मुंबई : महाविकास आघाडीतील सहा छोट्या घटक पक्षांसाठी १८ जागा सोडण्याचे प्रमुख तीन पक्षांनी धोरण निश्चित केले असून यातील अधिक जागा मिळवण्यासाठी छोट्या पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. या सहा घटक पक्षांची ३८ विधानसभा जागांची मागणी आहे. महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि काँग्रेस या प्रमुख तीन पक्षांनी विधानसभेच्या २८८ पैकी २७० जागा घेण्याचे जाहीर केले आहे. उर्वरित १८ जागा पाच घटक पक्षांना सोडण्यात येणार आहेत.
हेही वाचा >>> सांगलीत गुरूपुष्य मुहूर्त साधत उमेदवारी अर्ज; जयंत पाटील, सुधीर गाडगीळ यांचे शक्तिप्रदर्शन
३८ जागांची मागणी
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ६, भारतीय कम्युनिस्ट पक्ष ११, समाजवादी पक्ष १२, शेतकरी कामगार पक्ष ६, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष २ आणि प्रोगेसीव्ह रिपाइं १ अशी विधानसभेच्या ३८ जागांची मागणी या सहा घटक पक्षांनी केलेली आहे. या सहा पक्षांचे विधानसभेत चार आमदार आहेत. छोट्या पक्षांचे जागा वाटप अद्याप झालेले नाही. मात्र ‘शेकाप’ने ४ ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. समाजवादीने ५ जागा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे ‘मविआ’मधील छोटे घटक पक्ष प्रमुख तीन पक्षांना जेरीस आणण्याची शक्यता आहे.लोकसभेला या घटक पक्षांना आघाडीने एकही जागा सोडलेली नव्हती. त्यांना विधानसभेला सन्मानजनक जागा देण्यात येतील, असा शब्द आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी दिला होता. ‘मविआ’तील प्रमुख तीन पक्षांना प्रत्येकी ८५ जागा देण्याच्या सूत्रात बदल होणार आहे. तसेच छोट्या पक्षांमध्ये शेकाप ६, समाजवादी ५, माकप ४, भाकप १ आणि सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष १ असे १८ जागांचे वाटप होणार असल्याचे आघाडीतील सूत्रांनी सांगितले.