TMC Mamata Banerjee Abhishek Banerjee cold war : पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसमधये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत धुसफूस सुरू आहे. ममता बॅनर्जी आणि त्यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांच्या समर्थकांमधील मतभेदांमुळे तृणमूल काँग्रेस (TMC)मध्ये हे अंतर्गत वाद सुरू आहेत. यादरम्यान गेल्या काही दिवसात घडलेल्या घडामोडींमधून पक्षांतर्गत हे वाद आणि नेत्यांमधील दुफळी ही खूप खोलवर गेल्याचे बोलले जात आहे. अभिषेक बॅनर्जी आणि ममता बॅनर्जी यांच्यातील कोल्ड वॉरच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
अभिषेक बॅनर्जी यांचे तृणमूल काँग्रेस पक्षातील स्थान हे ममता बॅनर्जी यांच्यानंतर दुसर्या क्रमांकाचे आहे. मात्र अभिषेक बॅनर्जी यांचे पक्षातील काही नेत्यांबरोबर मतभेद आहेत. कोलकाता येथील आरजी कार रुग्णालयात महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्या प्रकरण टीएमसी सरकारने ज्या पद्धतीने हाताळले यावर अनेकांनी टीका केली. दरम्यान आता पक्षावर टीका करणाऱ्या कलाकारांवर बहिष्कार टाकण्याची मागणी पक्षातील काही नेत्यांकडून केली जात आहे. याला अभिषेक बॅनर्जी यांचा विरोध आहे. या मुद्द्यावरून अभिषेक बॅनर्जी यांचे पक्षातील काही नेत्यांबरोबर मतभेद उघड झाले आहेत. यातच नुकतेच ममता बॅनर्जी यांनी अभिषेक बॅनर्जी यांच्या निकटवर्ती मंत्र्यांवर केलेल्या टीकेमुळे हे मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.
स्थानिक टीएमसी कौन्सिलरने नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेला गायीका लग्नजीता चक्रवर्ती यांचा कार्यक्रम रद्द केला होता, यानंतर पक्षाचे वरिष्ठ प्रवक्ते कुणाल घोष यांनी एक्सवर ३१ डिसेंबर रोजी केलेल्या पोस्टमध्ये लोकांना आंदोलन करण्याचे स्वातंत्र्य आहे आणि कलाकारांना मोर्चा काढण्याचे स्वातंत्र्य असल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी पुढे लिहीले होते की, “मात्र जे कलाकार जाणून बुजून बदनामी करतात, मुख्यमंत्री, सरकार आणि पक्ष यांच्यावर वाईट शब्दात टीका करतात, सरकार पाडण्याची भाषा करतात, तृणमूल समर्थकांचा अपमान करतात आणि खोटी माहिती पसरवतात, ते तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी आयोजित केलेल्या कोणत्याही कार्यक्रमातील मंचावर दिसू नयेत. त्यांच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे. तृणमूलच्या कोणत्याही नेत्याला शंका असल्यास त्यांनी वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करावी. पक्ष कार्यकर्ते आणि समर्थकांच्या भावनांचा आदर करा”.
लाग्नजीता याच्याबरोबरच डेबलीना दत्ता यांनी देखील आरजी कार आंदोलनात सरकारविरोधात भूमिका घेतली होती, त्यांनीदेखील गेल्या काही दिवसात त्यांचे किमान चार कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती दिली आहे.
खासदार आणि टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी या मुद्द्यावरून घोष यांच्यावर निशाणा साधला होता. एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, “पक्षाच्या वतीने कोणी असे म्हटले आहे का? तुम्ही यासंबंधी कुठली नोटीस पाहिली आहे का? ममता बॅनर्जी किंवा मी, सरचिटणीस म्हणून काही बोललो का? ते कुठे, कोणासोबत, कधी गातील याबद्दल मला कोणावरही जबरदस्ती करायची नाही. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे”. अभिषेक बॅनर्जी यांनी यापूर्वी टीएमसी सरकारने ज्या पद्धतीने आरजी कार प्रकरण हातळले याबद्दल देखील वेगळी भूमिका घेतली होती.
हेही वाचा>> उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणाऱ्या तरुणाला अटक, समाजमाध्यमांवरून दिली होती मारण्याची धमकी
यानंतर एका तासभराच्या आत, टीएमसीच्या प्रवक्ते घोष यांनी एक्सवर पोस्ट करत लिहिले की, “निषेध आणि निषेधाच्या नावाखाली ठरवून केलेली असभ्यता यात फरक आहे. तृणमूल कार्यकर्त्यांचा विवेक या प्रकरणात न्याय करेल आणि या संदर्भात, पक्षाच्या सर्वोच्च नेत्या, अध्यक्षा ममता बॅनर्जी , ज्यांना या मुद्द्यावर सर्वाधिक टीका आणि कारस्थाने सहन करावे लागले आहेत, त्या जे काही म्हणतील, तो शेवटचा शब्द असेल”.
तृणमूल काँग्रेस पक्षात अभिषेक बॅनर्जी यांचे टीकाकार असणारे ज्येष्ठ टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी देखील घोष यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले की “सर्व टीएमसी कार्यकर्त्यांच्या भावना या ममता बॅनर्जी यांच्याभोवती एकवटलेल्या आहेत. त्यांचा अपमान करणाऱ्या आणि त्यांच्याबद्दल अपमानकारक शब्द वापरणाऱ्या कोणालाही आम्ही आमच्या कार्यक्रमात का येऊ देऊ? आरजी कारच्या आंदोलनादरम्यान मला बरेच नेते बोलताना दिसले नाहीत. कुणाल घोष बोलले, मी बोललो. कुणाल घोष यांनी तृणमूलला पाठिंबा दिल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयातून बाहेर काढण्यात आलेल्या कनिष्ठ डॉक्टरांनाही पाठिंबा दिला. मी त्यांच्यासाठी कोर्टात लढलो”.
हेही वाचा>> छत्तीसगडमध्ये पोलिसांच्या वाहनावर नक्षलवाद्यांकडून स्फोटक हल्ला; नऊ पोलीस जागीच ठार!…
अभिषेक आणि ममता बॅनर्जी यांच्यातील वाढलेल्या या तणावाचे मूळ हे पक्षातील संघटनात्मक फेरबदलांना झालेला उशीर हे असल्याचे टीएमसीमधील सूत्रांचे म्हणणे आहे. गेल्या काही महिन्यापासून लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी न केलेल्या जिल्ह्यांचे अध्यक्ष बदलले जावेत असा अभिषेक बॅनर्जी यांचा प्रयत्न आहे.