-महेश सरलष्कर

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभर साजरा होत असून त्या माध्यमातूनही भाजपा लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची ही भाजपाची पूर्वतयारी मानली जात आहे. अमृत महोत्सवांतर्गत घराघरात तिरंगा हा कार्यक्रम राबवला जाणार असून त्याला देशव्यापी आंदोलनाचे स्वरूप दिले जाणार आहे. याद्वारे भाजपा राष्ट्रवादाचे बाळकडू देण्याचा प्रयत्न करत आहे. घर घर तिरंगा मोहिमेतून लोकांची एकजूट केली जाईल, असे भाजपाच्या उपाध्यक्ष वसुंधराराजे शिंदे यांनी शनिवारी सांगितले. या मोहिमेतून २० कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचे भाजपाचे उद्दिष्ट आहे.

दोन वर्षानंतर २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारच्या गरीब कल्याण योजना सारख्या अनेक योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यावर आगामी काळात भाजप लक्ष केंद्रित करणार आहे. भाजपाच्या शनिवारी राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मोदी सरकारच्या योजनांच्या आधारे पक्षसंघटनेचा विस्तार करण्यावर चर्चा झाली. अंत्योदय योजनेसाठी देशभर विशेष मोहीम चालवली जाणार असल्याची माहिती राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे यांनी दिली.

भाजपासाठी लोकप्रिय योजना तारणहार –

गेल्या आठ वर्षात मोदी सरकारने विविध कल्याणकारी योजना राबवल्या असल्या तरी त्याचे महत्त्व लोकांना पटवून द्यावे लागेल. अन्यथा या योजनांचा विस्तार होणार नाही असे भाजपाचे म्हणणे आहे. भाजपाच्या दृष्टीने ३० कोटी लाभार्थींपर्यंत पोहोचणे हे मोठे आव्हान आहे. आतापर्यंत योजना कशा पोहोचल्या, लोकांना त्याचा कसा फायदा झाला या दोन बाबी पुन्हा लोकांना सांगितल्या जाणार आहेत. केंद्र सरकारच्या योजनांचे महत्त्व सांगून मतदारांना जोडून घेण्याचा प्रयत्न या पुढच्या काळात देशपातळीवर होणार आहे.

भाजपाकडून पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी नेहमीच बुथ स्तरावरील कार्यकर्त्यांना लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी दिली जाते. आगामी काळात प्रत्येक बुथवरील किमान दोनशे कार्यकर्त्यांना सक्रीय केले जाणार असून त्यांना लोक संपर्काची प्रमुख जबाबदारी दिली जाईल. हे कार्यकर्ते व्हॉट्सअप ग्रुप बनवून लोकांपर्यंत मोदी सरकारच्या कल्याणकारी योजना पोहोचवतील. पंतप्रधान मोदी यांचा दर महिन्याला रविवारी होणारा मन की बात हा कार्यक्रमही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवला जाणार आहे.

बुथ सक्षमीकरण… –

उत्तर भारतातील राज्यांमध्ये भाजपा तुलनेत मजबूत असला तरी दक्षिणेकडील राज्यांत भाजपाचा पक्ष विस्तार झालेला नाही, त्यादृष्टीनेही अधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा झाली. दक्षिणेकडील राज्यांमध्ये लोकसभा तसेच विधानसभा मतदारसंघांमध्ये बुथ सशक्तीकरणाचा कार्यक्रम प्रामुख्याने राबवला जाईल. दर आठवड्याला बूथ स्तरावर मजबुतीकरणाचे किती काम झाले आहे याचा आढावा केंद्रीय स्तरावर घेतला जाईल.

Story img Loader