Tripura assembly Polls: त्रिपुराचे विद्यमान मुख्यमंत्री डॉ. माणिक साहा यांनी विधानसभेचा प्रचार जोरात सुरु केलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणाची व्याख्या बदलली असून १६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपा मागच्यावेळेपेक्षाही अधिका जागा मिळवेल, असा विश्वास माणिक साहा यांनी व्यक्त केला आहे. तसेच एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत असताना ते म्हणाले, “तुम्ही त्सुनामीबाबत ऐकलं असेलच. यावेळी त्सुनामी सारखंच होणार आहे. आम्ही २०१८ पेक्षा अधिक जागा यावेळी जिंकू. २०१८ साली आम्हाला ३६ जागा मिळाल्या होत्या. आमच्या सहयोगी पक्षांना आठ जागा मिळाल्या. यावेळी आम्ही अधिक जागा जिंकू.”
त्रिपुरामध्ये १६ फेब्रुवारी रोजी ६० जागांसाठी मतदान होणार आहे. एकाच टप्प्यात या निवडणुका संपन्न होणार आहेत. २ मार्च रोजी मतमोजणी होईल. त्रिपुरानंतर २७ फेब्रुवारी रोजी नागालँडमध्ये मतदान होत आहे. दोन्ही राज्यांचा निकाल एकत्रच २ मार्च रोजी लागेल. २०१८ साली त्रिपुरा राज्यात भाजपाने ५१ जागांवर निवडणूक लढवली होती. तर त्यांच्या आघाडीमध्ये असलेल्या पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा (आयपीएफटी) ने नऊ जागा लढविल्या होत्या. यावेळी भाजपा ५५ जागा लढवत आहे. तर आयपीएफटी पाच जागी निवडणूक लढवत आहे. विशेष म्हणजे बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्षही त्रिपुरा निवडणुकीत उतरत आहे.
त्रिपुरामध्ये ऐनकेनप्रकारे विजय मिळवण्यासाठी भाजपने जोरदार प्रचार सुरु केला आहे. या निवडणुकीत पंतप्रधानांपासून ते अनेक केंद्रीय मंत्री प्रचारात उतरले होते. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी रविवारी त्रिपुरमध्ये प्रचार केला. मागच्या आठवड्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पक्षाचा जाहीरनामा लोकांसमोर मांडला. त्यावेळी नड्डा म्हणाले, “भाजप जेव्हा जाहीरनाम्याचे संकल्प पत्र मांडतो, तेव्हा ते व्हिजन डॉक्युमेंट असते. हा काही कागदाचा तुकडा नाही, तर लोकांच्याप्रती भाजपाची कटीबद्धता आहे.”
मागच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी त्रिपुरामध्ये प्रचारासाठी आले असता त्यांनी गोमती जिल्ह्यात रोड शो केला होता. राधाकिशोरपूर आणि अंबासा येथे त्यांनी जाहीर सभेला संबोधित केले होते. यावेळी मागच्या पाच वर्षात त्रिपुरामध्ये केलेल्या विकास कामांचाही पाढा त्यांनी वाचून दाखवला. तर रविवारी अमित शाह म्हणाले, “मोदी आणि साहा यांची जोडी त्रिपुराला एक समृद्ध राज्य बनवेल. त्रिपुरामधील जनतेने कम्युनिस्टांची जुलमी राजवट पाहिली आहे. काँग्रेसचा भ्रष्ट कारभार पाहिला आहे. फक्त भाजपाचे डबल इंजिन सरकार राज्याचा वेगाने विकास करु शकते.”