सौरभ कुलश्रेष्ठ

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीतील शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके यांची उमेदवारी रद्द व्हावी यासाठी त्यांचा मुंबई महानगरपालिकेच्या सेवेचा राजीनामा मंजूर न करण्याची खेळी चर्चेत असताना अशीच खेळी २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत अकोल्यात काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांची उमेदवारी रद्द करण्यासाठी खेळण्यात आल्याचा इतिहास समोर आला आहे. विशेष म्हणजे त्यावेळी डॉक्टर अभय पाटील यांचे प्रकरण तत्कालीन सार्वजनिक आरोग्य मंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांच्याकडेच होते.

हेही वाचा… पुण्यातील मनसे फुटीच्या उंबरठ्यावर ?

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त असलेल्या जागेवर निवडणूक जाहीर झाली आहे. शिवसेनेने रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांची उमेदवारी जाहीर केली. ऋतुजा लटके या मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचारी असल्याने त्यांना निवडणुकीआधी सेवेतून मुक्त होणे आवश्यक असते. ऋतुजा यांनी राजीनामा दिल्यानंतरही आता महापालिका प्रशासन तो मंजूर करण्यात दिरंगाई करत आहे. सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारच्या दबावामुळे प्रशासन राजीनामा मंजूर करत नसल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. राजीनामा स्वीकारण्यास प्रशासन दिरंगाई करत असल्याने ऋतुजा लटके यांची उमेदवारी धोक्यात आली आहे.

हेही वाचा… रस्ता सुरक्षा समिती आणि खासदार ज्येष्ठतेचा तिढा

विरोधी पक्षाच्या उमेदवाराची उमेदवारीच धोक्यात यावी आणि त्यांना उमेदवार बदलावा लागावा यासाठी अशीच खेळी २०१९ मध्ये अकोला लोकसभा मतदारसंघात खेळण्यात आली होती. एक नवा चेहरा म्हणून काँग्रेसने डॉ. अभय पाटील यांचे नाव उमेदवार म्हणून निश्चित केले होते. त्यांच्या नावाच्या घोषणेची केवळ औपचारिकता शिल्लक होती. काँग्रेस पक्षाने तटस्थ यंत्रणांमार्फत केलेल्या सर्वेक्षणात अकोल्याचे तत्कालीन भाजप खासदार व त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री झालेले संजय धोत्रे यांना झुंज देण्याची क्षमता डॉ. अभय पाटील यांच्याकडे असल्याचा निष्कर्ष समोर आला होता. मात्र, डॉ. अभय पाटील त्यावेळी सरकारी सेवेत होते, त्यांनी आपला राजीनामा देखील दिला होता. मात्र तत्कालीन राज्य सरकारने अखेरपर्यंत डॉ. अभय पाटील यांचा राजीनामा स्वीकारला नाही. शेवटी काँग्रेस पक्षाला उमेदवार बदलावा लागला होता. तीच खेळी आता ऋतुजा लटके यांच्याबाबत खेळण्यात येत आहे.

हेही वाचा… रावसाहेब दानवेंची तयारी सुरू ; काँग्रेसमध्ये मात्र सामसूम!

याबाबत डॉ. अभय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, २०१९ मध्ये अकोला लोकसभा मतदारसंघात माझ्याविरोधात तत्कालीन फडणवीस सरकारने खेळ खेळला तोच आता सुरू आहे. मी जिल्हा रुग्णालयात अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून काम करत होतो. निवडणुकीपूर्वी दीड महिना आधी मी सरकारी सेवेचा राजीनामा दिला. पण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांनी तो अडवून धरला. तुम्हाला निवडणूक लढता येणार नाही व त्यासाठी राजीनामा मंजूर करणार नाही,असे मला सांगण्यात आले. पण त्याबाबत नियमांचा आधार घेतल्यानंतर त्यांनी प्रकरण आपल्यावर शेकू नये यासाठी माझ्या राजीनाम्याचे प्रकरण तत्कालीन सार्वजनिक आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवले.पण शिंदे यांनी सही केली नाही. भाजपच्या दबावामुळेच एकनाथ शिंदे .यांनी तसे केले होते. त्यामुळे माझी उमेदवारी रद्द झाली, असे अभय पाटील यांनी सांगितले.. मात्र कर्मचाऱ्याने मुदतीत राजीनामा दिला असेल आणि वरिष्ठांनी तो मंजूर केला नाही तरी तो मंजूर समजला जातो अशी कायद्यात तरतूद आहे , असे आम्हाला नंतर समजले. त्यामुळे ऋतुजा लटके यांनी न डगमगता कायद्याच्या आधारे लढावे. त्यांना नक्कीच निवडणूक लढता येईल, असे अभय पाटील लोकसत्ताशी बोलताना म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trick that was used in 2019 akola lok sabha election against congress candidate is now again using against rutuja latke print politics news asj