महेश सरलष्कर
भाजपने कर्नाटकच्या २३ उमेदवारांची दुसरी यादी बुधवारी रात्री उशिरा जाहीर केली असली तरी, त्यामध्ये माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांच्या हुबळी-धारवाड (मध्य) विधानसभा मतदारसंघाचा समावेश केलेला नाही. नव्या यादीत आणखी सात विद्यमान आमदारांना उमेदवारी नाकारली गेल्यामुळे आत्तापर्यंत १६ आमदारांची गच्छंती झाली आहे.
भाजपने १८९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून राज्यातील भाजपचा चेहरामोहरा बदलण्यासाठी पाऊल टाकल्याचे स्पष्ट झाले होते. या यादीत नऊ तर, दुसऱ्या यादीत आणखी सात विद्यमान आमदारांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामध्ये ज्येष्ठ नेत्यांचाही समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत प्रदेश भाजपची सूत्रे हळुहळू नव्या पिढीकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे ५२ नव्या चेहऱ्यांना संधी दिली गेली. भाजपच्या या ‘गुजरात प्रारुपा’मुळे कर्नाटकातील जगदीश शेट्टार यांच्यासारखे बुजुर्ग नेत्यांमध्ये कमालीचे अस्वस्थ झाले आहेत.
हेही वाचा >>>काही मुख्यमंत्री करोडपती तर काही लखपती; जाणून घ्या एकाच क्लिकवर संपूर्ण यादी
जगदीश शेट्टार यांना संधी?
हुबळी-धारवाड (मध्य) विधानसभा मतदारसंघातून सहा वेळा जिंकणारे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार हे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे निकटवर्तीय मानले जातात. शेट्टार यांना दोन्ही यादींमध्ये स्थान मिळाले नसले तरी, ‘त्यांना उमेदवारी मिळेल’, असे जाहीर विधान येडियुरप्पा यांनी केले आहे. हा येडियुरप्पांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला अप्रत्यक्षपणे इशारा असल्याचे मानले जाते. शेट्टार बंडाच्या पवित्र्यात असून त्यांनी बुधवारी पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. त्यानंतरही, उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचे संकेत शेट्टार यांनी दिले. येडियुरप्पा यांच्यासारख्या प्रभावी लिंगायत नेत्याला नाराज करण्यापेक्षा नमते घेऊन शेट्टार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून घेतला जाऊ शकतो. शेट्टार यांच्या मतदारसंघासह १२ जागांवरील उमेदवार अजून घोषित झालेले नाहीत.
हेही वाचा >>>राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किती राष्ट्रीय पक्ष होते? जाणून घ्या…
जातींचे गणितही साधले!
भाजपच्या पहिल्या यादीमध्ये काँग्रेसमधून आलेल्या १२ आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यांनी २०१९ मध्ये राज्यात सत्ता मिळवून दिल्याबद्दल एकप्रकारे कृतज्ञता व्यक्त केली गेली. पक्षांतर करून भाजपमध्ये आल्यास त्यांच्या ‘योगदाना’कडे दुर्लक्ष केले जाणार नाही, असा संदेश भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने दिला आहे. भाजपने ५२ नवे उमेदवार रिंगणात उतरवले असले तरी, आत्तापर्यंत पक्षाच्या ९२ विद्यमान आमदारांनाही पुन्हा संधी दिली आहे. शिवाय, जातीचे गणितही साधण्यात आले आहे. कर्नाटकमध्ये लिंगायत व वोक्कलिग हे दोन प्रभावी समाज असून पहिल्या यादीत भाजपने ५१ लिंगायत तर, ४१ वोक्कलिग उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. भाजप मुस्लिमांना उमेदवारी देत नाही, कर्नाटकमध्येही हे धोरण कायम ठेवण्यात आले आहे.