कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही मतदारसंघांतील पोटनिवडणुका बिनविरोध करून उच्च परंपरांचे पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना केले असले तरी अलीकडच्या काळात माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर पलूस-कडेगाव या मतदारसंघातील पोटनिवडणुकीत विश्वजीत कदम यांच्या बिनविरोध निवडीचा अपवाद वगळल्यास बहुतांशी पोटनिवडणुकांमध्ये चुरशीच्या लढती झाल्या आहेत.
हेही वाचा- “भाजपाने विधानसभा अपवित्र केली, आम्ही सत्तेत आल्यास…”, डीके शिवकुमार यांचा हल्लाबोल
अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेतली होती. यामुळे कसबा पेठ आणि चिंचवड या भाजपच्या आमदारांच्या निधनाने होत असलेल्या पोटनिवडणुका बिनविरोध करण्याची मागणी होऊ लागली. मुख्यमंत्री शिंदे यांनी तर विरोधकांना पोटनिवडणुका बिनविरोध करण्याचे आवाहन केले. पण राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस या महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्ष पोटनिवडणुका लढविण्यावर ठाम आहेत.
अलीकडच्या काळात राज्यात लोकसभा वा विधानसभेच्या पोटनिवडणुका बिनविरोध झाल्याची फार कमी उदाहरणे आहेत. २०१८ मध्ये माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पलूस-कडेगाव मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध झाली होती. तेव्हा भाजपच्या उमेदवाराने शेवटच्या दिवशी माघार घेतली होती. यामुळे काँग्रेसचे विश्वजीत कदम हे बिनविरोध निवडून आले होते.
विद्ममान १४व्या विधानसभेतील सहा आमदारांचे आतापर्यंत निधन झाले. त्यापैकी चार मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक झाली. चारही मतदारसंघांमध्ये लढती झाल्या आहेत. फक्त अंधेरी पूर्व मतदारसंघात भाजपच्या माघारीमुळे शिवसेनेच्या विरोधात अपक्षच रिंगणात होते. यामुळे या पोटनिवडणुकीची फक्त औपचारिकता होती. भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपने भालके यांच्या पुत्राचा पराभव केला होता. देगलूर आणि कोल्हापूर उत्रर मतदारसंघांच्या जागा पोटनिवडणुकीत काँग्रेसने कायम राखल्या होत्या. विशेष म्हणजे पंढरपूर, देगलूर आणि कोल्हापूर उत्तर या तीन मतदारसंघांतील पोटनिवडणुका भाजपने प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. यापैकी पंढरपूर भाजपने जिंकली होती तर उर्वरित दोन मतदारसंघांत भाजपची डाळ शिजू शकली नव्हती.
चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर पालघर मतदारसंधातील पोटनिवडणूक चुरशीची झाली होती. राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभा तर शरद रणपिसे .यांच्या निधनानंतर विधान परिषदेची पोटनिवडणूक बिनविरोध झाल्या होत्या. राज्यसभा किंवा विधान परिषद बिनविरोध झाल्या असल्या तरी लोकसभा वा विधानसभेच्या पोटनिवडणुका अलीकडच्या काळात बिनविरोध झालेल्या नाहीत.