सुहास सरदेशमुख
औरंगाबाद : शिवसेनेतील आमदार-खासदारांच्या बंडाळीनंतर पक्षसंघटना टिकवण्यासाठी युवा सेना नेते आदित्य ठाकरे अखेर मुंबईबाहेर पडत असून २१ ते २३ जुलै या काळात ठाणे, नाशिक आणि औरंगाबाद या तीन जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. भिवंडी, नाशिक, मनमाड, नेवासा येथे ते मेळावे घेणार आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्रीपद हे उद्धव ठाकरे यांच्याकडे होते. त्यामुळे पक्षसंघटनेसाठी वेळ देणे गेल्या अडीच वर्षांत उद्धव ठाकरे यांना शक्य झाले नाही. ते काम आदित्य ठाकरे यांनी करणे अपेक्षित होते. पण त्यांनीही त्याकडे दुर्लक्ष केले. त्याचा फटका आमदार-खासदारांच्या बंडाच्या रूपात बसला. राज्यभरातील ४० शिवसेना आमदार शिंदे गटात दाखल झाल्यानंतर आता महिनाभराने अखेर आदित्य ठाकरे हे दौऱ्यावर निघत आहेत.
हेही वाचा… शिवसेनेची साथ सोडण्याची माने घराण्याची दुसरी वेळ
हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी बुधवारी मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला. मराठवाड्यातील १२ पैकी आठ आमदार व एक खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटात सहभागी झाल्याने मराठवाड्यातील संघटनेमध्ये उडालेली खळबळ कमी करणे हा या प्रचार दौऱ्याचा भाग असेल, असे मानले जात आहे. शिवसेनेची पक्षसंघटना जास्तीत जास्त टिकावी यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात जिल्हाप्रमुख अंबादास दानवे व शिवसेना नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे विशेष प्रयत्न करीत आहेत. सत्तेच्या बरोबर जाणाऱ्या कार्यकर्त्यांचे हिशेब ठेवले जात आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातून संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, प्रा. रमेश बोरनारे व संदीपान भुमरे या चार आमदारांनी बंडखोरी केली. त्यामुळे शिवसेनेची एकहाती सत्ता आता दुभंगेल असे सांगण्यात येते. मात्र, नेते गेले तरी कार्यकर्ते अजूनही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. कार्यकर्त्यांना हुरूप देण्यासाठी आदित्य ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात असून त्याचा खरोखर किती उपयोग होतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.
हेही वाचा… श्रीरंग बारणे – आधी पक्षनिष्ठेचे दर्शन, नंतर बंडखोरांचे समर्थन
आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याची तयारी करण्यासाठी बुधवारी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी बैठक घेतली. या बैठकीस २५ नगरसेवकांची उपस्थिती होती, तर चार नगरसेवक गैरहजर असल्याचे दिसून आले. ओबीसी आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता निवडणुकीची तयारीही सुरू होणार आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा दौरा शिवसेनेसाठी महत्त्वाचा मानला जात आहे.