Tripura Assembly Election 2023: त्रिपुरा विधानसभेची निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. भाजपा आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी जंग जंग पछाडत आहे. यावेळी भाजपा विक्रमी मतांनी निवडून येईल, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि विद्यमान मुख्यमंत्री माणिक साहा करत आहेत. मात्र त्रिपुरा मधील वातावरण वेगळेच असल्याचे तेथील प्रादेशिक पक्ष सांगत आहेत. टिप्रा मोथा (TIPRA Motha Party) या नवीन पक्षाने भाजपा, काँग्रेस आणि सीपीआय (एम) सारख्या राष्ट्रीय पक्षासमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. त्रिपुराच्या राजेशाही परिवारातून येणारे टिप्रा मोथा पक्षाचे प्रमुख प्रद्योत किशोर माणिक्य देव वर्मा यांनी स्वतःला आदिवासी समाजाचे नेते म्हणून पुढे आणले आहे. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत प्रद्योत देव वर्मा म्हणाले, “भाजपा, कम्युनिस्ट पक्ष काहीही दावे करत असले तरी त्रिपुरामध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही.” याचा अर्थ टिप्रा मोथा पक्ष किंगमेकरच्या भूमिकेत असू शकेल, असे दिसते.
हे वाचा >> Tripura assembly: “यंदाची निवडणूक त्सुनामी आणणार”, विद्यमान मुख्यमंत्री माणिक साहा यांचा दावा
विधानसभेत त्रिशंकू परिस्थिती होईल
प्रद्योत यांनी त्रिपुराचा झंझावाती दौरा केला आहे. लोकांनी ठिकठिकाणी प्रद्योत यांच्या सभांना गर्दी करुन त्यांना तुफान प्रतिसाद दिला. टिप्रा मोथा पक्षाने कोणत्याही राष्ट्रीय पक्षाशी निवडणुकपूर्व युती केलेली नाही. ग्रेटर टिपरालँड या त्यांच्या महत्त्वकांक्षी मागणीवर लेखी आश्वासन दिल्याशिवाय कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही, या भूमिकेवर ते ठाम आहेत. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना देव वर्मा म्हणाले, यावेळी लोक विद्यमान भाजपा सरकारवर नाराज आहेत. तसेच सीपीआय(एम) किंवा भाजपा अर्ध्या जागांचाही टप्पा ओलांडणार नाही. अंतिम निकालात भाजपाच्या जागांमध्ये मोठी घसरण होणार आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, अमित शाह यांचे भाषण लिहून देणाऱ्याला त्यांनी तत्काळ कामावरुन काढले पाहीजे. त्यांचे भाषण लिहिणाऱ्याने गृहपाठ केलेला नाही. कम्युनिस्ट पक्ष हा आमच्या राजेशाही परिवाराच्या नेहमी विरोधात राहिला आहे. त्यामुळे आम्ही कम्युनिस्टांसोबत जाऊ हे बोलणे हास्यास्पद वाटते.
त्रिपुराची राजकीय समीरकरणे कशी बदलली
त्रिपुरा राज्यात आदिवासी समाजाची लोकसंख्या ३० टक्के आहे. राज्यातील ६० जागापैकी २० जागा या आदिवासींसाठी राखीव आहेत. दोन वर्षांपूर्वी त्रिपुरामध्ये आठ आदिवासी छोटे-मोठे पक्ष होते. मात्र प्रद्योत यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर गट-तट एकत्र येऊन त्यांची संख्या दोनवर आली आहे. मोथा आणि इंडिजिनयस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा हे दोन गट आता टिकून आहेत. २०१८ नंतर त्रिपुरामध्ये अनेक राजकीय उलथापालथी झाल्या. काही आमदारांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता विधानसभेत भाजपाचे ३३ आमदार आहेत. इंडिजिनयस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुराचे चार आमदार आहेत. सीपीआय (एम) चे १३ आणि काँग्रेसचा एक आमदार आहे. बाकी जागा मोकळ्या आहेत.
काँग्रेससाठी आव्हान वाढले
प्रद्योत हे दोन वर्षांपूर्वी काँग्रेसपक्षातून बाहेर पडले. तोपर्यंत ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. २०१९ साली सीएए कायद्याबद्दल मतभेद झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत मोथाची स्थापना केली. मोथाने ग्रेटर टिप्रालँडची संकल्पना समोर मांडली आहे. या संकल्पनेच्या आधारावर त्यांनी काही दिवसांपूर्वी आदिवासी परिषद निवडणुकांमध्ये विजय मिळवला. मोथा सध्या त्रिपुरा विधानसभेच्या ४२ जागा लढविणार आहे. प्रद्योत यांच्या ग्रेटर टिप्रालँडमध्ये त्रिपुरा, मिझोराम, आसाम आणि बांगलादेशमध्ये राहणाऱ्या आदिवासींसाठी एका राज्याची संकल्पना मांडली गेली आहे. मात्र इंडियन एक्सप्रेसशी बोलताना त्यांनी सांगितले की, आपली मागणी ही राज्याच्या विभागणीची नसून राजकीय विभाजनाची आहे.
हे वाचा >> विश्लेषण : त्रिपुरातील राजकीय घडामोडींमुळे भाजप अस्वस्थ? माकप-काँग्रेस आघाडीमुळे समीकरणे बदलणार?
त्रिपुरामध्ये १६ फेब्रुवारी रोजी ६० जागांसाठी मतदान होणार आहे. एकाच टप्प्यात या निवडणुका संपन्न होणार आहेत. २ मार्च रोजी मतमोजणी होईल. त्रिपुरानंतर २७ फेब्रुवारी रोजी नागालँडमध्ये मतदान होत आहे. दोन्ही राज्यांचा निकाल एकत्रच २ मार्च रोजी लागेल. २०१८ साली त्रिपुरा राज्यात भाजपाने ५१ जागांवर निवडणूक लढवली होती. तर त्यांच्या आघाडीमध्ये असलेल्या इंडिजिनयस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा (आयपीएफटी) ने नऊ जागा लढविल्या होत्या. यावेळी भाजपा ५५ जागा लढवत आहे. तर आयपीएफटी पाच जागी निवडणूक लढवत आहे. विशेष म्हणजे बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्षही त्रिपुरा निवडणुकीत उतरत आहेत.