लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसकडून या निवडणुकीची तयारी चालू आहे. आम्ही ही निवडणूक एकट्यानेच लढवू असे तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जींनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, या पक्षाकडून वेगवेगळ्या मतदारसंघांसाठी योग्य उमेदवाराची चाचपणी केली जात असतानाच पक्षाचा प्रसिद्ध चेहरा असलेले अभिनेते दिपक अधिकारी यांनी आपल्या मतदारसंघातील तीन वेगवेगळ्या शासकीय समित्यांवरील वेगवेगळ्या पदांचा राजीनामा दिला आहे. दीपक अधिकारी हे खासदार असून ते पश्चिम बंगालमध्ये ‘देव’ या नावाने प्रसिद्ध आहेत.
देव हे तृणमूल काँग्रेसचा प्रसिद्ध चेहरा
देव यांच्या या निर्णयामुळे ते आगामी लोकसभा निवडणूक लढवणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ते दोन वेळा खासदार राहिलेले असून सध्या ते पश्चिम मेदनीपूर जिल्ह्यातील घाटल या मतदारसंघाचे खासदार आहेत. देव हे तृणमूल काँग्रेसचा प्रसिद्ध चेहरा आहेत. २०२३ मध्ये ममता बॅनर्जी यांनी अभिनेता शाहरुख खान याला हटवून पश्चिम बंगालच्या ब्रँड अॅम्बेसेडरपदी देव यांची नियुक्ती केली होती.
कोणकोणत्या पदांचा राजीनामा
देव यांना वेगवेगळ्या तीन समित्यांत वेगवेगळी जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र त्यांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना पत्र लिहून या तिन्ही समित्यांवरील पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्याकडे बिरसिंघा विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्षपद, घाटल एसडीच्या रोगी कल्याण समितीचे संचालकपद, घाटल रवींद्र सताबर्षिकी महाविद्यालयाचे अध्यक्षपद होते. त्यांनी या तिन्ही जबादाऱ्यांपासून मुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
राजीनामा दिल्यानंतर काय स्पष्टीकरण दिले?
या वेगवेगळ्या समित्यांवरील पदाचा राजीनामा देताना देव यांनी कोणतेही ठोस कारण दिलेले नाही. मात्र तृणमूल काँग्रेसच्या अंतर्गत सूत्रांच्या माहितीनुसार देव हे आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक नाहीत. त्यांना त्यांच्या अभिनयावर तसेच त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करायचे आहे. गेल्या काही महिन्यांपासून देव यांचे त्यांच्या मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते यांच्याशी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून मतभेद झाले आहेत.
तृणमूल काँग्रेसची भूमिका काय?
देवा यांच्या या निर्णयानंतर तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस कुणाल घोष यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “तृणमूल काँग्रेसचे खासदार म्हणून त्यांनी काही पदांचा राजीनामा दिला आहे. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. निवडणुकांआधी अशा प्रकारच्या जबाबदाऱ्यांतून मुक्त व्हावे लागते. मला वाटते की आगामी काही दिवसांत देव त्यांच्या या निर्णयाबाबत स्पष्टीकरण देतील,” असे कुणाल घोष म्हणाले.
देव यांची कारकीर्द
दरम्यान, पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील केशपूर हे देव यांचे जन्मगाव आहे. २००६ साली अग्निपथ चित्रपटाच्या माध्यमातून ते रुपेरी पडद्यावर आले. २००७ साली त्यांचा आय लव्ह यू चित्रपट आला आणि त्यांना संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये ओळख मिळाली. २००९ साली त्यांचा प्रेम कहाणी हा चित्रपट आला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हीट ठरला. देव पश्चिम बंगालमध्ये चांगलेच प्रसिद्ध आहेत. याच कारणामुळे तृणमूल काँग्रेसने त्यांना २०१४ साली घाटल येथून लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट दिले. त्यांनी या निवडणुकीत संतोष राणा या सीपीआयच्या उमेदवाराचा पराभव केला. त्यांना या निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक मतं मिळाली. २०१९ सालीदेखील त्यांनी याच जागेवरून विजय मिळवला. या निवडणुकीत त्यांनी २०१४ सालापेक्षाही अधिक मते मिळवली.