नांदेड : विधानसभा निवडणुकीचे उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपच्या ‘चिठ्ठी’ प्रयोगात भोकर विधानसभा मतदारसंघात चव्हाण कुटुंबाचे ‘नशीब’ बदलले, तर नायगाव मतदारसंघात ‘दोघांत तिसरा…’ अशा पद्धतीने सादरीकरण झाल्याची माहिती समोर आली आहे. या पद्धतीनुसार पक्षाच्या राज्य शाखेकडे नावे मागवताना पक्षाने एक नियमावली तयार केली आहे.

नांदेड जिल्ह्यात ९ विधानसभा मतदारसंघ असून त्यापैकी भोकर, नायगाव, देगलूर व मुखेड या मतदारसंघांतील पक्षाच्या तीन संभाव्य उमेदवारांची नावे पक्ष निरीक्षकांकडे सोपविण्याची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली. भोकर विधानसभा मतदारसंघात खा. अशोक चव्हाण यांच्या पत्नी माजी आमदार अमिता चव्हाण यांच्यासह अॅड.श्रीजया व सुजया या चव्हाण भगिनींच्या उमेदवारांची नावे सुचविण्यात आली. पक्षातर्फे भोकरसाठी जिल्हाध्यक्ष अॅड. किशोर देशमुख आणि दिव्यांग असूनही सक्रिय असलेले निष्ठावान कार्यकर्ते प्रवीण गायकवाड हे देखील इच्छुक होेते. पण भोकरला झालेल्या प्रक्रियेत या दोघांचेही नाव बाद झाले. नायगाव मतदारसंघात राजेश पवार हे पक्षाचे आमदार असून या मतदारसंघातील तीनही तालुक्यांच्या कार्यकारिणीवर त्यांचाच वरचष्मा आहे.

हेही वाचा >>> ठाणे, बदलापुरात गोंधळ; ठाण्यात प्रक्रियेवर आक्षेप, तर निरीक्षकांसमोरच बदलापुरात वाद

नायगावच्या अशाच बैठकीत राजेश पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी व माजी जि.प.सदस्य पूनमताई पवार या दोन नावांशिवाय राजेश कुंटूरकर हे तिसरे नाव सुचविण्यात आले. या मतदारसंघात पक्षातील चार प्रमुख नेत्यांनी आपला गट तयार केला असून आमच्या चौघांतून कोणालाही उमेदवारी द्या, असे पक्षनेत्यांकडे यापूर्वीच सांगितले होते. पण या चौघांतील एकाचेही नाव ‘चिठ्ठी’ प्रयोगाच्या माध्यमातून पक्षाकडे गेले नाही, असे सांगण्यात आले.

पहिली पसंती श्रीजया यांना

मागील काही महिन्यांपासूनच खा. अशोक चव्हाण यांनी भाजपाचे काही निवडक पदाधिकारी आणि काँग्रेसमधील आपल्या विश्वासू समर्थकांच्या माध्यमातून श्रीजया यांना निवडणूक पूर्वतयारीत उतरविले. या कार्यक्रमांच्या माध्यमांतून श्रीजया यांना भाजपाच्या संभाव्य उमेदवार म्हणून पुढे आणण्यात आले. सुचविली गेलेली इतर दोन नावे केवळ सोपस्काराचा भाग असल्याचे सांगण्यात आले.

Story img Loader