काही दिवसांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मित्रपक्षांना धक्का देत भाजपासोबत सत्ता स्थापन केली.सोमवारी विधानसभेत नितीश कुमार सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. विरोधी पक्षाच्या आमदारांनी या ठरावावरील मतदानावर बहिष्कार टाकला होता. मात्र राजदच्या तीन आमदारांनी नितीश कुमार सरकारला आपला पाठिंबा दिल्याने, सरकारला १२९ मतं मिळाली तर विरोधी पक्षाची पाटी कोरी राहिली. या बहुमत चाचणीदरम्यान राष्ट्रीय जनता दल (आरजेडी)चे तीन आमदार आणि जेडी (यू)चा एक आमदार सर्वाधिक चर्चेत राहिले. राजदचे शेओहर येथील आमदार चेतन आनंद, मोकामाच्या आमदार नीलम देवी आणि सूर्यगढचे पाच वेळा आमदार राहिलेले प्रल्हाद यादव यांनी एनडीए सरकारला आपला पाठिंबा दर्शवला. तर जेडीयूचे सीतामढी येथील आमदार दिलीप रे हे या प्रस्तावावेळी अनुपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चेतन आनंद (शेओहर आमदार)

बिहारच्या राजकरणात बाहुबलींचा दबदबा राहिला आहे. यात प्रामुख्याने घेतले जाणारे नाव म्हणजे आनंद मोहन. शेओहरचे आमदार चेतन आनंद हे माजी खासदार आनंद मोहन यांचेच सुपुत्र आहेत. इतर पक्षांनी उमेदवारी नाकारल्यानंतर २०२० साली त्यांनी राजदच्या तिकीटावर निवडणूक लढवली. चेतन यांचे बंधु अंशुमन आनंद यांनी चेतन बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर पाटणा पोलिस रविवारी रात्री माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानी पोहोचले. यानंतरच चेतन आनंद यांचे नाव चर्चेत आले.

चेतन आनंद यांनी २०१५ साली राजकारणात पदार्पण केले. बिहार येथील राम मांझी यांचा पक्ष हिंदुस्थानी आवाम मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. चेतन २०२० साली आई लवली आनंद यांच्यासह राजद मध्ये सामील झाले. चेतन यांचे वडील आनंद मोहन हे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जवळचे मानले जातात. गोपालगंजचे माजी जिल्हा दंडाधिकारी जी. कृष्णैया यांच्या लिंचिंग (झुंडबळी)मध्ये दोषी ठरल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.तेव्हा नितीश कुमार सरकारने त्यांची तुरुंगातून लवकर सुटका करण्याचे आदेश दिले होते. आनंद मोहन किंवा त्यांची पत्नी लवली आनंद दोघेही लोकसभा निवडणूक लढवू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. चेतन यांना विधानसभेतून अपात्र ठरवले जाण्याची शक्यता आहे.

नीलम देवी (मोकामा आमदार)

नीलम देवी या मोकामातील बाहुबली नेता आणि माजी आमदार अनंत सिंह यांच्या पत्नी आहेत. २०२२ च्या पोटनिवडणुकीत राजदच्या तिकिटावर त्या मोकामा आमदार म्हणून निवडून आल्या. त्यांनी सभागृहात राजदचे प्रतिनिधित्व केले असले तरी एनडीएकडे त्यांचा कल राहिला आहे. नीलम देवी यांनी २०१९ मध्ये मुंगेर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. ज्यात जेडी(यू ) चे राजीव रंजन सिंह यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला.

प्रल्हाद यादव (सूर्यगढ आमदार)

सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार, प्रल्हाद यादव यांनी जेडी (यू)च्या ज्येष्ठ नेत्याशी असलेल्या सौहार्दपूर्ण संबंधांमुळे नितीश सरकारला मतदान केले. प्रदीर्घ काळ वाळू व्यवसायात कार्यरत असलेले प्रल्हाद यादव पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहे. यादव यांनी १९९५ साली भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय) सह आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात करून पहिली निवडणूक जिंकली. २००० मध्ये ते राजदमध्ये सामील झाले.

हेही वाचा : बहुमत चाचणी म्हणजे काय? नितीश कुमारांना बहुमत चाचणी का द्यावी लागली?

सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार, तीन आमदारांनी नितीश सरकारला समर्थन केले असले तरी जोवर अपात्रतेची कारवाई सुरू होत नाही तोवर ते राजदचेच आमदार राहतील.दरम्यान, जेडी (यू)चे आमदार सुधांशू रंजन यांनी विश्वासदर्शक ठरावाला अनुपस्थित राहिलेले जेडी दिलीप रे यांचे अपहरण केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध तक्रार दाखल केली. दिलीप रे यांनी २०२० च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील पक्षात प्रवेश केला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three rjd mla cross vote in floor test rac
Show comments