संतोष प्रधान

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे गृह राज्य असलेल्या गुजरातमध्ये भाजपला सत्ता कायम राखणे प्रतिष्ठेचे असले तरी गत वेळच्या तुलनेत भाजपला एवढे आव्हान यंदा दिसत नाही. गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेस असा दुरंगी सामना वर्षानुवर्षे होत असे. यंदा आम आदमी पार्टीमुळे तिरंगी लढती होणार असल्या तरी या तिरंगी लढतींचा भाजपलाच फायदा होईल, अशी चिन्हे आहेत. काँग्रेसची जागा आम आदमी पार्टी घेणार का, याचीही उत्सुकता असेल.

गुजरातची सत्ता गमाविल्यास भाजपच्या राष्ट्रीय राजकारणावरच परिणाम होऊ शकतो. यामुळेच पंतप्रधान मोदी यांनी स्वत: गुजरातच्या निवडणुकीच्या तयारीत लक्ष घातले. गेल्या सहा महिन्यांत १५ वेळा त्यांनी गुजरातला भेट दिली. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी दोन दिवस त्यांचा गुजरातचा दौरा होता. २०१७ मध्ये पाटीदार समाजाचे आंदोलन व समाजाची नाराजी याचे भाजपपुढे आव्हान होते. यंदा भाजपपुढे तेवढे कठीण आव्हान तरी दिसत नाही.

हेही वाचा… राहुल गांधींसोबत पदयात्रेसाठी नागपूर, चंद्रपुरात काँग्रेस नेत्यांचा मॉर्निंग वॉक सुरू

पाच वर्षांपूर्वी झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला अगदी निसटते बहुमत मिळाले होते. काँग्रेसने अक्षरश: भाजपचा घाम काढला होता. गेल्या निवडणुकीप्रमाणे काँग्रेसचा तेवढा दबदबा राहिलेला नसला तरी ही जागा भरून काढण्यासाठी आम आदमी पार्टीने सारा जोर लावला आहे. पाच वर्षांत गुजरातचे राजकीय चित्र बरेच बदलले आहे. काँग्रेसच्या १५ आमदारांनी पक्षाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. करोना परिस्थिती हाताळण्यात भाजप सरकारला अपयश आल्याची टीका झाली होती. तत्कालीन मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी होती. त्यांच्या नेतृत्वाखाली यश मिळण्यााबाबत मोदी-शहा जोडीला साशंकता होती. यातूनच गेल्या वर्षी अचानक रुपानी यांना राजीनामा देण्याचा आदेश देण्यात आला. त्यानंतर भूपेंद्र पटेल या पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलेल्या नेत्यास मुख्यमंत्रीपदावर नियुक्त करण्यात आले. तसेच मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न बघणाऱ्या उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासह सर्व मंत्र्यांना नारळ देण्यात आला. भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली सर्व नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. जुन्या एकाही मंत्र्याचा फेरप्रवेश झाला नाही.

हेही वाचा… भारत जोडो यात्रेसाठी उत्तर महाराष्ट्रातूनही रसद, पण काँग्रेसला लाभ कितपत ?

भाजपने धक्कातंत्र देत नवे मुख्यमंत्री व नव्या मंत्र्यांकडे सारी सूत्रे सोपविली. भूपेंद्र पटेल मुख्यमंत्री असले तरी सारी सूत्रे पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याकडेच आहेत. कारण मुख्यमंत्री बदलूनही फारसा परिणाम झालेला दिसत नाही.

हेही वाचा… सत्तेविना यश संपादन करण्याचे राष्ट्रवादीपुढे आव्हान

काँग्रेसने गेली निवडणूक गांभीर्याने घेतली होती. राहुल गांधी यांनी दौरे केले होते. गुजरातमधील सामाजिक चित्र लक्षात घेता काँग्रेसने सौम्य हिंदुत्वावर भर दिला होता. गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पाटीदार पटेल समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. पोलिसांनी गोळीबार केला होता. त्यातून पटेल समाजात भाजपबद्दल नाराजी होती. पटेल समाजाचे प्राबल्य असलेल्या सौराष्ट्रात काँग्रेसला चांगल्या जागा मिळाल्या होत्या. त्या निवडणुकीत पटेल समाजाच्या नाराजीचा भाजपला फटका बसला होता.

हेही वाचा… देवानंद पवार : शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता

१९९५ पासून भाजप गुजरातमध्ये सत्तेत आहे. मध्ये काही काळ शंकरसिंह वाघेला हे बंड करून काँग्रेसच्या मदतीने मुख्यमंत्रीपदावर होते. हा अपवाद वगळता भाजप सत्तेत असून, प्रत्येक निवडणुकीत भाजपचे ११० पेक्षा जास्त उमेदवार निवडून आले होते. पण २०१७ मध्ये भाजपचे संख्याबळ तिहेरी आकड्यावरून दुहेरी आकड्यावर घटले होते. भाजपचे ९९ आमदार निवडून आले होते. मोदी पंतप्रधान झाल्यावर होणाऱ्या पहिल्याच निवडणुकीत भाजप एकतर्फी निवडणूक जिंकणार आणि १९८५ मध्ये काँग्रेसने जिंकलेल्या १४९ जागांचा विक्रम मोडणार असे चित्र भाजपने रंगविले होते. परंतु मतदारांनी भाजपला धक्का दिला होता. वस्तू आणि सेवा कर, निश्चिलीकरण, आर्थिक आघाडीवरील प्रतिकूल चित्र याचाही फटका भाजपला बसला होता. पण आता काँग्रेसचा प्रभाव मागच्या निवडणुकीसारखा नाही असे चित्र असून अशात आम आदमी पार्टीच्या गुजरात प्रवेशामुळे तिरंगी लढत होऊन विरोधी मतांची विभागणी होऊन त्याचा लाभ भाजपाला होईल अशीच शक्यता जास्त आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three party fight will be beneficial for bjp in gujarat assembly election print politics news asj