हर्षद कशाळकर
अलिबाग : जवळपास अडीच वर्षाच्या प्रतिक्षेनंतर अलिबाग ते रोहा या रस्त्याच्या कामाला सुरवात झाली. मात्र या कामाचे श्रेय घेण्यावरून आता सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमध्ये ठिणगी पडली आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील विसंवाद समोर आला आहे.
अलिबाग रोहा मार्गे साई या रस्त्याच्या कामाला हायब्रिड एन्युटी मधून मंजुरी मिळाली. जवळपास २०० कोटी रूपयांचा निधी यासाठी मंजूर करण्यात आला. ज्यात रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण आणि काही ठिकाणी काँक्रीटीकरण केले जाणार आहे. ज्यामुळे अलिबाग रोहा हा खडतर प्रवास सुसह्य होणार आहे. अडीच वर्षापुर्वी या कामाला मंजूरी मिळाली होती. कामाचा शुभारंभ ही आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत झाला होता. परंतु प्रत्यक्ष कामाला सुरूवात होऊ शकली नव्हती. नंतर ठेकेदार पळून गेल्याने हे काम रखडले होते. त्यामुळे अलिबाग रोहा रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती. वाहनचालकांना खडतर प्रवास करत मार्गक्रमण करावे लागत होते.
हेही वाचा… फाडलेला वटहुकुम आता राहुल गांधी यांच्या मुळावर
आता या कामाला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा सुरवात झाली आहे. भाजपचे उपाध्यक्ष दिलीप भोईर यांनी नारळ फोडून या कामाचा शुभारंभ केला. यावेळी भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येनी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर कामाला सुरवात झाल्याचे यावेळी भोईर यांनी सांगीतले. ही बाब शिवसेना शिंदे गटाच्या लक्षात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा कामाचा नारळ फोडून शुभारंभ केला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या मानसी दळवी, जिल्हाप्रमुख राजा केणी, अनंत गोंधळी आणि अमित म्हात्रे उपस्थित होते. कामाचे श्रेय हे आमदार महेंद्र दळवी यांचेच असून मित्रपक्षाने आलेल्या मंडळीनी कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असा थेट इशारा मानसी दळवी यांनी यावेळी दिला. त्यामुळे सत्ताधारी भाजप शिवसेना गटात श्रेयवादाची ठिणगी पडली आहे.
हेही वाचा… माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश
अडीच वर्षापुर्वी मंजूर झालेल्या आणि नंतर रखडलेल्या कामाचे श्रेय कोणी घ्यायचे यावरून सत्ताधारी पक्षात कलगीतूरा पहायला मिळत आहे. दोन वर्षापुर्वी याच रस्त्याच्या कामावरून शेकाप आणि शिवसेना यांच्यात श्रेयवाद पहायला मिळाला होता. याच रस्त्याच्या कामाचे दोन शुभारंभ झाले होते. पण ठेकेदाराने काम केलेच नाही. त्यावर दोन्ही पक्ष मौन बाळगून होते. आता अडीच वर्षानंतर रखडलेल्या कामाला सुरवात झाली आहे, आणि त्याच बरोबर रस्त्याच्या श्रेयवादाचा दुसरा अंकही सुरु झाला आहे.
हेही वाचा… कोल्हापूरमध्ये पालकमंत्री हटाव मोहिम सुरू
आमदार महेंद्र दळवी यांनी रूपयांच्या या कामाला मोठया प्रयत्नाने मंजुरी मिळवून घेतली हे सर्वश्रुत आहे. तांत्रिक बाबींमुळे हे काम रखडले होते. असे असताना कामाचे फुकटचे श्रेय घेण्याचा खटाटोप करण्याची गरज नव्हती. नागरीकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. यापुढे असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. – राजा केणी , जिल्हाप्रमुख शिवसेना (शिंदेगट)
रस्त्याचे काम अडीच वर्ष रखडले होते, हे काम सुरु व्हावे यासाठी आम्ही सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांनी तातडीने काम सुरु करण्याचे निर्देश यंत्रणांना दिले होते. त्यामुळे कामाला सुरवात झाली. – दिलीप भोईर, उपाध्यक्ष भाजपा</strong>