लोकसभा निवडणुकीपूर्वीच राजकीय नेत्यांमधील शाब्दिक युद्ध तीव्र होत चालले आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार दिलीप घोष मंगळवारी एका कथित व्हिडीओ क्लिपमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची वैयक्तिकरीत्या खिल्ली उडवताना दिसल्यानंतर ते वादात सापडले आहेत. यावर तृणमूल काँग्रेसने (TMC) प्रत्युत्तर देत दिलीप घोष यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. टीएमसीने घोष यांच्यावर टीका करत ती व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे.
टीएमसीने निवडणूक आयोगाकडे केली तक्रार
TMC कडून दिलीप घोष यांच्या विरोधात पश्चिम बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. ममता बॅनर्जी यांच्यावर वैयक्तिकरीत्या हल्ला करणारी त्यांची अपमानास्पद आणि आक्षेपार्ह स्त्रीद्वेष्टा टिप्पणी आदर्श आचारसंहितेचे (MCC) उल्लंघन करते. भाजपाच्या पश्चिम बंगालमधील नेते दिलीप घोष हे टीएमसीच्या ‘बांग्ला निजेर मेयेके चाई’ (बंगालला आपली स्वतःची मुलगी पाहिजे) या निवडणूक घोषणेची खिल्ली उडवताना दिसत आहेत. विशेष म्हणजे दिलीप घोष हे स्वतः वर्धमान-दुर्गापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
काय म्हणाले दिलीप घोष?
व्हिडीओ क्लिपमध्ये दिलीप घोष म्हणाले की, “त्या गोव्याला गेल्यावर गोव्याची मुलगी असल्याचे सांगतात. त्रिपुरामध्ये त्या त्रिपुराची कन्या असल्याचे सांगतात. पहिलं त्यांना ठरवू द्या की नेमक्या त्या कोणाच्या कन्या आहेत.” मेदिनीपूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार घोष टीएमसीच्या २०२१ च्या निवडणुकीतील ‘बांग्ला निजेर मेयेके चाई’ या घोषणेचा संदर्भ देत ममतांवर हल्ला चढवला होता.
हेही वाचाः ओवैसींसमोर यंदा दोन महिला उमेदवारांचे आव्हान; कसा राखणार हैदराबाद मतदारसंघ?
भाजपा खासदाराकडून माफीची मागणी
पश्चिम बंगालच्या महिला आणि बालविकास मंत्री शशी पंजा यांनी घोष यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. या टीकांमधून भाजपाचा डीएनए दिसून येत असल्याचंही त्या म्हणाल्यात. शशी पंजा म्हणाल्या, ‘त्यांनी तातडीने माफी मागावी. खरं तर अशा पद्धतीच्या टीका भाजपाचा डीएनए प्रतिबिंबित करतात, ज्यात भाजपाच्या कुरूप मानसिकतेचा प्रत्यय येतो. निवडणूक आयोगाने याची दखल घ्यायला हवी, असंही पंजा म्हणाल्यात.
‘त्यांना महिलांचा आदर नाही’
तृणमूल काँग्रेस (TMC) ने X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘दिलीप घोष हे राजकीय नेत्याच्या नावावर एक कलंक आहेत. माँ दुर्गा यांच्या अस्तित्वाला आव्हान देण्यापासून ते आता ममता बॅनर्जी यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. ते नैतिक दिवाळखोरीच्या घाणेरड्या राजकारणात आकंठ बुडाले आहेत. घोष यांना बंगालच्या स्त्रियांबद्दल आदर नाही, मग ती हिंदू धर्माची पूज्य देवी दुर्गा असो किंवा भारताची एकमेव महिला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असो. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या चंद्रिमा भट्टाचार्य म्हणाल्या, ‘आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे आधीच सांगितले आहे, फक्त पत्रकार परिषद घेऊन आम्ही थांबणार नाही. त्यांनी निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. TMC नेत्या सुष्मिता देव म्हणाल्या, ‘भाजपा जितका ममता बॅनर्जींचा अपमान करेल, तितके लोक ममता बॅनर्जींबरोबर येतील.’
तृणमूल काँग्रेसचे नेते कीर्ती आझाद यांनीही दिलीप घोष यांची टिप्पणी दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, “भाजपा आणि दिलीप घोष यांची अशी मानसिकता असणे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांनी पार्वतीचा अवतार असलेल्या दुर्गा देवीबद्दलही अशी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. आता त्यांनी ममता बॅनर्जींविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे,” असे ते म्हणाले. .