Shatrughan Sinha Campaign for AAP: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीत फूट पडल्याचे दिसत आहे. काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने ही निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केजरीवाल यांना पाठिंबा दर्शविला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी आता खासदार शत्रुघ्न सिन्हा यांना आम आदमी पक्षाचा प्रचार करण्यासाठी दिल्लीत पाठवले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समाजवादी पक्षदेखील काही खासदार ‘आप’च्या प्रचारासाठी पाठविणार आहे. शत्रुघ्न सिन्हा यांचा “खामोश” हा चित्रपटातील संवाद चांगलाच प्रसिद्ध झाला होता. आता त्यांच्याच माध्यमातून ममता बॅनर्जी या काँग्रेसला खामोश करण्याची रणनीती आखत असल्याचे दिसत आहे.
इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस आणि इतर काही पक्षांमध्ये विसंवादाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अनेक पक्षांनी अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा दिला आहे. दिल्ली विधानसभेत विजय मिळविण्यासाठी आप, काँग्रेस आणि भाजपामध्ये जोरदार संघर्ष सुरू असताना इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देताना दिसत आहेत. तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्याबरोबरच महाराष्ट्रातील शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) या पक्षानीही ‘आप’ला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसपेक्षा ‘आप’ मजबूत स्थितीत असल्याचे दिसत आहे.
शत्रुघ्न सिन्हा कुठे प्रचार करणार?
द इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या बातमीनुसार, तृणमूल काँग्रेसचे आसनसोल लोकसभेचे खासदार शत्रुघ्न सिन्हा अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री आतिशी आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या विधानसभा मतदारसंघात प्रचार करणार आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांची बिहारी बाबू अशी ओळख आहे. दिल्लीतील एक तृतीयांश मतदार पूर्वांचलमधून येतात, त्यामुळे शत्रुघ्न सिन्हा यांचा प्रचारातील सहभाग लक्षवेधी ठरू शकतो, अशी अटकळ बांधली जात आहे. पूर्वांचलमधूनच येणारे मनोज तिवारी आणि रवी किशन हे दोन नेते भाजपाकडे आहेत, त्यामुळे भाजपा आणि ‘आप’चा जोरदार प्रचार रंगणार असल्याचे दिसते.
सिन्हा यांचे भाजपा आणि काँग्रेसशी संबंध
शत्रुघ्न सिन्हा यांनी याआधी भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांबरोबर काम केले आहे. अनेक दशके भाजपासमवेत घालविल्यानंतर २०१९ च्या निवडणुकीआधी शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत पाटना साहीब इथून निवडणूक लढविली, मात्र त्यांचा पराभव झाला. त्यानंतर २०२२ साली त्यांनी काँग्रेस सोडून तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
इंडिया आघाडीत नेतृत्वपदासाठी रस्सीखेच
इंडिया आघाडीचे नेतृत्व कोण करणार, यावरून लोकसभा निवडणुकीपूर्वी रस्सीखेच झाल्याचे पाहायला मिळाले. तृणमूल काँग्रेसने इंडिया आघाडीच्या नेतृत्वपदासाठी अनेकदा आव्हान दिले आहे. तसेच इंडिया आघाडीतील इतर काही पक्षांनीही ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वावर सकारात्मकता दर्शविली आहे. काँग्रेसचे सर्वात जुने मित्र असलेल्या लालू प्रसाद यादव यांनीही ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वासाठी होकार दिला होता.
तृणमूलच्या नेत्यांनी म्हटले की, गेल्या काही काळापासून ममता बॅनर्जी या भाजपाशी थेट भिडत असून प्रत्येक निवडणूक जिंकत आल्या आहेत; तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसला भाजपाशी सामना करता आलेला नाही, त्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्वावर तृणमूलच्या नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’ला पाठिंबा देऊन तृणमूलने काँग्रेसला एकाकी पाडण्याची खेळी केली आहे.
दुसरीकडे ‘आप’ला पाठिंबा देण्याच्या बदल्यात तृणमूल काँग्रेस इंडिया आघाडीच्या नेतृत्वासाठी आपला दावा आणखी भक्कम करण्याची शक्यता आहे. शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षही ममता बॅनर्जी यांनाच नेता मानू शकतो, अशी तृणमूल काँग्रेसची धारणा आहे. याशिवाय आता तृणमूलला केवळ तामिळनाडूतील द्रमुक आणि इतर डाव्या पक्षांचा पाठिंबा मिळवायचा आहे. ममता बॅनर्जी यांच्यासाठी राष्ट्रीय जनता दल आणि लालू प्रसाद यादव यांनीही सकारात्मक संदेश दिला होता. दिल्लीनंतर बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे, त्यामुळे काँग्रेसला कमजोर करून जागावाटपात अधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी आरजेडीकडून काँग्रेसला कमकुवत केले जाण्याची शक्यता आहे.
२०२० साली झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जागावाटपाच्या चर्चेत आरजेडीकडून ७० जागा पदरात पाडून घेतल्या होत्या, त्यापैकी त्यांना केवळ १९ ठिकाणी विजय मिळविता आला; तर दुसरीकडे आरजेडीने १४४ ठिकाणी निवडणूक लढवून त्यापैकी ७५ जागा जिंकल्या. काँग्रेसपेक्षाही सीपीआय (एमएल) (एल) पक्षाची कामगिरी चांगली राहिली होती. त्यांनी १९ जागांपैकी १२ जागांवर विजय मिळविला.