांच्या नेहमीच पथ्यावर पडते. यंदाही अगदी शेवटच्या टप्प्यात हा मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. पाच वर्षांपुर्वी काँग्रेसचे सुरेश टावरे यांना उमेदवारीसाठी शेवटच्या दिवसापर्यत वाट पहावी लागली होती. यंदाही सुरेश म्हात्रे यांच्या बाबत हेच घडले. राष्ट्रवादीला हा मतदारसंघ सुटल्याने काँग्रेस पक्षात नाराजी होती. त्यामुळे पहिला म्हात्रे यांचा पहिला आठवडा ही नाराजी दूर करण्यातच गेला. त्याच जिजाऊ संघटनेने निलेश सांबरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. कुणबी समाजातून येणारे सांबरे यांनी शहापूर, भिवंडी ग्रामीण, मुरबाड भागात आक्रमक प्रचार केल्याने ही निवडणुक कपील पाटील यांच्यासाठी सोपी ठरेल असाच अंदाज बांधला जात होता. प्रचाराचा टप्पा पुढे सरकत गेला तसे मात्र ही निवडणूक चुरशीची ठरु लागली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत पाटील यांनी ज्या भागातून चांगली मते घेतली होती तेथे सांबरे यांचा जोर वाढू लागल्याने पाटील यांचीच डोकेदुखी वाढू लागली आहे. विश्वनाथ पाटील यांच्यासह कुणबी सेना पाटील यांनी आपल्या पंखाखाली घेतली आहे. मात्र मराठा आंदोलनानंतर कुणबी समाजात नाराजीचे वातावरण आहे. या नाराजीचा फटका पाटील यांना बसेल की काय अशी भीती आता भाजपच्या गोटात आहे.

हेही वाचा…आंध्रमध्ये सत्तेत जगनमोहन की चंद्राबाबू ?

भिवंडी शहरात मुस्लीम मते निर्णायक ठरतात. एरव्ही काँग्रेस किंवा समाजवादी पार्टीला मुस्लीम मतांचा आधार असतो. यंदा राष्ट्रवादीचा उमेदवार रिंगणात असल्याने मुस्लीम समाज महाविकास आघाडीचा घटक पक्षाला साथ देईल का, यावरही बरीच गणिते अवलंबून आहेत.

मतांचे ध्रुवीकरण कोणाच्या पथ्यावर ?

भिवंडी लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघ येतात. यामध्ये भिवंडी ग्रामीण, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिम, शहापूर, मुरबाड या मतदार संघाचा समावेश आहे. आगरी, कुणबी, आदिवासी आणि मुस्लिम अशा मतदारांचा भारणा असलेल्या हा मतदार संघ आहे. या मतदार संघात एकूण २७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. भिवंडी मतदार संघात २००९ मध्ये काँग्रेसचे खासदार सुरेश टावरे हे निवडून आले होते. तर, २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. यंदा काँग्रेसचे कार्यकर्ते नारज होते. मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी समजूत काढत पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची नाराजी दूर केली असून पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते आता सुरेश म्हात्रे यांच्या प्रचारात उतरल्याचे दिसून येत आहे. पाटील यांनीही विरोधात असणारे भाजप आमदार किसन कथोरे आणि शिंदेसेनेसोबत जुळवून घेतले आहे. पाटील आणि म्हात्रे हे दोन्ही उमेदवार आगरी समाजाचे आहेत तर, सांबरे हे कुणबी समाजाचे आहेत. शेवटच्या टप्प्यात भाजपाचे प्राबल्य असलेल्या मुरबाड आणि बदलापूर या कुणबी पट्ट्यात सांबरे यांनी तळ ठोकला आहे. आगरी, कुणबी, आदिवासी आणि मुस्लिम अशा मतदारांचा भरणा असलेल्या हा मतदार संघ आहे. हे मतदार कुणाची साथ देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three candidate s battle in bhiwandi lok sabha constituency puts bjp s kapil patil to the test print politics news psg