Tripura Assembly Election 2023: त्रिपुरा राज्यात उद्या (दि. १६ फेब्रुवारी) विधानसभेसाठी मतदान संपन्न होणार आहे. त्याआधी आज सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. ६० विधानसभेच्या जागा असलेल्या त्रिपुरामध्ये २० जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. या वीस जागांवर टिप्रा मोथा या नव्या पक्षाने स्वतःचे नरेटिव्ह मांडले आहे. यंदाच्या निवडणुकीआधी त्रिपुराच्या माणिक्य राजवंशाचे वशंज प्रद्योत देव वर्मा यांनी पक्षाच्या प्रचारात चांगलाच धुरळा उडवला.
टिप्रा मोथामुळे त्रिपुरामध्ये त्रिशंकू परिस्थिती
टिप्रा मोथा पक्षामुळे यंदाच्या निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. सत्तारुढ भाजपा, प्रबळ विरोधक सीपीआय (एम) – काँग्रेस आणि आदिवासींचा पक्ष म्हणून पुढे आलेल्या टिप्रा मोथा पक्षांने लोकांचे लक्ष वेधून घेतले. सुरुवातीला भाजपा आणि माकप-काँग्रेस यांच्यातच संघर्ष दिसत होता. मात्र टिप्रा मोथाच्या संकल्पना आणि प्रचारामुळे निवडणुकीत रंगत आणली आहे. त्रिपुराची सांस्कृतिक ओळख, डोंगर दऱ्यातील विकासाचे मुद्दे प्रचारात मांडण्यावर टिप्रा मोथाने भर दिला.
बंगाली आणि भूमिपूत्र मुद्दा चर्चेत
आगरतळा येथील खासगी महाविद्यालयात शिकणारा २० वर्षीय विद्यार्थी दुसांता देव वर्मा या निवडणुकीवर बोलताना म्हणाला, “त्रिपुरावर बाहेरच्या व्यक्तीचे नेतृत्व थोपने म्हणजे आमचा इतिहास पुसण्यासारखे आहे. आमच्या राज्यातील महत्त्वाची स्थळे, डोंगर, नद्या यांची नावे बदलून बंगाली नावे देण्यात आली आहेत.” दुसांताचा मित्र अजीत देव वर्मा देखील याच मुद्द्यावर बोलताना म्हणाला, त्रिपुरामध्ये बाहेरील राज्यातील लोक वाढल्यामुळे आमची जमीन, संस्कृती आणि आता आमची भाषा देखील हिसकावून घेतली जात आहे. आम्ही हे सहन करु शकत नाहीत.
टिप्रा मोथा प्रमुखांचे भावनिक आवाहन
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी चारिलम मतदारसंघात बोलत असताना प्रद्योत देव वर्मा यांनी लोकांना भावनिक आवाहन केले. ते म्हणाले, “हे आपल्यासाठी एक शेवटचे युद्ध आहे. मी या निवडणुकीचे शेवटचे भाषण करत आहे. पण मी तोपर्यंत निवृत्ती घेणार नाही, जोपर्यंत ग्रेटर टिप्रालँडची मागणी पूर्ण करत नाही.” टिप्रा मोथाला त्रिपुरातील सामान्य जनता पाठिंबा देताना दिसत आहे. आगरतळा येथे किराणा दुकान चालविणारे धनंजय त्रिपुरा यांनी सांगितले, “मी आणि माझ्या गावाने याआधी भाजपा आणि माकपाला मत दिले आहे. मात्र या पक्षांना समर्थन देण्याचे कोणतेही कारण आमच्याकडे नव्हते. टिप्रा मोथाला एक संधी द्यायला हवी, ते या संधीचे दावेदार आहेत. कारण आमचा राजा (प्रद्योत देव वर्मा) आमच्या भावनांचा सौदा करणार नाह.”