तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर ‘कॅश फॉर क्वेरी’चे आरोप करण्यात आले आहेत. अदाणी समूहाला लक्ष्य करणारे प्रश्न लोकसभेत विचारण्यासाठी हिरानंदानी उद्योग समूहाकडू पैसे व किमती भेटवस्तू घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. तसे पत्र भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेच्या अध्यक्षांना दिले होते. या आरोपामुळे मोईत्रा यांचे नाव चर्चेत आहे. असे असतानाच आता तृणमूल काँग्रेसने मोईत्रा यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
मोईत्रा यांच्याकडे कृष्णनागर जिल्ह्याचे अध्यक्षपद
गेल्या अनेक दिवासांपासून मोईत्रा या चर्चेत आहेत. संसदे प्रश्न विचारण्यासाठी मोईत्रा यांनी पैसे घेतल्याचा आरोप झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. तसेच तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनीदेखील आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. असे असतानाच आता तृणमूलने मोईत्रा यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्याकडे कृष्णनगर या जिल्ह्याचे अध्यक्षपद सोपवण्यात आले आहे.
मोईत्रा यांनी मानले ममता बॅनर्जींचे आभार
ही नवी जबाबदारी मिळाल्यानंतर मोईत्रा यांनी पक्षाचे तसेच ममता बॅनर्जी यांचे आभार मानले आहेत. मी नेहमीच पक्षासोबत कृष्णनगरच्या जनतेसाठी काम करेन, असे आश्वासन मोईत्रा यांनी यावेळी दिले. याआधीही मोईत्रा याच जिल्ह्याच्या अध्यक्ष होत्या. मात्र गेल्या काही वर्षांपूर्वी त्यांच्याकडून ही जबाबदारी काढून घेण्यात आली होती.
मोईत्रा यांच्यावर नेमका आरोप काय?
दरम्यान, मोईत्रा यांचे तत्कालीन घनिष्ठ मित्र व सर्वोच्च न्यायालयातील वकील जय आनंद देहदराई यांनी पुरावे दिल्याचा दावा दुबे यांनी केला होता. मोईत्रा यांनी हिरानंदानी यांना संसदेकडून दिले जाणारा लॉग-इन आयडी व पासवर्ड दिला होता. त्यावरून हिरानंदानी यांनी अदानी समूहासंदर्भात प्रश्न विचारले होते. त्याबदल्यात मोईत्रा यांनी लाच घेतल्याचा आरोप दुबेंनी लोकसभाध्यक्षांना पत्र लिहून केला होता. या पत्राच्या आधारे लोकसभाध्यक्षांनी हे प्रकरण नैतिकता समितीकडे सोपविले होते. समितीसमोर २७ ऑक्टोबर व २ नोव्हेंबर अशी दोनवेळा सुनावणी झाली. दुबे यांचा आरोप, हिरानंदानी यांचे प्रतिज्ञापत्र व देहदराई यांचा जबाब यांवरून समितीने अहवाल तयार करण्यात आला होता.
मोईत्रा यांच्या निलंबनाची शिफारस
त्यानंतर मोईत्रा यांच्यावरील आरोपाची चौकशी करणाऱ्या लोकसभेच्या नैतिकता समितीने त्यांच्या निलंबनाची शिफारस केली आहे. समतीचा अहवाल ६ विरुद्ध ४ मतांनी स्वीकारण्यात आला होता.
मोईत्रा यांनी सर्व आरोप फेटाळले
दुसरीकडे महुआ मोईत्रा यांनी मात्र लाच घेतल्याचा कुठलाही पुरावा समिती वा लोकपालांना मिळाला नसल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. मी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच उद्योगपती गौतम अदाणी यांच्या संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मोदी यांना सतत लक्ष्य केले. याच कारणामुळे माझ्यावर अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत, असा आरोप मोईत्रा यांनी केला आहे.