अनिकेत साठे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक : साधारणत: १० महिन्यांपूर्वी म्हणजे गेल्या जूनच्या मध्यावर तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते अयोध्येत शरयूची आरती झाली होती. ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी अवघी अयोध्या नगरी भगवामय करण्यात आली होती. शरयू काठावर पुष्प रचना, आकर्षक रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी असे संपूर्ण नियोजन गोदा काठावरील शिवसैनिकांनी केले होते. तत्पुर्वी तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या दौऱ्याचे यशस्वी नियोजनही नाशिकच्या शिवसैनिकांनी केले होते. त्यांच्या या अनुभवाचा उपयोग आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना खासदार-आमदारांच्या रविवारी होणाऱ्या अयोध्या वारीत होणार आहे. प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेऊन आता खुद्द मुख्यमंत्री शिंदे हे शरयू नदीकाठी आरती व पूजा करणार आहेत. त्यामुळे त्यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी नाशिकच्या शिवसैनिकांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे.

हेही वाचा… भाजपचे सत्ता हे साधन की साध्य?

आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या वारीनंतर काही दिवसांत शिवसेनेत दुफळी होऊन राज्यातील राजकीय समीकरणे बदलली. ठाकरे यांचा अयोध्या दौरा आणि आताचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खासदार-आमदारांसह होणारा दौरा यात कमालीचे अंतर आहे. राज्यसभा निवडणुकीत पराभवाची नामुष्की आणि विधान परिषद निवडणुकीत उभे ठाकलेले आव्हान, अशा परिस्थितीत शिवसेनेला उभारी देण्यासाठी ठाकरे यांनी अयोध्या दौरा केला होता. त्यानिमित्ताने शक्ती प्रदर्शन करीत मनसे आणि भाजपला शह देण्याचे मनसुबे होते. विधान परिषदेच्या जागांसाठी गुप्त मतदान पध्दतीने मतदान होणार असल्याने तत्कालीन सत्तारुढ महाविकास आघाडीच्या गोटात अस्वस्थता होती. त्या पार्श्वभूमीवर, आदित्य यांच्या दौऱ्यातून राज्यसभेतील अपयशाचे मळभ दूर करण्याची धडपड अखंड शिवसेनेकडून झाली होती. पुढील काळात शिवसेना दुभंगली. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. हिंदुत्वाच्या मुद्यावरून आता शिंदे आणि ठाकरे गट परस्परांसमोर उभे ठाकले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी करीत ठाकरे गटाने हिंदुत्वाला सोडचिठ्ठी दिल्याचा प्रचार शिंदे गटाकडून होत आहे. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचे नाव दिल्यानंतर शिंदे गटाने प्रभू रामाचे दर्शन घ्यायचे निश्चित केले होते. त्यानुसार मुख्यमंंत्री शिंदे सर्व आमदार व खासदारांना खास विमानाने अयोध्येला घेऊन जाणार आहेत. या दौऱ्यातून ठाकरे गटाला शह देण्याची जय्यत तयारी होत आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा आहे. तो यशस्वी करण्याची जबाबदारी आजवर अयोध्या दौऱ्याचे यशस्वी नियोजन करणाऱ्या नाशिकच्या पदाधिकाऱ्यांवर सोपविली गेली आहे.

हेही वाचा… सीमाभागात एकीकरण समितीसमोर आव्हान

या दौऱ्याच्या तयारीसाठी शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, सहसंपर्कप्रमुख राजू लवटे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, सुनील पाटील आदी नाशिकचे पदाधिकारी आधीच अयोध्येत दाखल झाले आहेत. त्यांनी प्रमुख साधू-महंतांच्या भेटी घेतल्या. दौऱ्यात मुख्यमंत्री साधू-महंतांना भेटणार आहेत. संपूर्ण अयोध्या नगरी भगवामय करण्याची तयारी प्रगतीपथावर आहे. मुख्यमंत्री श्रीरामाचे दर्शन घेतील. नंतर त्यांच्या हस्ते सायंकाळी शरयूची आरती होईल. त्यासाठी शरयू काठावर पुष्प रचना करण्यात येणार आहे. व्यासपीठ उभारून रोषणाईने परिसर उजळून निघेल. पात्रात रंगीत दिवे सोडले जातील. फटाक्यांची आतषबाजी केली जाईल. गतवेळच्या तुलनेत यंदा अतिशय भव्यदिव्य स्वरुपात हा कार्यक्रम पार पडणार असल्याचे बोरस्ते यांनी सांगितले. मागील दौऱ्यात अयोध्येतील अनेक साधू-महंतांशी परिचय झाला होता. त्यांचे आशीर्वाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. अयोध्या वारीसाठी नाशिक आणि ठाण्याहून खास स्वतंत्र रेल्वे मार्गस्थ होत आहे. हजारो शिवसैनिकांच्या माध्यमातून अयोध्येत शक्ती प्रदर्शन करीत हिंदुत्वाच्या मुद्यावरुन ठाकरे गटावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: To make eknath shinde ayodhya tour a successful once again taking help of nashik shiv sainiks print politics news asj