Manipur Violence: मणिपूर राज्यात वांशिक हिंसाचार मागील दीड वर्षांहून अधिक काळ सुरू आहे. केंद्र सरकारकडून अनेक प्रयत्न केल्यानंतरही मणिपूरमध्ये अधूनमधून हिंसाचार उफाळतच राहतो. याबद्दल नुकतेच मणिपूरचे मुख्यमंत्री आणि भाजपा नेते बिरेन सिंह यांनी दिलगिरी व्यक्त केली. यानंतर काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. मणिपूरमध्ये संघर्ष सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दौरा करण्याचे टाळले. काँग्रेसच्या या आरोपावर आता मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी उत्तर दिले आहे. मणिपूरमध्ये सध्या सुरू असलेला संघर्ष हे काँग्रेसचेच भूतकाळातील पाप आहे, असा पलटवार त्यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जयराम रमेश यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना बिरेन सिंह म्हणाले की, तुमच्यासह प्रत्येकाला हे माहीत आहे की, मणिपूरमधील वर्तमान परिस्थिती कशामुळे उद्भवली. हे काँग्रेसचेच भूतकाळातील पाप आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या काळात बर्मी निर्वासितांच्या वारंवार होणाऱ्या वसाहतींना मान्यता दिली. तसेच म्यानमारस्थित अतिरेक्यांशी सस्पेंशन ऑफ ऑपरेशन्स (SoS) करारावर स्वाक्षरी केली.

जयराम रमेश यांनी एक्सवर पोस्ट टाकत पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. “मणिपूरमध्ये इतक्या काळापासून अस्वस्थतता असूनही पंतप्रधान मोदींनी राज्याचा दौरा का केला नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांचे विमान जगभरात कानाकोपऱ्यात फिरत आहे. मात्र ४ मे २०२३ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्दामहून मणिपूरचा दौरा करणे टाळले आहे. मोदी जे दिल्लीत सांगतात तेच ते मणिपूरमध्ये जाऊन का सांगत नाहीत?”, असा सवाल जयराम रमेश यांनी विचारला.

हे वाचा >> मणिपूर हिंसाचार : कुकी आणि मैतेई हे समाज नेमके कोण आहेत ?

जयराम रमेश यांच्या टीकेनंतर बिरेन सिंह यांनी मात्र पंतप्रधान मोदींची बाजू सावरून धरली. ते म्हणाले, मणिपूरमध्ये याआधी वांशिक संघर्ष पेटलेला असताना तो हाताळण्यात काँग्रेसही अपयशी ठरली होती. १९९२ साली झालेला संघर्ष जो १९९७ पर्यंत सुरू होता. या पाच पर्षात ईशान्य भारतात रक्तरंजित असा हिंसाचार घडला होता. ज्यामुळे मणिपूरमधील नागा आणि कुकी समाजामध्ये वाद निर्माण झाला.

“या पाच वर्षांच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव आणि काँग्रेसचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष यांनी मणिपूरला येऊन माफी मागितली होती का? त्याकाळी झालेल्या हिंसाचारात ३५० जणांना प्राण गमवावे लागले होते. १९९७-९८ या काळात सर्वाधिक बळी गेले. त्यावेळी आयके गुजराल पंतप्रधान होते, त्यांनी मणिपूरचा दौरा केला का? त्यांनी मणिपूरच्या जनतेची माफी मागितली का?”, असाही सवाल बिरेन सिंह यांनी उपस्थित केला.

हे वाचा >> मणिपूर भारतात कसे विलीन झाले?

मुख्यमंत्री बिरेन सिंह म्हणाले की, काँग्रेसने केवळ राजकारणावर लक्ष केंद्रीत केल्यामुळे मणिपूरमधील मुख्य सोडविता आल्या नाहीत. तसेच २०२३ मध्ये घडलेल्या हिंसाचारबाबत आपण प्रामाणिकपणे माफी मागितली आहे. हिंसाचारामुळे ज्यांना ज्यांना विस्थापित आणि बेघर व्हावे लागले, त्यांच्याप्रती मी अगदी मनापासून दिलगिरी व्यक्त केली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Turmoil today because of past sins manipur cm biren singh hits back at congress after apology kvg