पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी आज लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज कोलकात्यातील ब्रीज परेड मैदानावर जाहीर सभेचं आयोजनदेखील करण्यात आलं आहे. मात्र, या सभेला २०१९ प्रमाणे विविध पक्षातील नेते उपस्थित राहणार की नाही, याबाबत अस्पष्टता आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी एकट्याच पडल्या आहेत का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
विशेष म्हणजे २०१९ च्या निवडणुकीवेळीसुद्धा याच मैदानावरून ममता बॅनर्जी यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली होती. त्यावेळी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल, चंद्राबाबू नायडू, एच. डी. कुमारस्वामी, फारुख अब्दुल्ला, अखिलेश यादव, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे आणि तेजस्वी यादव यांसारखे विविध पक्षांतील नेते उपस्थित होते. मात्र, यंदा हे नेते उपस्थित राहतील की नाही, याबाबत अस्पष्टता आहे.
हेही वाचा – निवडणुकांचे पडघम वाजू लागले की गॅस सिलिंडर स्वस्त! दर कमी करण्यामागचे राजकीय गणित काय?
महत्त्वाचे म्हणजे यावेळी परिस्थिती पूर्णपणे बदलली असून पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. मागील काही वर्षांत तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. तसेच संदेशखाली प्रकरणामुळेदेखील ममता बॅनर्जी या बॅकफूटवर आहेत. त्यामुळे इतर विरोधी पक्षातील नेत्यांचा तृणमूल काँग्रेसपासून दूर राहण्याचा प्रयत्न आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का दिला होता. भाजपाने या निवडणुकीत जवळपास १८ जागांवर विजय मिळवला होता, तर काँग्रेसला २ जागांवर विजय मिळवता आला होता. महत्त्वाचे म्हणजे तृणमूल काँग्रेसला भाजपापेक्षा केवळ चार जागा जास्त जिंकता आल्या होत्या. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने चांगलेच पुनरागमन केले.
हेही वाचा – Lok Sabha Election : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा शिवसेना खासदाराला राजकीय फायदा किती ?
दरम्यानच्या काळात तृणमूल काँग्रेसला बराच चढ-उताराचा सामना करावा लागला होता. यादरम्यान तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. तसेच संदेशखाली प्रकरणामुळे पक्षावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. या सगळ्या परिस्थितीनंतर राज्यातील डाव्या पक्षाच्या विरोधात लढण्यासाठी इंडिया आघाडीच्या रूपाने तृणमूल काँग्रेसच्या रूपाने एक पर्याय निर्माण झाला. मात्र, ममता बॅनर्जी यांनी स्वत:च इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने हा पर्यायही संपुष्टात आला.
या संदर्भात बोलताना तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते म्हणाले, ”गेल्या निवडणुकीवेळी परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी आमच्या नेत्यांवर कोणतेही भ्रष्टाचाराचे आरोप नव्हते, तसेच संदेशखाली प्रकरणदेखील घडले नव्हते. मात्र, आम्ही आता बचावात्मक स्थितीत आहोत. दरम्यान, काँग्रेसबरोबर युती न करण्याचा निर्णय योग्य होता का? असे विचारले असता, काँग्रेस ज्या जागांवर निवडणूक लढणार नव्हती, तेथील काँग्रेस कार्यकर्ते आम्हाला समर्थन देणार नाहीत, अशी माहिती आम्हाला मिळाली होती. मग अशावेळी काँग्रेसबरोबर युती का करायची? अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.