२०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधक एकत्र आले आहेत. या आघाडीला ‘INDIA’ असे नाव दिले आहे. केंद्रीय पातळीवर देशातील प्रमुख विरोधी पक्ष एकत्र असले तरी राज्य पातळीवर मात्र अद्याप काही पक्षांत मतभेद कायम आहेत. पश्चिम बंगालमध्ये तर तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे नेते एकमेकांवर उघड टीका करत असतात. बंगालमध्ये या दोन्ही पक्षाचे नेते आपले राजकीय हीत पाहून या पक्षातून त्या पक्षात उडी मारताना दिसतात. तृणमूल काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या जावयानेही नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
हैदर यांच्या काँग्रेस प्रवेशाचे कारण काय?
यासीर हैदर हे तृणमूल काँग्रेसचे नेते तथा मंत्री फिरहाद हकीम यांचे जावई आहेत. त्यांनी नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ते युवकांसाठी असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या ‘तृणमूल यूथ काँग्रेस’ विभागाचे सरचिटणीस होते. मात्र अचानकपणे त्यांना या पदावरून हटवण्यात आले. परिणामी त्यांनी आता काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. काँग्रेसच्या कोलकाता येथील मुख्यालयात यासीर हैदर यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी पश्चिम बंगालचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी उपस्थित होते.
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर यासीर हैदर यांनी तृणमूल काँग्रेसवर गंभीर आरोप केला. तृणमूल हा खंडणीखोरांचा पक्ष आहे. या पक्षातील नेते मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतात. मी मात्र या भ्रष्टाचारात सहभागी नव्हतो, असे यासीर हैदर म्हणाले.
“मी दिवसरात्र काम केले, पण….”
“मी राजकारण करणारा व्यक्ती नाही. मी समाजकार्यात सक्रिय आहे. तळागाळातील लोकांशी माझा चांगला संपर्क आहे. मी तृणमूल काँग्रेसच्या वाढीसाठी दिवसरात्र काम केले. मात्र माझ्या कामची दखल घेण्यात आली नाही. २०२१९ साली माझे नावच वगळण्यात आले,” अशा शब्दांत यासीर हैदर यांनी तृणमूलवर टीका केली.
“काँग्रेसने संधी दिल्यामुळे खूप आनंदी”
“गेल्या बऱ्याच दिवसांपासून मला काँग्रेस पक्षात प्रवेश करायचा होता. त्यासाठी मी अगोदर काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्कही साधला होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी मला संधी दिली त्याबद्दल मी खूप आनंदी आहे. मला लोकांसाठी काम करायचे आहे. मी मशीद-मंदिराचे राजकारण करत नाही. मला लोकांसाठी काम करायला आवडते. याच कारणामुळे भाजपाऐवजी मी काँग्रेस पक्षात प्रवेश केला,” असे स्पष्टीकरणही यासीर हैदर यांनी दिले.
सासरे हकीम यांची हैदर यांच्यावर सडकून टीका
दरम्यान हैदर यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर त्यांचे सासर हकीम यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली. “हैदर यांच्या या निर्णयाचे मला आश्चर्य वाटलेले नाही. मला विश्वास आहे की एक दिवस असा येईल जेव्हा काँग्रेस पक्ष आपल्याला फक्त इतिहासाच्या पुस्तकात सापडेल. ज्या लोकांना कसलीही ओळख नाही, अशा लोकांना हा पक्ष संधी देत आहे. काँग्रेससाठी ही फार खेदजनक बाब आहे,” अशी प्रतिक्रिया हकीम यांनी दिली. यासीर हैदर यांना माझ्यामुळे ओळख मिळालेली आहे. माझ्याशिवाय त्यांना कोणीही ओळखणार नाही, असेदेखील हकीम म्हणाले.
हकीम यांना न विचारताच घेतला निर्णय?
तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनीही यासीर हैदर यांचा काँग्रेस प्रवेश फार मोठी बाब नाही, असे म्हटले आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश करताना हैदर यांना तुम्ही तुमचे सासरे हकीम यांच्याशी चर्चा केली का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना “मी त्यांचा आदर करतो. मी त्यांना पाहूनच मोठा झालो आहे. मात्र आता आमची विचारधारा बदलली आहे,” असे उत्तर हैदर यांनी दिले.
याआधीही हैदर यांनी केले होते बंड
हैदर यांनी याआधीही तृणमूल काँग्रेसविरोधात बंड केले होते. २०२१ सालाच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान तिकीट न दिल्यामुळे हैदर यांनी बंडखोरी केली होती. त्यांनी समाजमाध्यमांवर तृणमूल पक्ष तळागाळातील कार्यकर्त्यांऐवजी सेलिब्रिटींना महत्त्व देतो, अशी टीका केली होती.
“भूमिका बदलल्यास सर्वांना सांगू”
दरम्यान, यासीर हैदर यांनी तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रीय पातळीवर झालेल्या ‘इंडिया’ या आघाडीचे भवितव्य काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विरोधकांच्या इंडिया या आघाडीत एकूण २६ पक्ष आहेत. यामध्ये तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचा समावेश आहे. याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “तृणमूल काँग्रेसबाबत आमचे काय विचार आहेत, याची सर्वांनाच कल्पना आहे. काँग्रेस आपली भूमिका बदलत आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्याची गरज नाही. आम्ही आमची भूमिका बदललेली नाही. भविष्यात तृणमूल काँग्रेसबाबतची आमची भूमिका बदलल्यास माध्यमांना सांगितले जाईल,” असे सौधरी यांनी स्पष्ट केले.