प्रमोद खडसे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाशीम : यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघात पाच वेळा शिवसेनेच्या खासदार भावना गवळी ह्या मोठ्या फरकाने निवडणूक जिंकत आल्या आहेत. मात्र, यावेळी शिवसेना दोन गटात विभागली असून त्या शिंदे गटाकडून संभाव्य उमेदवार म्हणून मैदानात राहतील. त्यामुळे त्यांच्या विरोधात ठाकरे गटानेही मतदारसंघ पिंजून काढत तोडीस तोड उमेदवार देण्याची व्यूहरचना आखली आहे. काँग्रेस देखील सातत्याने या मतदारसंघात लढा देत आली असून त्यांनीही मतदार संघावार दावेदारी केली आहे. भाजपकडून आधीच शिस्तबध्द नियोजनाची पताका फडकाविल्यामुळे चुरस वाढली आहे.

यंदा शिवसेनेत पडलेले दोन गट, काँग्रेसला आत्तापर्यंत सातत्याने आलेले अपयश, भाजपची अंतर्गत व्युहरचना या सर्व बाबी पाहता, आगामी काळात वाशीम -यवतमाळ लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार भावना गवळी यांच्या विरोधोत थेट लढत देणारा उमेदवार कोण? यावरुन तर्क वितर्क लावले जात आहेत.

हेही वाचा… लोकसभा उमेदवार निवडीत राज्यात भाजपचे धक्कातंत्र?

वाशीम -यवतमाळ लोकसभा मतदारसंघात खासदार भावना गवळी ह्या शिवसेनेच्या तिकीटावर निवडून येत आहेत. त्या आता शिंदे गटाच्यावतीने उमेदवारीसाठी प्रयत्न करीत आहेत. तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने माजी मंत्री संजय देशमुख यांचे नाव मतदारसंघात समोर येत आहे. मात्र, ते कितपत विद्यमान खा. भावना गवळी यांना टक्कर देतील हे आताच सांगणे कठीण आहे. एकंदरीतच वाशीम -यवतमाळ लोकसभा मतदारसंघामध्ये इतर कुठल्याही पक्षांकडे तुल्यबळ उमेदवार कोण राहील याबाबत स्पष्टता दिसून येत नाही.

लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे सर्वच पक्षातील ईच्छुक उमेदवारांनी प्रचाराचा श्री गणेशा केला आहे. यामध्ये सर्वात आघाडीवर आहे ती भाजप. भाजप कडून केवळ वाशीम -यवतमाळ लोकसभा मतदारसंघच नव्हे तर संपूर्ण विदर्भात भाजपाचे जास्तीत जास्त खासदार कसे निवडून येतील? या दृष्टीने भाजपचे नियोजन सुरू आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजू पाटील राजे यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवर वाशीम -यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे भावी खासदार असा उल्लेख कार्यकर्त्यांकडून करण्यात आला होता. त्यामुळे भाजप थेट दाखवत नसले तरी त्यांचा अप्रत्यक्षरीत्या या मतदारसंघावर डोळा असल्याची बाब देखील चर्चेत येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे काही दिवसापूर्वी बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीत नतमस्तक होत जे आपल्याला सोडून गेले त्यांना आगामी लोकसभेच्या निवडणुकीत गवळी यांचा पराभव करून पुन्हा शिवसेनेचा भगवा फोडकवा, असे फर्मान त्यांनी शिवसैनिकांना सोडले. त्यानंतर ठाकरे यांच्या शिवसेनेने मतदार संघ पिंजून काढला. वाशीम येथील महा प्रबोधन यात्रेत देखील जोरदार शक्ती प्रदर्शन केले. अद्याप ठाकरे गटाकडून कुणाचीच उमेदवारी जाहीर झाली नसली तरी माजी मंत्री संजय देशमुख यांच्या नावाचाच बोलाबाला दिसून येत आहे.

हेही वाचा… काँग्रेस स्थापनादिनाच्या सभेची ऊर्जा लोकसभा निवडणुकीपर्यंत टिकणार का?

काँग्रेस कडून दावेदारी, मात्र मरगळ कायम !

वाशीम, नंतर यवतमाळ वाशीम काँग्रेस चा अभेद्य बाल्लेकिल्ला होता. मात्र, सद्यस्थितीत शिवसेनाचा गड म्हणून या मतदार संघाची ओळख तयार झाली आहे. यापूर्वी २०१४ मध्ये काँग्रेस कडून खासदार भावना गवळी यांच्या विरोधात शिवाजी मोघे लढले. परंतू त्यांना पराभवाचा सामना करावा लागला तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार भावना गवळी यांनी माणिकराव ठाकरे यांना पराभवाची धूळ चारली. सध्या माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने तेलंगणात विजय प्राप्त केला असल्याने काँग्रेस कडून माणिकराव ठाकरे यांना बळ मिळत आहे. काँग्रेस ने देखील या मतदार संघावार दावा केला आहे. मात्र, जिल्ह्यात काँग्रेस रसातळाला गेली आहे. पक्ष संघटन कमालीचे ढेपाळले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tug of war among political leaders to get candidate for yavatmal washim lok sabha constituency print politics news asj
Show comments