त्रिपुरामध्ये १६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानापूर्वीच्या मोठ्या रॅलीमध्ये सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डावी आघाडी आणि काँग्रेसच्या युतीवर जोरदार टीका केली. याचबरोबर मतदारांना इशारा केला की, “जर विरोधी पक्षांना पुढील सरकार बनवण्याची संधी मिळाली तर ते त्रिपुराला नष्ट करतील, सोबतच त्यांच्या तुमच्या मुलांचे भविष्यही नष्ट करतील.”
सभेस संबोधित करताना मोदींनी म्हटले की, “डाव्या आघाडीच्या भय, दहशतत आणि हिंसेच्या विरोधात भाजपाने विकास, प्रगती आणि सकारात्मक राजकारणाची सुरुवात केली आहे. मी त्रिपुराच्या लोकांना सांगू इच्छितो की, डावी आघाडी आणि काँग्रेस कधीच त्रिपुराचा विकास करू शकत नाही. त्रिपुराचे लोक गरीब रहावेत हीच त्यांची इच्छा आहे आणि आपली तिजोरी भरत राहणे हेच त्यांचे धोरण आहे.”
याशिवाय पंतप्रधान मोदी म्हणाले की, “त्रिपुरात आज प्रत्येक पक्षाचा झेंडा दिसत आहे. मात्र येथील जनतेने डबल इंजिन सरकार आणण्याचे ठरवले आहे. भाजपाने त्रिपुरात शांतता आणि विकास निर्माण केला आहे. चंदा आणि झंडा कंपनीला त्रिपुराच्या तरुणाईने रेड कार्ड दाखवला आहे. त्रिपुराच्या लोकांना अगोदरच घोषणा केली आहे की ते पूर्ण बहुमताने सबका साथ सबका विकासाचे सरकार आणू इच्छित आहेत.”
काँग्रेस कधीच त्रिपुराचा विकास करू शकत नाही –
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात पुढे म्हटले की, “कम्युनिस्टांनी तीन दशकांपर्यंत त्रिपुरावर राज्य केले आणि प्रत्येक निवडणुकीअघोदर राजकीय विरोधकांना मारलं. त्रिपुरामध्ये भाजपाचे सरकार मागील २५-३० वर्षांमधील कम्युनिस्ट सरकारच्या काळात निर्माण झालेले खड्डे बुजवण्यात दिवस-रात्र काम करत आहे. काँग्रेस आणि डावे आपली सत्तेची भूख भागवण्यासाठी काहीपण करू शकतात. केरळमध्ये ते भांडत आहेत आणि त्रिपुरामध्ये मैत्री करत आहेत. डाव्यांनी त्रिपुराला विनाशाच्या वाटेवर ढकलले होते. त्यांनी लोकांना गुलाम आणि स्वत:ला राजे मानलं होतं. ”