भाजपाने त्रिपुरा विधानसभेची निवडणूक जिंकली आहे. ६० जागांवर झालेल्या या निवडणुकीत भाजपाने ३२ जागांवर विजय मिळवला आहे. म्हणजेच येथे भाजपाला सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, विद्यमान मुख्यमंत्री माणिक साहा हेच भापजाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत, असे भाजपाने सांगितले होते. मात्र आता निवडणूक संपल्यानंतर भाजपा माणिक साहा यांच्याऐवजी प्रतिमा भौमिक यांचा मुख्यमंत्रीपदासाठी विचार करत आहे. आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता, महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपा हा निर्णय घेऊ शकते.
भाजपाकडून प्रतिमा भौमिक यांना मुख्यमंत्रीपद?
मिळालेल्या माहितीनुसार पक्षश्रेष्ठींकडून त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदासाठी एखाद्या महिला उमेदवाराचा विचार केला जात आहे. त्यासाठी प्रतिमा भौमिक यांचे नाव आघाडीवर आहेत. असे झाले तर भौमिक या त्रिपुरामधील पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरतील. त्रिपुरामध्ये या वेळी पुरुषांपेक्षा महिलांनी अधिक मतदान केले. हे प्रमाण अनुक्रमे ८६.१२ आणि ८९.१७ टक्के असे आहे. त्यामुळे महिला मतदारांच्या नजरेत भाजपाची प्रतिमा उंचवावी यासाठी भाजपा हायकमांड हा निर्णय घेऊ शकते. आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता भाजपा असा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे.
हेही वाचा >> बसवराज बोम्मई की पुन्हा एकदा येडियुरप्पा? कर्नाटकमध्ये भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण?
माणिक साहा यांची केंद्रात वर्णी?
याबाबत भाजपाच्या वरिष्ठ नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. “भौमिक यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. माणिक साहा यांना केंद्रात संधी देऊन भौमिक यांना मुख्यमंत्रीपद दिले जाऊ शकते,” असे या नेत्याने म्हटले आहे. मागील काही दिवसांपासून भाजपाने महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी महिलाविषयक वेगवेगळ्या योजना राबवलेल्या आहेत.
हेही वाचा >> ‘तिप्रा मोथा’च्या झंझावातात त्रिपुरामध्ये भाजपचा निभाव
भौमिक यांचा ३५०० मतांनी विजय
प्रतिमा भौमिक या त्रिपुरामधील धनपूर या खेडेगावातून राजकारणात आलेल्या आहेत. त्यांचे कुटुंबीय शेतकरी आहेत. त्यांचे गाव बांगलादेशच्या सीमेवर आहे. भौमिक या त्यांच्या मतदारसंघातून ३५०० मताधिक्याने निवडून आल्या आहेत. आगामी काळात भाजपा भौमिक यांना मुख्यमंत्रीपदाची संधी देणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.