सौरभ कुलश्रेष्ठ

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुंबईचा दौरा, भाजपच्या माजी नगरसेवकांची बैठक घेणे व त्यात शिवसेनेला भुईसपाट करण्याची अत्यंत आक्रमक भूमिका घेणे यातून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक केवळ मुंबई-महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर न सोडता त्यात जातीने लक्ष घालत शिवसेनेवर निर्णायक घाव घालण्याची तयारी अमित शहा यांनी केल्याचे स्पष्ट होत आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर थेट मोदी-शहा या राष्ट्रीय नेत्यांची ‘नजर’ असणार आहे असा संदेशवजा इशाराही भाजपच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना यातून देण्यात आला आहे.

हेही वाचा… कर्जवाटपासाठी भाजपच्या मंत्र्यांचा मेळावा; राज्यस्तरीय बैठकीनंतर २९२१ कोटींच्या कर्जास मंजुरी

केंद्रीय गृहमंत्री व निवडणुकीच्या रणनीतीतील भाजपचे चाणक्य अशी ओळख असलेले अमित शहा यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईचा दौरा केला. त्यात राजकीय बैठकाही घेतल्या. भाजप आणि जनतेला दगा देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भुईसपाट करा. विश्वासघात करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यातील भाषणात घेतली. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत १५० जागा जिंकण्याचे लक्ष्यही त्यांनी माजी नगरसेवकांच्या बैठकीत जाहीर केले.
राज्यात सत्तेवर नसली तरी मुंबई महापालिकेतील सत्तेच्या जोरावर शिवसेना महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावी ठरते. त्यामुळे शिवसेनेच्या या गंडस्थळावर निर्णायक घाव घालण्याची भाजपची रणनीती आहे. मुंबई महानगरपालिकेत शिवसेना पराभूत झाल्यास लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या राजकीय प्रभावाला ओहोटी लागेल. ती हिंदुत्ववादी राजकारणाची जागा आपोआपच भाजपला व्यापता येईल असा त्यामागे विचार आहे.

हेही वाचा… Maharashtra Breaking News Live : दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट

अमित शहा यांची ही बैठक म्हणजे मुंबई महापालिकेच्या रणसंग्रामासाठी भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने फुंकलेला बिगुल असल्याचे मानले जात आहे. खुद्द मोदी-शहा यांची ‘नजर’ मुंबई महापालिकेवर असल्याचा संदेश दिल्याने भाजप कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावेल आणि ते अधिक आक्रमकपणे निवडणुकीत लढतील. तसेच पक्षांतर्गत कुरबुरी, कुरघोड्यांचे राजकारण रोखण्यास आपोआपच मदत होईल, असे मानले जात आहे.