नितीन पखाले
यवतमाळ : शिवसेनेची साथ सोडून शिंदे गटासोबत गेलेले व मंत्री झालेले संजय राठोड यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच शह देण्याच्या उद्देशाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी (ता. मानोरा, जि. वाशीम) दौरा आयोजित केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राठोड यांनी शिवसेनेची साथ सोडल्यानंतर बंजारा समाजाची ताकद पुन्हा शिवसेनेच्या पाठीशी उभी करण्याचा ठाकरे यांचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला महत्व आहे.
राज्यात २०१४ ते १९ या काळात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना निवडणूक एकत्र लढवण्यावरून दोन्ही पक्षात घमासान सुरू होते. मात्र युतीत तणाव निर्माण झाला होता. अशा वातावरणात संजय राठोड यांनी पोहरादेवी (ता. मानोरा) येथे नगारा वस्तुसंग्रहालयाच्या भूमिपूजनासाठी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना ३ डिसेंबर २०१८ रोजी एका मंचावर आणले होते. त्यावेळी कार्यक्रमाला उपस्थित लाखोंच्या संख्येतील बंजारा समाज पाहून या दोन्ही नेत्यांना बंजारा समाजाच्या ताकदीचा प्रत्यय आला. त्यानंतर पुन्हा भाजप-युती झाली. पण निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकारणाला कलाटणी मिळाली. महाविकास आघाडी सरकारमध्ये आमदार संजय राठोड वनमंत्री झाले. दरम्यानच्या काळात एका युवतीच्या आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर राठो़ड यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर राठोड यांनी पोहरादेवी येथे भेट देऊन शक्तिप्रदर्शन केले. गर्दी जमवल्याने शिवसेनेवर चौफेर टीका झाली होती. दरम्यान राठोड यांना पुन्हा मंत्री करावे, यासाठी पोहरादेवीतील महंत, बंजारा समाजातील विविध संस्था, संघटनांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र भाजपने या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतल्याने राठोड पुन्हा मंत्री होऊ शकले नाहीत दरम्यान राज्यात घडलेल्या ताज्या राजकीय घडामोडीत संजय राठोड दोन दिवस उद्धव ठाकरेंसोबत राहून नंतर शिंदे गटात सहभागी झाले. तेव्हा ‘संजय राठोड यांच्या अडचणीच्या काळात आपण त्यांना मदत केली याची खंत वाटते’, अशी जाहीर टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली होती.
उद्धव ठाकरे यांनी पोहरादेवी येथे भेट द्यावी, यासाठी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक व मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील राजू नाईक यांनी पुढाकार घेतला. राजू नाईक यांनी मंगळवारी पोहरादेवी येथे भेट देऊन धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे करून दिले व पोहरादेवी भेटीचे निमंत्रण दिले. उद्धव ठाकरे हे लवकरच पोहरादेवी येथे भेट देऊन विदर्भात शिवसेना प्रचाराची सुरुवात करणार असल्याचे यावेळी राजू नाईक यांनी स्पष्ट केले. या भेटीवरून बंजारा समाजात दोन गट पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.