प्रसिद्ध गायक के.के यांच्या मृत्यूनंतर पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी पक्ष असणाऱ्या तृणमूल काँग्रेसवर मोठया प्रमाणात टीका केली जात आहे. तृणमूल काँग्रेसची विद्यार्थी संघटना असणाऱ्या तृणमूल छात्र परिषदेने कोलकाता येथील गुरुदास कॉलेज फेस्टमध्ये एका म्युझिकल प्रोग्रामचे आयोजन केले होते. या कार्यक्रमानंतर केके या नावाने प्रसिद्ध असलेले गायक कृष्णकुमार कुन्नाथ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या घटनेच्या जवळपास तीन आठवड्यांनंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार डॉ. सौगता रॉय यांनी कॉलेज फेस्टच्या आयोजनाव प्रचंड पैसा खर्च करण्यावरून तृणमूल काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे.

गेल्या रविवारी बारानगरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना रॉय म्हणाले की “तुम्हाला अशा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित करायचे असतील तर तुम्हाला रिअल इस्टेट डेव्हलपर किंवा स्थानिक नेते यांची मदत घ्यावी लागते. ते योग्य आहे का? मुंबईतील महागड्या लोकप्रिय कलाकारांना बोलवून कार्यक्रम करण्याच्या ट्रेंडमागील तर्क मला समजत नाही. केकेच्या शोसाठी तीस ते चाळीस लाख रुपये खर्च झाल्याचे मी ऐकले आहे. एवढा पैसा आला कुठून? हवेतून तर नक्कीच नाही असे मला वाटते”.

केके याचे ३१ मे रोजी वयाच्या ५३ व्या वर्षी कोलकाता येथे निधन झाले. तो दोन दिवसांच्या कार्यक्रमासाठी कोलकाता येथे आला होता. गुरुदास महाविद्यालयाच्या नझरूल मंचच्या वार्षिक महोत्सवात सादरीकरण सुरू असताना त्याला त्रास होऊ लागला. त्याला तातडीने सीएमआरआय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. केकेच्या मृत्यूनंतर त्याच्या शेवटच्या कार्यक्रमाचे व्हिडिओ शोधल मीडियावर व्हायरल झाले. या व्हिडिओमध्ये कार्यक्रमस्थळी भरपूर गर्दी दिसत होती. या कार्यक्रमाच्या गैरव्यवस्थापनावर आणि विविध त्रुटींवर प्रश्न उपस्थित केले गेले होते.विद्यार्थ्यांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम किंवा वार्षिक उत्सव आयोजित करण्यात विद्यार्थी संघटनांची भूमिका महत्त्वाची असते. महाविद्यालयांमधील विद्यार्थी संघटनांवर आणि त्यांच्या खर्चिक कार्यक्रमांच्या आयोजनावर रॉय यांनी केलेली टिप्पणी महत्वाची मानली जात आहे.

राज्यभरातील बहुतांश महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील विद्यार्थी संघटनांवर टीएमसीपीचे वर्चस्व आहे.रॉय यांच्या टिकेनंतर टीएमसीपीचे प्रदेशाध्यक्ष त्रिंंकुर भट्टाचार्य म्हणाले की “मी ज्येष्ठ खासदार सौगता रॉय यांना खर्चाचा तपशील पाठवला आहे. ते पक्षाचे दिग्गज नेते आहेत. मला वाटतं त्यांचा काही गैरसमज झाला होता. मी त्याला सर्व तपशील दिले आहेत आणि माझ्या अभिप्रायाने त्यांचे समाधान झाले आहे”.

पुढे बोलताना भट्टाचार्य यांनी स्पष्ट की, “ कुठल्याही विद्यार्थी संघटनांनी या फेस्टला निधी दिला नाही. निधी नसल्यामुळे महाविद्यालयांनी गेल्या तीन वर्षांपासून सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले नव्हते. फेस्ट आयोजित करण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून प्रत्येक विद्यार्थ्याकडून निधी गोळा करण्यात आला होता. जमा झालेले पैसे बँक खात्यात जमा करण्यात आले. आयोजनासाठी एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची नेमणूक करण्यात आली होती आणि आम्ही थेट खात्यामधून त्या कंपनीला पैसे दिले आहेत. दोन फेस्ट आयोजित करण्यासाठी एकूण वीस लाख पन्नास हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत”.

Story img Loader