Tripura BJP Manifesto 2023 : भारताचं ईशान्येकडील लाज्य त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. त्रिपुरात भाजपा आणि काँग्रेससह स्थानिक पक्षांनी जोरदार प्रचार देखील सुरू केला आहे. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे. पी. नड्डा त्रिपुरात ठाण मांडून बसले आहेत. दरम्यान, आज त्यांच्या पक्षाने निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी नड्डा म्हणाले की, “पाच वर्षांपूर्वी त्यांच्या पक्षाने जनतेला जी आश्वासनं दिली होती ती त्यांनी पूर्ण केली आहेत.”
भारतीय जनता पार्टीचं संकल्प पत्र जाहीर करताना जेपी नड्डा म्हणाले की, “जेव्हा एखादा पक्ष त्यांचा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध करतो तेव्हा लोकांना त्यात फारसा रस नसतो. परंतु भाजपाच्या वचननाम्याची लोक प्रतीक्षा करत असतात. कारण लोकांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टी त्यांच्या जाहीरनाम्याबद्दल पूर्णपणे वचनपद्ध असते.”
नड्डा म्हणाले की, “आम्ही लोकांना गेल्या निवडणुकीत दिलेली आश्वासनं पूर्ण केली आहेत. आम्ही घरं बांधून देण्याचं वचन दिलेलं. त्यानंतर आम्ही ३ लाख घरं बांधून दिली. आता नागरिक म्हणतात की आमचं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे.”
“आम्ही गेल्या ५ वर्षांचं प्रगतिपुस्तक घेऊन आलो आहोत”
भाजपाचे अध्यक्ष म्हणाले की, “तुम्ही गेल्या ७० वर्षात असं कधी ऐकलंय का, एखादा पक्ष त्यांच रिपोर्ट कार्ड (प्रगतिपुस्तक) घेऊन आला आहे, नसेल ऐकलं. परंतु भाजपा आपलं प्रगतिपुस्तक घेऊन आली आहे. त्यासोबतच आता भाजपाचे नेते पुढील काळातल्या विकासाचा रोडमॅप घेऊन येऊ लागले आहेत.”
हे ही वाचा >> हरियाणात दोन वर्षांपासूनची सर्व रिक्त पदं रद्द होणार, मनोहरलाल खट्टर सरकारचा मोठा निर्णय; विरोधक आक्रमक!
त्रिपुराचं दरडोई उत्पन्न वाढलं : नड्डा
नड्डा म्हणाले की, “आमच्या भाजपा सरकारने त्रिपुरामध्ये ब्रू-रियांग समुदायाच्या अधिकारांची नीट काळजी घेतली आहे. तसेच भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यापासून त्रिपुराचं दरडोई उत्पन्न पूर्वीपेक्षा जास्त झालं आहे.”