अविनाश कवठेकर

पुणे : शिवसेना कोणाची? पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची? यावरून शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष टोकाला गेलेला असतानाच शिवसेनेने पुणे महापालिकेच्या गेल्या निवडणुकीवेळी लढविलेल्या सर्व जागांवर शिंदे गटाकडून दावा केला जाण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकीत शिंदे गट-भाजप युती होणार असल्याचे जाहीर करण्यात आल्याने शिंदे गटाला किती जागा मिळणार, हा प्रश्न असून मागील निवडणुकीत शिवसेनेने लढलेल्या जागांवरून भाजप-शिंदे गटात रस्सीखेच होणार हे स्पष्ट आहे.

राज्यातील सत्तांतर नाट्यावेळी शहरातील शिवसेनेचे काही मोेजके पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. सध्या शहरातील शिंदे गटाची ताकद मोठी नाही. शिवसेनेचे अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी शिंदे येत्या काही दिवसांत शिंदे गटात सामील होतील, असा दावा शिंदे समर्थकांकडून केला जात आहे. शिवसेना कोणाची, याचा वाद न्यायप्रविष्ट आहे. शिंदे गटाच्या बाजूनेच न्यायालयात निकाल लागेल आणि त्यानंतर अनेक शिवसैनिक शिंदे गटाला समर्थन देतील, असा विश्वास शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना आहे. त्याच विश्वासावर शिवसेनेने गेल्या महापालिका निवडणुकीत लढविलेल्या सर्व जागांवर दावा ठोकण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू झाली आहे.

हेही वाचा : आरोप-प्रत्यारोपांच्या चक्रव्यूहात राणा दाम्पत्याची कोंडी

सन २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना स्वतंत्र लढले. भारतीय जनता पक्षाला निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले. तर शिवसेनेला नऊ जागांवर समाधान मानावे लागले. आगामी महापालिका निवडणूक शिंदे गट-भाजप युतीने लढविणार असल्याचे मुुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीत लढलेल्या सर्व जागा भाजपकडे मागणार असल्याचे युवा सेनेचे प्रदेश सचिव किरण साळी (शिंदे गट) यांनी सांगितले. त्याचबरोबर उपनगरातील काही जागांची मागणी शिंदे गटाकडून केली जाणार आहे.

कसबा, कोथरूड, पर्वती आणि शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची ताकद आहे. कोथरूडमध्येही शिवसेनेला मानणारा वर्ग आहे. हडपसर, वडगांवशेरी, पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकवासला मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची फारशी ताकद नाही. त्यामुळे या मतदारसंघातील काही जागाही शिंदे गटाकडून लढविल्या जातील, अशी चर्चा आहे. भाजपची ताकद नसलेल्या उपनगरामध्ये शिंदे गटाने निवडणूक लढविल्यास युतीला फायदा होईल, ही बाबही शिंदे गटाने भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

हेही वाचा : Gyanvapi Mosque : न्यायालयाच्या निर्णयावर काँग्रेससह विरोधकांचे मौन; कारण काय?

आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गट-भाजप एकत्रित निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही युतीबाबतची स्पष्ट भूमिका मांडली आहे. मात्र शिवसेनेच्या जागांवर दावा भाजपकडून सुरू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत यांचा कल्याण-डोंबिवली मतदारसंघ मिळविण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. त्यातच सध्या शहरातील शिंदे गटाचे अस्तित्व मर्यादित आहे. पदाधिकारीही बोटावर मोजण्याइतकेच आहेत. शिवसेनेतील नाराज पदाधिकाऱ्यांबरोबर संपर्क साधण्यात येत असल्याचे शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे. तरीही शिंदे गटाच्या पदरी किती जागा पडणार हा प्रश्न कायम राहणार आहे. सक्षम उमेदवारांची कमतरताही शिंदे गटाला जाणवण्याची शक्यता आहे.

Story img Loader