मुंबई : राज्य विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांचा शपथविधी, अध्यक्षांची निवड यासाठी उद्यापासून (शनिवार) विधानसभेच्या तीन दिवसीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. यासाठी भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांना हंगामी अध्यक्ष म्हणून शुक्रवारी शपथ देण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१५व्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनास शनिवारपासून सुरुवात होत आहे. शनिवार व रविवार अशा दोन दिवसांत सर्व २८८ सदस्यांचा शपथविधी पार पडेल. सोमवारी सकाळी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होईल. त्यानंतर राज्यपालांचे नवीन विधानसभेपुढे अभिभाषण होईल. अखेरच्या सत्रात पुरवणी मागण्या, विधेयके सादर केली जातील.

हेही वाचा >>> Ajit Pawar vs Sharad Pawar : अजित पवार निवडणूक निकालांसह शरद पवारांच्या छायेतून कसे बाहेर पडले?

विधानसभेच्या अधिवेशनासाठी विधान भवनात रंगरंगोटी करण्यात आली आहे. प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर लॉबीचा भाग चकाचक करण्यात आला आहे. मावळते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीच अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात येणार आहे. रविवारी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील, असे सांगण्यात आले.

७८ जणांची पहिल्यांदा शपथ

१५व्या विधानसभेत ७८ सदस्य हे पहिल्यांदाच निवडून आले आहेत. या नवीन चेहऱ्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे ३३, शिवसेना (एकनाथ शिंदे) १४, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ८, शिवसेना (उद्धव ठाकरे) १०, काँग्रेस ६ आणि राष्ट्रवादीच्या (शरद पवार) चार सदस्यांचा समावेश आहे. त्याशिवाय तीन अपक्ष व किंवा छोट्या पक्षांच्या सदस्यांचा समावेश आहे. सदस्यांना सभागृहात बोलणे किंवा भाषण करण्यासाठी ही शपथ घ्यावी लागते.

कालिदास कोळंबकर हंगामी अध्यक्ष

विधानसभेतील सर्वांत ज्येष्ठ सदस्य कोळंबकर यांची हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवनात झालेल्या छोटेखानी समारंभात शपथ दिली. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते. कोळंबकर हे शिवसेना, काँग्रेस व भाजप अशा तीन पक्षांकडून आतापर्यंत नऊ वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three day special session in maharashtra legislative assembly start from today print politics news zws