तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते फिरहाद हकीम यांच्या दक्षिण कोलकाता येथील निवासस्थानावर रविवारी (८ ऑक्टोबर) केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) छापेमारी केली. महापालिकेतील कथित भरती घोटाळ्यासंदर्भात ही कारवाई करण्यात आली आहे. याआधीही हकीम यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आलेले आहे. हकीम हे तृणमूल काँग्रेसच्या सर्वांत वरिष्ठ नेत्यांपैकी आहेत. त्यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर तृणमूल काँग्रसने आक्रमक पवित्रा धारण केला आहे.
हकीम यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप
हकीम हे तृणमूल काँग्रेस पक्षातील महत्त्वाचे आणि ज्येष्ठ नेते आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे ते विश्वासू असल्याचे म्हटले जाते. कथित महापालिका भरती गैरव्यवहारप्रकरणी त्यांच्या निवासस्थानी सीबीआयने छापेमारी केली आहे. याआधी २०१६ साली नारदा स्टिंग ऑपरेशन प्रकरणात त्यांनी लाच घेतल्याचा आरोप केला जातो. याच प्रकरणात २०१७ आणि मे २०२१ मध्ये सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हकीम यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. मात्र कालांतराने त्यांना जामीन मिळाला होता. तृणमूल काँग्रेसच्या अंतर्गत सूत्रांनुसार नारदा प्रकरणामुळेच हकीम आणि तृणमूल काँग्रेस पक्षातील द्वितीय क्रमांकाचे नेते अभिषेक बॅनर्जी यांच्यात मतभेद निर्माण झाले होते.
हकीम राजकारणातले बॉबी दा
हकीम हे शहर विकास मंत्री आहेत. त्यांना पश्चिम बंगालच्या राजकारणात बॉबी दा म्हटले जाते. हकीम हे १९९८ सालापासून तृणमूल काँग्रेसमध्येच आहेत. सध्या ते कोलकाता पोर्ट या मतदारसंघाचे आमदार आहेत. याआधी ते परिवहन आणि गृहनिर्माणमंत्री होते. २००९ सालच्या पोटनिवडणुकीत ते अलीपूर येथून निवडून आले होते. त्यांनी याआधी दोन वेळा कोलकाताचे महापौर म्हणूनही काम पाहिलेले आहे. माजी महापौर सोवान चटर्जी यांचे निधन झाल्यानंतर नोव्हेंबर २०१८ साली हकीम यांच्याकडे कोलकाताचे महापौरपद आले होते. त्यानंतर २०२१ साली पुन्हा एकदा ते कोलकाताचे महापौर झाले होते.
पक्षात मतभेद आणि वाद
हकीम हे तृणमूल काँग्रेसमधील जुने आणि अनुभवी नेते म्हणून ओळखले जातात. मात्र अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्यात वेगवेगळ्या मुद्द्यांवरून मतभेद असल्याचे समोर आलेले आहे. २०२१ साली या द्वयींतील मतभेद सर्वप्रथम समोर आले होते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठीच्या उमेदवारांच्या यादीवरून या दोन्ही नेत्यांत मतभेद निर्माण झाले होते. अभिषेक यांनी हकीम यांच्या उमेदवारांची यादी नाकारून स्वत:ची स्वतंत्र यादी जाहीर केली होती. नेत्यांच्या नातेवाईकांना तसेज ज्यांच्यावर वेगवेगळे आरोप आहेत, अशांना उमेदवारी देऊ नये, अशी भूमिका अभिषेक यांनी घेतली होती. हा वाद नंतर ममता बॅनर्जी यांच्याकडे गेला होता. ममता बॅनर्जी यांनी हकीम यांनी सुचवलेलेच उमेदवार निवडणुकीत उभे करण्यात आले होते.
पार्किंगच्या भाडेवाढीमुळे वाद
कोलकाता महानगरपालिकेने पार्किंग फीस वाढवल्यामुळेही अभिषेक आणि हकीम यांच्यात वाद झाला होता. महापालिकेच्या महापौरांनी पार्किंगची भाडेवाढ केल्यानंतर साधारण आठवड्यानंतर अभिषेक यांच्या गटातील नेते कुणाल घोष यांनी या धोरणावर उघड टीका केली होती. सामान्य लोकांच्या डोक्यावर हा बोजा टाकला आहे, असे ते म्हणाले होते. तसेच मुख्यमंत्र्यांना कोणतीही कल्पना न देताच ही भाडेवाढ करण्यात आली आहे, असेही घोष म्हणाले होते. या टीकेनंतर महापौरांना पार्किंगच्या भाडेवाढीचा निर्णय मागे घ्यावा लागला होता.
मतभेद बाजूला सारून अनेकवेळा एकत्र
दरम्यान, या दोन्ही नेत्यांमध्ये अनेकदा वाद झालेला असला तरी आपले मतभेद बाजूला ठेवून ते अनेकवेळा एकाच मंचावर आलेले आहेत. हे दोन्ही नेते ममता बॅनर्जी यांचे विश्वासू मानले जातात. केंद्राने निधी रोखल्याच्या निषेधार्थ तृणमूल काँग्रेसने राजभवनावर मोर्चा काढला होता. या मोर्चादरम्यान हे दोन्ही नेते एकत्र दिसले होते.