भारतीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या पश्चिम बंगाल, गुजरात, गोवा या तीन राज्यांतील १० जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. येत्या २४ जुलै रोजी या जागांसाठी निवडणूक घेतली जाईल. १० पैकी ६ जागा या पश्चिम बंगालमधील आहेत. दरम्यान, तृणमूल काँग्रेस या निवडणुकीकडे एक संधी म्हणून पाहात आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातून अल्पसंख्यास समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न हा पक्ष करतोय.

तृणमूलने सहा जागांसाठी केली उमेदवारांची घोषणा

निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसने सर्व सहा जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. यावेळी तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी डेरेक ओब्रायन, डालो सेन, सुखेदू शेखर रे या राज्यसभेच्या तीन विद्यमान खासदारांना तर तीन नव्या नेत्यांना उमेदवारी दिली आहे.

नव्याने उमेदवारी देणाऱ्यांमध्ये तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते साकेत गोखले, अलिपूरदूर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रकाश चिक बाराईक तसेच बांगला संस्कृती मंच या संघटनेचे अध्यक्ष समीरूल इस्लाम या तीन नेत्यांचा समावेश आहे.

ममता बॅनर्जी यांचे खूप खूप आभार- गोखले

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गोखले यांनी ममता बॅनर्जी यांचे आभार मानले आहेत. “मी ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांचे खूप खूप आभार मानतो. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्तीला तसेच एका सामान्य कुटुंबातून येणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी दिल्यामुळे मी भारावून गेलो आहे,” अशी भावना गोखले यांनी व्यक्त केली. तसेच एक लोकप्रतिनिधी म्हणून मी माझी संपूर्ण शक्ती पणाला लावण्याचा प्रयत्न करेन. लोकशाही, संविधानासाठी मी ठामपणे उभा राहण्याचे आश्वासन देतो, असेही गोखले म्हणाले.

माझ्या खांद्यावर मोठी जबाबदारी आली आहे- इस्लाम

उमेदवारी मिळाल्यानंतर समीरुल इस्लाम यांनीदेखील ‘इंडियन एक्स्प्रेस’ला प्रतिक्रिया दिली. “ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. मी खूप आनंदी आहे. या संधीमुळे माझ्या खांद्यावर मोठी जबाबदारी आली आहे. सध्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. या प्रक्रियेवर सध्या माझे लक्ष आहे,” असे इस्लाम म्हणाले. मिळालेल्या माहितीनुसार नावाची घोषणा करण्याअगोदर तृणमूल काँग्रेसच्या वरिष्ठांनी इस्लाम यांच्याशी चर्चा केली होती. इस्लाम यांच्या बांगला संस्कृती मंच या संघटनेला पाठिंबा देणारा मोठा वर्ग आहे. विशेष म्हणजे बीरभूम, मुर्शीदाबाद, कमालदा, पूर्व आणि पश्चिम बर्दवान आणि हुगळी या जिल्ह्यांतील अल्पसंख्याक लोकांचा इस्लाम यांना पाठिंबा आहे.

उत्तर पश्चिम बंगालमध्ये जनधार वाढावा म्हणून प्रकाश बाराईक यांना उमेदवारी

आपला जनाधार कसा वाढेल, हा विचार घेऊनच तृणमूल काँग्रेसने तीन नव्या नेत्यांना उमेदवारी दिली आहे. उत्तर बंगालमध्ये तृणमूलला म्हणावा तेवढा पाठिंबा मिळत नाही. याच कारणामुळे ममता बॅनर्जी यांनी प्रकाश बाराईक यांना उमेदवारी दिली आहे. उत्तर बंगालमधील जनतेचा त्यांना पाठिंबा मिळेल, अशी तृणमूलला आशा आहे. बाराईक हे मूळचे उत्तर बंगालमधील अलीपूरद्वार जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

अल्पसंख्याकांना आकर्षित करण्यासाठी इस्लाम यांना उमेदवारी

इस्लाम यांना उमेदवारी देऊन तृणमूल काँग्रेस अल्पसंख्याकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत हा समाज तृणमूल काँग्रेसपासून दुरावलेला आहे. त्याचा परिणाम सागरदिघी, मुर्शीदाबाद विधानसभेच्या पोटनिवडणुकीत दिसून आला होता. याच कारणामुळे इस्लाम यांना उमेदवारी देऊन ममता बॅनर्जी अल्पसंख्यांना पक्षाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

…तेव्हापासून गोखले चांगलेच चर्चेत

मागील वर्षाच्या डिसेंबर महिन्यात गोखले यांनी गुजरातमधील मोर्बी पूल कोसळल्यानंतर एक ट्वीट केले होते. या ट्वीटनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून गोखले चांगलेच चर्चेत आहेत. लोकांनी जमा केलेल्या निधीची गैरवापर केल्याचाही त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. त्यांची लोकप्रियता लक्षात घेऊन तृणमूलने गोखले यांना उमेदवारी दिली आहे.

दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार निवडीवर याच पक्षातील एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर प्रतिक्रिया दिली आहे. “पक्षाने एका बाजूला प्रामाणिक असणाऱ्या नेत्यांवर विश्वास ठेवलेला आहे. तसेच नव्या लोकांनाही संधी मिळावी याचाही विचार केलेला आहे,” अशी प्रतिक्रिया या नेत्याने दिली आहे.

Story img Loader