वाशिम : लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असून सर्वच पक्षांकडून निवडणुकीबाबत चाचपणी सुरू आहे. काँग्रेस नेते तथा यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक माजी मंत्री सुनील केदार यांनी शहरातील विश्रामभवन येथे आढावा बैठक घेऊन कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. काँग्रेस पूर्वीपासून यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवित असल्यामुळे यावेळेसदेखील ही जागा काँग्रेसकडेच कायम ठेवावी, असा आग्रह कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी माजी मंत्री केदार यांच्याकडे धरला. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे. शिवसेनेचा ठाकरे गटदेखील निवडणूक लढणार असल्यामुळे महाविकास आघाडीकडून ही जागा कुणाला सुटणार, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१९ ची लोकसभा निवडणूक शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशीच झाली होती. त्यावेळेस काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी तर शिवसेना – भाजपची युती होती. यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी पाच वेळा विजयाची पताका फडकवली आहे. शिवसेनेतील बंडानंतर राजकीय परिस्थिती बदलली. खासदार भावना गवळी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्या. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पोहरादेवीचे दर्शन घेत दिग्रस येथील जाहीर सभेत गद्दारांना घरी बसविण्याचे आवाहन केले. शिवसेनेतून खासदार भावना गवळी बाहेर पडल्या असल्या तरी शिवसैनिक आजही उद्धव ठाकरे यांच्याच पाठीशी असल्यामुळे यवतमाळ वाशिम हा शिवसेनेचा गड शाबूत असल्याची भावना शिवसैनिकांत आहे. माजी मंत्री संजय देशमुख यांनी यवतमाळ व वाशिम लोकसभा मतदारसंघ पिंजून काढून अनेक कार्यक्रम घेतले. त्यामुळे ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. पंरतु दिग्रस येथील जाहीर सभेत संजय राठोड यांच्या विरोधात संजय देशमुखांचे नाव समोर आल्याने ठाकरे गटाकडून नवीन चेहरा कोण, हे अजून स्पष्ट झालेले नाही.

हेही वाचा – नेहरू संग्रहालयाचे नाव बदलण्यावरून काँग्रेस-भाजपा आमने-सामने; मोदींकडून क्षुद्र राजकारण केले जात असल्याचा आरोप!

हेही वाचा – छत्तीसगड, मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीकडे भाजपाचे विशेष लक्ष; कमकुवत जागांसाठी आखणार विशेष रणनीती!

काँग्रेस सातत्याने यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढत आहे. २००९ च्या लोसभेत काँग्रेसकडून हरिभाऊ राठोड, २०१४ मध्ये शिवाजीराव मोघे तर २०१९ च्या लोकसभेत काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे मैदानात होते. परंतु काँग्रेसला खासदार गवळींच्या विजयाची घोडदौड रोखता आली नाही. काँग्रेस कायम दुसऱ्या क्रमांकावरच राहिली. मात्र, आता राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्यामुळे एकेकाळचे विरोधक मित्र बनले आहेत. त्यातच खासदार गवळी शिंदे गटात गेल्यामुळे महाविकास आघाडीत ही जागा कुणाच्या पदरात पडणार हे सांगणे कठीण आहे. तरीही काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून लोकसभेची चाचपणी सुरू असून ही जागा आपल्याला मिळावी, यासाठी यासाठी मित्र पक्षातच रस्सीखेच सुरू आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tug of war between congress and thackeray group over yavatmal washim loksabha constituency print politics news ssb