राजेश्वर ठाकरे
नागपूर : राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेत सहभागी होण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असला तरी पायी चालण्याची सवय नसल्याने त्यांची पंचाईत झाली आहे. त्यामुळे आता काहींनी पदयात्रेत सहभागी होण्यापूर्वीच रोज वीस किलोमीटर पायी चालण्याचा सराव सुरू केला आहे. परिणामी अनेक नेते, कार्यकर्ते अनेक दिवसानंतर ‘मॉर्निंग वॉक’ला रस्त्यावर दिसू लागले आहेत.
हेही वाचा… भारत जोडो यात्रेसाठी उत्तर महाराष्ट्रातूनही रसद, पण काँग्रेसला लाभ कितपत ?
राहुल गांधी यांच्या पदयात्रेचा महाराष्ट्रातील प्रवास पश्चिम विदर्भातील तीन जिल्ह्यातून सुरू होणार आहे. राहुल गांधी दररोज सुमारे २२ ते २३ किलोमीटर पदयात्रा करतात. सकाळी दहा ते अकरा किमी आणि दुपारनंतर तेवढचे अंतर ते चालतात. त्यांच्यासोबत सुरुवातीपासून १५० नेते चालत आहेत. शिवाय रोजच्या मार्गात स्थानिक नेते व परिसरातील नागरिक या यात्रेत सहभागी होत असतात. राहुल गांधी यांच्या यात्रेत सहभागी होण्यास विदर्भातील अनेक नेते उत्सुक आहेत. पण अनेकांना दोन-तीन किलोमीटरपेक्षा अधिक चालण्याची सवय राहिलेली नाही. त्यामुळे त्यांनी अलीकडे दररोज सकाळी, सायंकाळी पायी चालण्याचा सराव सुरू केला आहे. नागपूर शहर आणि चंद्रपूर येथील काही नेते मंडळी असा सराव करीत असल्याची माहिती आहे.
हेही वाचा… सत्तेविना यश संपादन करण्याचे राष्ट्रवादीपुढे आव्हान
यासंदर्भात अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील यात्रेचे समन्वयक व प्रदेश सरचिटणीस संजय दुबे म्हणाले, काँग्रेस कार्यकर्तेच नव्हेतर विविध सामाजिक, सांस्कृतिक, स्वयंसेवी, साहित्यिक, व्यापारी, वकील यांच्या संघटनांचे पदाधिकारी यात्रेत सहभागी होत आहेत. काँग्रेसकडून यात्रेत सहभागी होणाऱ्या संघटना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांची यादी मागवली जाते. त्यांना ओळखपत्र दिले जाते. पण, चालण्याची सवय नसलेले प्रत्यक्ष यात्रेत सहभागी होण्यापूर्वी चालण्याचा सराव करीत असतील तर चांगली गोष्ट आहे. तसा तो केला गेला पाहिजे.
हेही वाचा… देवानंद पवार : शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता
विदर्भात पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेच्या तयारीसाठी पक्षश्रेष्ठींनी सर्व शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्षांना सूचना दिल्या आहेत. त्यासाठी पक्षाने निरीक्षक, समन्वयक नेमले आहेत. याशिवाय ज्या जिल्ह्यांतून यात्रेचा मार्ग नाही त्या जिल्ह्यात पदयात्रा, सायकल यात्रा, दुचाकी यात्रा, चौकात-चौकात फलक आणि बॅनर लावून घोषणा देऊन यात्रेसंदर्भात वातावरण निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी शहर काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयूआय, सेवादल आणि इंटक या कामगार संघटनेचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.