काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ तेलंगणात पोहचली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेशनंतर ही यात्रा तेलंगणा राज्यातून प्रवास करत आहे. काल ( १ नोव्हेंबर ) ही यात्रा हैदराबाद शहरात पोहचली. दरम्यान, प्रसारमाध्यमांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यावर हल्लाबोल केला.
काही दिवसांपूर्वी के चंद्रशेखर राव यांनी आपल्या पक्षाचे नाव बदलत टीआरएस ( तेलंगणा राष्ट्र समिती ) वरून बीआरएस ( भारत राष्ट्र समिती ) केलं आहे. यावरून राहुल गांधी यांनी के चंद्रशेखर राव राष्ट्रीय राजकारणात महत्वकांक्षेवरून खिल्ली उडवली होती. “तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या राष्ट्रीय भूमिकेचे स्वागत करतो. ते अमेरिका आणि चीनमध्ये निवडणूक लढणाऱ्या आंतरराष्ट्रीय पक्षाचे नेतृत्व करत आहेत”, असं राहुल गांधींनी म्हटलं होतं.
हेही वाचा : राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेत पूजा भट्ट सहभागी, रोहित वेमुलाच्या आईचीही साथ
याला तेलंगणाचे मंत्री के टी रामाराव यांनी प्रत्युत्तर देत राहुल गांधींना ‘भावी पंतप्रधान’ संबोधलं आहे. “आंतरराष्ट्रीय नेते राहुल गांधी अमेठी मतदारसंघातून निवडून येऊ शकले नाहीत ते, मुख्यमंत्री केसीआर यांच्या राष्ट्रीय महत्वकांक्षेची खिल्ली उडवत आहेत. ‘भावी पंतप्रधान’ यांनी पहिल्यांदा खासदार म्हणून लोकांतून निवडून यावे,” अशी टीका के टी रामाराव यांनी केली आहे. के टी रामाराव हे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे पुत्र आहेत.
हेही वाचा : राहुल गांधी कळमनुरीच्या मुक्कामात राजीव सातव यांच्या समाधीस्थळास भेट देणार
के टी रामाराव यांच्या टीकेवर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राहुल गांधी यांनी काही चुकीचं वक्तव्य केलं नाही. हैदराबादमध्ये पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला राहुल गांधी यांनी उत्तर दिलं. काँग्रेस हा निजामशाही पक्ष नाही. आठवा निजाम हैदराबादमध्ये बसला आहे,” असा टोलाही जयराम रमेश यांनी के चंद्रशेखर राव यांना लगावला आहे.