लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळेच विरोधकांच्या इंडिया आघाडीत जागावाटपाच्या प्रक्रियेला वेग आला आहे. मात्र पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस या आघाडीतील घटकपक्षांत जागावाटपावर एकमत होत नाहीये. काँग्रेसशी आम्ही जागावाटपावर चर्चा करणार नाही, अशी भूमिका तृणमूलने घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर आता तृणमूल काँग्रेसचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी काँग्रेसवर टीका केली. त्यामुळे या दोन्ही पक्षांतील नाराजी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
अभिषेक बॅनर्जी यांच्या विधानामुळे मतभेद वाढणार?
शुक्रवारी (१२ जानेवारी २०२४) आसामच्या नॉर्थ काचार हिल्स ऑटोनॉमस कौन्सिलच्या (NCHAC) निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांनी आपले उमेदवार उभे केले होते. मात्र या दोन्ही पक्षांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. काँग्रेसला तृणमूल काँग्रेसपेक्षा कमी मते मिळाली आहेत. हीच संधी साधत अभिषेक बॅनर्जी यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपावरून दोन्ही पक्षांत मतभेद निर्माण झालेले असताना अभिषेक यांच्या या टीकेमुळे काँग्रेस नाराज होण्याची शक्यता आहे. NCHAC च्या निवडणुकीत एकूण २८ पैकी २५ जागांवर भाजपाचा विजय झाला आहे.
अभिषेक बॅनर्जी काय म्हणाले?
“तृणमूल काँग्रेसने NCHAC ची निवडणूक पहिल्यांदाच लढवली. मात्र तरीदेखील आम्हाली काँग्रेसपेक्षा अधिक मते मिळाली. ते स्वत:चा बालेकिल्ला राखू शकलेले नाहीत. मात्र पश्चिम बंगालमध्ये त्यांना अधिक जागा हव्या आहेत,” अशी प्रतिक्रिया अभिषेक बॅनर्जी यांनी एक्सवरील पोस्टच्या माध्यमातून दिली.
तृणमूलला मिळाली अधिक मते
NCHACच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने एकूण ११ जागा लढवल्या होत्या. तर काँग्रेसने २२ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. तृणमूल काँग्रेसला १२.४ टक्के मते मिळाली आहे. तर काँग्रेसला या २२ जागांवर मिळालेल्या मतांचे प्रमाण ८.८७ टक्के आहे.
चर्चा करण्यास तृणमूलचा नकार
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या पाच सदस्यीय राष्ट्रीय आघाडी समितीकडून इतर पक्षांशी जागावाटपावर चर्चा केली जात आहे. या समितीत अशोक गेहलोत, भूपेश बघेल, मुकूल वासनिक, सलमान खुर्शीद आणि मोहन प्रकाश आदी काँग्रेसच्या नेत्यांचा समावेश आहे. मात्र, समितीच्या या सदस्यांशी चर्चा न करण्याची भूमिका तृणमूल काँग्रेसने घेतली आहे. या समितीने आतापर्यंत समाजवादी पार्टी, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी, आम आदामी पार्टी, राजद या पक्षांशी चर्चा केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या सूत्रानुसार तृणमूल काँग्रेस मालदा दक्षिण आणि बहरामपूर या दोन जागा काँग्रेसला देण्यास तयार आहे.
“ममता बॅनर्जी यांच्या औदार्याची गरज नाही”
काँग्रेसने मात्र तृणमूल काँग्रेसचा हा प्रस्ताव याआधीच फेटाळलेला आहे. पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी यावर प्रतिक्रिया दिली. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाने याआधीच मालदा दक्षिण आणि बहरामपूर या दोन्ही जागा जिंकलेल्या आहेत, त्यामुळे आम्हाला ममता बॅनर्जी यांच्या औदार्याची गरज नाही. मी ममता बॅनर्जी आणि भारतीय जनता पार्टी यांच्याविरोधात लढू शकतो. मी तसेच माझे सहकारी त्या दोन्ही जागांवरून समर्थपणे लढू शकतो, असे अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले.
“…तर आणखी एखादी जागा देऊ”
तर तृणमूल काँग्रेसनेही आपल्या प्रस्तावावर प्रतिक्रिया दिली. “आम्ही काँग्रेसला दोन जागा देण्याची तयारी दाखवलेली आहे. बंगालमधील ४२ जागांपैकी या दोन जागांवर काँग्रेसला ३० टक्के मते मिळाली होती, त्यामुळे काँग्रेस पक्ष आणखी जागा कशा मागू शकतो. काँग्रेसच्या नेतृत्वाने ममता बॅनर्जी यांच्याशी थेट चर्चा केल्यास आम्ही आणखी एखादी जागा त्यांना देऊ शकतो, त्यामुळे काँग्रेसच्या आघाडी समितीशी चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही. आम्ही दिलेला प्रस्ताव अगदी सरळ आणि स्पष्ट आहे,” असे तृणमूल काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.
खरगे इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी
दरम्यान, नुकतेच इंडिया आघाडीची एक बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी समन्वयक पदाची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला. सर्वांचे एकमत झाल्याशिवाय मी ही जबाबदारी स्वीकारणार नाही, असे नितीश कुमार म्हणाले आहे. या बैठकीला ममता बॅनर्जी उपस्थित नव्हत्या.