नीलेश पवार, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नंदुरबार : जिल्ह्यातील २५ वर्षांपासून रखडलेल्या प्रकाशा बुऱ्हाई उपसा सिंचन योजनेसाठी राज्य शासनाकडून ८०० कोटींची सुधारित मान्यता प्राप्त होत नाही तोच, आता श्रेयवादावरुन राज्यातील सत्ताधारी पक्षांमध्ये स्पर्धा रंगली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रेयवादासाठी सत्ताधाऱ्यांकडून जागोजागी फलकबाजी करण्यात आली आहे.

नंदुरबार तालुक्याचा पूर्व भाग आणि धुळे जिल्ह्यातील दुष्काळी भागाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी शासनाने १९९९ मध्ये तापी (प्रकाशा) बुऱ्हाई सिंचन योजनेला मान्यता दिली होती. त्यावेळी ११० कोटींची मान्यता दिलेल्या सिंचन योजनेची आज सुधारित किंमत ७९३.९५ कोटी इतकी झाली. या योजनेद्वारे पाणी उचलून चार टप्प्यात तलावात टाकून त्याची साठवण क्षमता ४१.४७ दशलक्ष घनमीटर होणार असून यामुळे ७०८५ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.

हेही वाचा >>> शरद पवार गटातील आमदारांचा अपात्रतेचा धोका टळला

काही वर्षांपासून या उपसा सिंचन योजनेसाठी शेतकऱ्यांनी आंदोलनही सुरु केले होते. या योजनेतंर्गत हाटमोहिदा येथून तापी नदीपात्रातून पाणी उचलून ते निंभेल, आसाणे आणि शनिमांडळ येथील तलावात टाकले जाणार होते, पुढे हेच पाणी धुळे जिल्ह्यातील अमरावती प्रकल्पात नेण्यात येणार होते. सुधारित मान्यतेसाठी हा प्रकल्प २०१९ पासून शासन दरबारी पडला होता. व्यय अग्रक्रम समितीची सहा फेब्रुवारीला सुधारित मान्यता मिळाली असली तरी शासन निर्णय अद्यापही निघालेला नाही.

आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या समर्थकांनी त्यांच्या आणि खासदार डॉ. हिना गावित यांच्या पाठपुराव्यामुळेच या प्रकल्पाला सुधारित मान्यता मिळाल्याची फलकबाजी सर्वत्र केली. अनेक मंत्र्यांकडे पाठपुरावा करुन योजना मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न केल्याचे डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले. याविषयावर काहीच न बोलणारी माणसे श्रेय घेण्यासाठी पुढ येत असल्याचे दिसून येत असल्याची टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा >>> मध्य प्रदेश काँग्रेसला धक्का! जबलपूरच्या महापौरांसह १६ काँग्रेस नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश

राष्ट्रवादी अजित पवार गटानेही आपल्या मंत्र्यांच्या तत्परतेनेच काम मार्गी लागल्याचे फलक झळकावले. जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादीचे मंत्री अनिल पाटील यांनी, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे आपण केलेल्या पाठपुराव्यानेच हे यश मिळाल्याचे म्हटले आहे. यासाठी डॉ. विजयकुमार गावित आणि जयकुमार रावल यांचे योगदान लाभाल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांनीही अजित पवार यांच्या कार्यतत्परतेने योजनेला चालना मिळाल्याचा दावा केला. तापी बुऱ्हाई संघर्ष समितीने या प्रकल्पासाठी सर्व पक्षीय नेत्यांची भेट घेतली. नागपुरात आंदोलन केले. सर्वपक्षीच नेत्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळेच प्रकल्पाला चालना मिळाल्याचे नमूद केले. प्रकल्पाच्या रखडलेल्या काळाचे श्रेयदेखील कोणीतरी घ्यावे, असा टोलाही समितीने श्रेयवादासाठी पुढे येणाऱ्यांना हाणला.

या उपसा सिंचन योजनेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना विनंती करुन निधी उपलब्ध करुन आणला. यामुळे पिण्याच्या पाण्यासह या परिसरातील सिंचन प्रश्न देखील मार्गी लावला.

-डाॅ. विजयकुमार गावित ,आदिवासी विकास मंत्री

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे आपण केलेल्या पाठपुराव्यानेच हे यश मिळाले आहे.

– अनिल पाटील ,पालकमंत्री, राष्ट्रवादी

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tussle between ajit pawar and vijaykumar gavit over irrigation project both claim credit print politics news zws