नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणातील सद्यस्थितीवर भाष्य करताना व्यक्त केलेल्या ( ‘ कधी कधी असे वाटते की राजकारण सोडून द्यावे’) ‘ प्रतिक्रियेचा रोख नेमका कोणाकडे होता, याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. नागपुरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.गिरीश गांधी यांच्या सत्कार सोहळ्यात गांधी यांच्या समाजकारणाचा परिचय करून देताना गडकरी यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले. ‘कधी कधी असे वाटते की,राजकारण सोडून द्यावे’. केंद्र सरकारमधील गडकरी यांचे स्थान लक्षात घेता गडकरी यांचे मत महत्त्वाचे ठरते. राज्यातील सत्तांतरात भाजपचा असलेला सहभाग लपून राहिला नाहीं. यातून भाजपची सत्तालालसा उघड झाली. तसेच केंद्राकडूनही विरोधकांना संपवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, हेही लपून राहिलेले नाही. त्यामुळेच गडकरी यांनी व्यक्त केलेल्या भावनांचा रोख केंद्रातील नेतृत्वाविरुद्ध आहे की, राज्यातील भाजप नेत्यांविरूध्द, या मुद्द्यावर सध्या तर्कवितर्क सुरू आहेत.
हेही वाचा… मराठवाड्यातील लातूर व परभणीत मुख्यमंत्र्यांकडून समर्थकांचा शोध
विशेष म्हणजे गडकरी त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या राजकारणाचा कलही समाजकारणाकडे झुकणारा आहे. जात, धर्म आणि व्यक्ती द्वेष या मुद्द्यांना त्यांच्या राजकारणात स्थान नाही.म्हणूनच त्यांना मानणारा मोठा वर्ग सर्वसमावेशक स्वरूपाचा आहे. सध्याच्या परिस्थितीत राजकारणाचा उद्देशच सत्ताकारण झाल्याचे चित्र सार्वत्रिक असल्याने उदिग्न होऊन गडकरी यांनी ‘ राजकारण सोडून द्यावेसे वाटते ‘ अशी भावना व्यक्त केली असावी अशीही चर्चा आहे.