संसदेचे पावसाळी अधिवेशन यंदा वादळी ठरताना दिसत आहे. विरोधकांनी मणिपूर प्रश्न लावून धरला आहे, तर सत्ताधारीदेखील विरोधकांवर आगपाखड करताना दिसत आहेत. आज (दि. २६ जुलै) विरोधक नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची शक्यता आहे. यामुळे निदान पंतप्रधान मोदी सभागृहात येतील आणि त्यानिमित्ताने त्यांना मणिपूर प्रश्नावर घेरता येईल, अशी विरोधकांची अटकळ आहे. द इंडियन एक्सप्रेसच्या पत्रकार लिझ मॅथ्यू यांनी सांगितले की, मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांची आघाडी ‘इंडिया’ या नावावर आक्षेप घेऊन त्याची तुलना ईस्ट इंडिया कंपनी आणि दहशतवादी संघनांशी केली. मोदींच्या वक्तव्यामुळे विरोधक आणखी खवळले असून सरकारला संसदेचे काम रेटून नेणे आता अवघड होणार आहे. बुधवारी केंद्र सरकार वन (संवर्धन) सुधारणा विधेयक मांडणार आहे.
पत्रकार मनोज सी.जी. यांनी माहिती दिली की, मंगळवारी विरोधकांमधील सर्व पक्षांनी एकत्र येऊन सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचे ठरविले, जेणेकरून पंतप्रधानांना सभागृहात आणता येईल. काँग्रेसने त्यांच्या खासदारांना व्हिप बजावून सभागृहात उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे संसदेतील घडामोडींवर करडी नजर ठेवून आहेतच. पण, त्यांना संसदेतील परिस्थिती हाताळण्यासोबतच आगामी विधानसभा निवडणुकांचीही तयारी करायची आहे. मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी भोपाळ येथे राज्यातील नेत्यांची बैठक ते घेणार आहेत. मध्य प्रदेशमध्ये मागच्या १५ दिवसातला त्यांचा हा दुसरा दौरा आहे. राज्यातील वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री यांच्यासोबत सतत त्यांचा संवाद सुरू आहे.
तिकडे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस विधानसभेत मणिपूर हिंसाचाराच्या विरोधात ठराव आणण्याचा विचार करत आहे, तसेच सभागृहाच्या बाहेरही याविरोधात प्रचार करण्याची रणनीती आखण्यात येत आहे. महिला तृणमूल काँग्रेसने बुधवारी राज्यात लाँग मार्च काढण्याचे नियोजन केले आहे, तसेच महिनाभर राज्यात विविध ठिकाणी मणिपूर हिंसाचाराचा निषेध करणारे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
केरळमध्ये विधानसभेचे अध्यक्ष ए.एन. शमशीर यांनी गणपतीवर केलेल्या विधानाला भाजपा आणि हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला आहे. विश्व हिंदू परिषदेने त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तयारी दर्शविली आहे; तर भाजपाने त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. मागच्या आठवड्यात एका शाळेतील कार्यक्रमात बोलत असताना केंद्र सरकारवर टीका केली. ते म्हणाले, केंद्र सरकार शालेय विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील चांगल्या गोष्टी शिकवण्याऐवजी हिंदू मिथक शिकवत आहे. भाजपा आणि विश्व हिंदू परिषदेने सांगितले की, अध्यक्ष शमशीर यांचे वक्तव्य आमच्या धार्मिक भावनांना दुखावणारे आहे. तसेच काँग्रेसने याबाबत मौन का बाळगले आहे, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
तामिळनाडूमध्ये भ्रष्टाचार प्रकरणात कोठडीत असलेल्या मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांना न्यायालयाकडून दिलासा मिळण्याची आशा वाटते, त्यांच्या दोन विशेष रजा याचिकांवर आज सुनावणी होणार आहे.