प्रदीप नणंदकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समोरच्याला संशयाच्या चक्रात गुंतवून ठेवणे, त्याच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे असा कुटील डाव सध्या भाजपने विविध पक्षाच्या नेत्यांवर टाकला असून त्यामुळे समोरच्यांना केवळ खुलासे करण्यातच अडकून राहावे लागते. क्रिकेटमध्ये जसा समोरचा गोलंदाज गुगली टाकून फलंदाजाला गुंतवून ठेवतो त्याच पद्धतीने भाजपने गेल्या काही वर्षापासून विविध राजकीय पक्ष ,संघटना ,संस्था मध्ये काम करणाऱ्या व लोकांमध्ये ज्यांचे नाव आहे अशा मोजक्या लोकांना हेरून त्यांच्यावर संशयाचे प्रश्न निर्माण करणे ,त्यांच्या निष्ठेविषयी शंका उत्पन्न करणे असा कुटी ल डाव टाकते सुरू केले आहे .महाराष्ट्रात नांदेडमध्ये भारत जोडो यात्रा प्रारंभ होणार होती त्यापूर्वीच विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत अनुपस्थित राहिल्याचे कारण दाखवत अशोक चव्हाण भाजपमध्ये येणार अशी चर्चा सुरू करण्यात आली. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण भाजपात आले तर त्यांचे स्वागतच होईल अशी टिपणीही केली .त्यामुळे केवळ नांदेड जिल्ह्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार का ?अशी चर्चा सुरू झाली त्यानंतर अशोक चव्हाण यांची खुलासे देण्यात दमछाक झाली .

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख यांच्यावर हा प्रयोग गेल्या काही वर्षापासून सुरू असून त्यांना सतत या संबंधात खुलासे करावे लागत आहेत . आतापर्यंत तीन वेळा त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू करण्यात आली. महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करणे, एकच गोष्ट सतत सांगत राहणे या गोबेल तंत्रज्ञानाचा वापर भाजपामध्ये केला जातो आहे. ‍‘तू कर मारल्यावाणी मी करतो‍ रडल्यावाणी ’ अशी एक ग्रामीण भागात म्हण आहे. समोरच्याला अडकवून टाकायचं .कोणीतरी स्वागत करायचं कोणीतरी विरोध करायचा या पद्धतीने समोरच्याचे जाणीवपूर्वक खच्चीकरण केले जाते. माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूरचे प्रिन्स हे भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत त्यांनी तशी व्यूहरचना केली आहे मात्र त्यांना आम्ही भाजपमध्ये घेणार नाही असे सांगितले तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध पक्षातील मातब्बर मंडळी भाजपामध्ये येतील अशी प्रतिक्रिया दिली यातूनच जाणीवपूर्वक कार्यकर्त्यात संभ्रम निर्माण होतो आहे.
सांगली जिल्हातील विटा येथे जयदेव बर्वे यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांनी या वाड्यात गेल्या अनेक वर्षापासून संघाची शाखा लागते त्यामुळे या निमित्ताने अमित देशमुख यांनी भाजपमध्ये यावे असे त्यांना खुले आवाहन करण्याची संधी घेतो असे सांगितले तर तातडीने अमित देशमुख यांनी संजय काका यांनीच स्वगृही यावे असे सांगत जसा बर्वेवाडा वर्षांनुवर्षे शाबूत आहे तसाच बाभळगावचा देशमुख वाडा ही शाबूत आहे. कितीही वादळे ,वारे आले तरी त्याला काही फरक पडणार नाही अशा शब्दात आपण आहोत तिथे बरे आहोत कुठेही जाणार नाहीत असा खुलासा केला .मात्र हा खुलासा झाला असला तरी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज मात्र सुरूच राहते आहे.

हेही वाचा… Budget 2023 : “मी मध्यमवर्गीयच, तुमच्या त्रासाची मला कल्पना आहे”; बजेटपूर्वी निर्मला सीतारामन यांचे आश्वासक उद्गार

हेही वाचा… “न्यायपालिकेवर ताबा मिळवण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न, पण…”, कपिल सिब्बल यांचं टीकास्त्र

कुजबुज नीती फार जुनी-उल्हासदादा पवार

रा.स्व. संघाच्या कार्यकर्त्यांची ही खासियत असून सतत वेगवेगळ्या पद्धतीने अन्य संस्था, राजकीय पक्ष यांना पोखरण्यासाठी जे जे तंत्रज्ञान वापरावे लागते अशा सर्व तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो .त्यातूनच अन्य पक्षांच्या किंवा संस्थांच्या कार्यकर्त्यांच्या निष्ठेवर शिंतोडे उडवले जातात ,वातावरण निर्मिती होते .प्रत्येकजण सहनशील व संयमी असतील असे नाही अशी तिखट प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी आमदार उल्हास पवार यांनी व्यक्त केली. त्यातून वादावादी होते व कार्यकर्त्यात संभ्रम निर्माण होतो. हेच साध्य करण्यासाठी अशी नीती भाजपा वापरत आहे .या नीतीचा लाभ व्हावा यासाठीची त्यांची धडपड असून आता ही नीतीच सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समजून घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Times come on congress leader to explain over bjps speculations print politics news asj