जयेश सामंत / नीलेश पानमंद
ठाणे : राज्यात सत्ता बदलाचे मानकरी ठरलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला साथ देणे ठाण्यातील ओवळा-माजिवडा मतदार संघाचे आमदार प्रताप सरनाईक यांना चांगलेच फलदायी ठरले आहे. अडीच वर्षांपासून ईडीची कारवाई, वेगवेगळ्या चौकश्या, भाजपा नेत्यांचे आरोप यामुळे सतत राजकीय चक्रव्यूहात सापडलेले सरनाईक यांनी शिंदे यांच्या बंडाला साथ देताच राज्य सरकारने त्यांच्या मतदार संघाच्या विकासासाठी थोडे थोडके नव्हे तर तब्बल ९०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी देऊ केला आहे. यापैकी बराचसा निधी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून खर्च केला जाणार असल्याने आपल्या ‘ होम ग्राउंड ‘ वर विकासकामांच्या फटकेबाजीचा आनंद लुटणे आता सरनाईक यांना शक्य होणार आहे. त्यामुळे मंगळवारी आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेत ९०० कोटींच्या निधीची कामे तातडीने मार्गी लावण्याचा आग्रह सरनाईक यांनी धरला.
हेही वाचा… महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेतृत्वाकडून सीमावासियांच्या अपेक्षा उंचावल्या
‘टॉप्स समूह’ गैरव्यवहार प्रकरणाच्या आधारेच सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरोधात गैरव्यवहाराची तक्रार दाखल करून तपास सुरू केला होता. यामुळे सरनाईक हे अडचणीत आले होते. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी हा मुद्दा उचलून धरला होता. सातत्याने होणारे आरोप आणि चौकशी यामुळे सरनाईक हे त्यावेळी प्रचंड अस्वस्थ झाले होते आणि यातूनच ते काही दिवस विजनवासात गेले होते. त्याचदरम्यान त्यांनी शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत युती करण्याची विनंती केली होती. त्यांचे हे पत्र बरेच दिवस चर्चेत होते. उद्धव ठाकरे यांनी त्यावर कोणतीच भुमिका घेतली नव्हती. त्यामुळे प्रत्यक्षात पुढे काहीच झाले नव्हते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरनाईक यांचे मधूर संबंध आहेत. यातूनच ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चाही त्यावेळी सुरू होती. असे असतानाच राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे -फडणवीस सरकार सत्तेवर आले. हे सरकार स्थापन करण्यासाठी सरनाईक यांनी शिंदे यांना साथ दिल्याचे दिसून आले.
हेही वाचा… खडसे-महाजन वाद विकोपाला; जुन्या प्रकरणांना नव्याने फोडणी
राज्यात सत्ता बदलाचे मानकरी ठरलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला साथ देणे ठाण्यातील ओवळा-माजिवडा मतदार संघाचे आमदार प्रताप सरनाईक यांना चांगलेच फलदायी ठरले आहे. अडीच वर्षांपासून ईडीची कारवाई, वेगवेगळ्या चौकश्या, भाजपा नेत्यांचे आरोप यामुळे सतत राजकीय चक्रव्युहात सापडलेले सरनाईक यांनी शिंदे यांच्या बंडाला साथ देताच राज्य सरकारने त्यांच्या मतदार संघाच्या विकासासाठी थोडे थोडके नव्हे तर तब्बल ९०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी देऊ केला आहे. या निधीतून ओवळा-माजिवाडा मतदार संघातील तब्बल ४९ विकासकामे केली जाणार आहेत. त्यात तरण तलाव, तलावांचे सुशोभिकरण, उद्यान विकसित करणे, स्व. लता मंगेशकर गुरूकुल, येऊर येथील आरक्षित असलेल्या जागेवर पर्यटन स्थळ, हरिवंशराय बच्चन हिंदी भाषा भवन, सिंधूताई सपकाळ तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र, ज्येष्ठ नागरिक भवन, लेवा पाटील, समाज भवन, फुटबॉल टर्फ, कै. इंदिराबाई बाबूराव सरनाईक महिला बचत गट भवन, अद्ययावत पध्दतीने स्मशानभूमीची कामे, ’जुने ठाणे नविन ठाणे“ उद्यानाची डागडुजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, एम.सी.ए.च्या मदतीने बी.के.सी.च्या धर्तीवर क्लब, विविध समाज भवन, खाडी किनारा सुशोभिकरण, रस्ते, स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ऍक्वेरियम (क्रीडा संकुल), ६७ विहिरी पुर्नजिवीत करून नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत चालू करणे, अशा कामांचा समावेश आहे.
हेही वाचा…भारत-जोडोकडून लोकांना व्यवस्था बदलाची अपेक्षा; ‘टीम राहुल’मधील नागपूरकर पिंकी सिंग यांची प्रतिक्रिया
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व सक्षम असून त्यांनी ठाणे महापालिका क्षेत्रातील विकासकामांसाठी १८०० कोटी रुपयांचा निधी देऊ केला आहे. त्यापैकी ९०० कोटीचा निधी हा ओवळा-माजिवाडा मतदार संघातील विकास कामांसाठी आहे तर, उर्वरित ९०० कोटींचा निधी मतदार संघ वगळून महापालिका क्षेत्रातील उर्वरित भागांसाठी आहे. या निधीमुळे रस्ते, सुशोभिकरण तसेच इतर नागरी कामे होणार आहेत, यापूर्वी आम्हाला निधी मागावा लागायचा पण, आता समोरूनच निधी मिळतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व सक्षम आहे. त्यामुळे आमदारांनी पत्रे देण्यापूर्वीच मुख्यमंत्री शिंदे हे विकासकामांसाठी निधी देत आहेत. ईडी कारवाईची प्रक्रीया मुख्यमंत्री किंवा कोणताही नेता थांबवू शकत नाही. माझ्यावर दोन वर्षांपूर्वी ईडीची कारवाई झाली होती. ईडीचा जो निर्णय जो आहे, तो न्यायालयातून आलेला असून ही प्रक्रिया जुनी आहे. तसेच हे प्रकरण आता न्यायप्रविष्ठ आहे, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.